गेल गॅस व भारत पेट्रोलियमसाठी मडकईत जमीन संपादित करणार

0
150

>> मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मडकई येथे २२२८ चौ. मी. एवढी जमीन ‘गेल’ गॅस लिमिटेड व भारत पेट्रोलियमच्या संयुक्त प्रकल्पासाठी संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या जमिनीत सिटी गेट स्टेशन उभारण्यात येणार असून त्यासाठी येणारा ४३ लाख रु. एवढा खर्च वरील कंपन्या करणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
वाहिन्यांद्वारे एलपीजी गॅस पुरवठा करण्यासंबंधीचा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

बालकांच्या लसीकरणासाठी न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट लस खरेदी करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यावर १ कोटीवर खर्च येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या राजकीय प्रवासावर एक पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून हे पुस्तक लिहिण्याची जबाबदारी अतुल गोखले यांच्यावर सोपवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

वाळपई येथील सामाजिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतील जुनी ओपीडी विशेष मुलांसाठीची शाळा चालवण्यासाठी केशव सेवा साधनेला एका वर्षासाठी देण्यात आली होती. आता ती त्यांना आणखी १० वर्षांसाठी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे ते म्हणाले.