Home बातम्या गॅस वाहिनी डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न

गॅस वाहिनी डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न

0

डिचोली तालुक्यात १२ कि.मी., फोंडा १४ कि.मी. तर मुरगांव तालुक्यात १० किलोमीटर वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून तिवरे-वरगांव, भोम, मुरगांव व केळशी भागात किरकोळ स्वरूपाचे अडथळे निर्माण झाले आहेत. भोम येथील शेतात कोळंबी पिकविण्यासाठी ‘खाणे’ केल्याने तेथे काम सुरू करणे शक्य होत नाही.

मुरगांव तालुक्यात या प्रकल्पासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मान्यतेची गरज आहे. ती मिळवून देण्यासाठी सरकारला प्रयत्न करावा लागेल. गॅस वाहिनीच्या बाबतीत जनतेमध्ये गैरसमज निर्माण झालेला असून तो दूर करणे आवश्यक आहे, असे उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी सांगितले. वरील वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचा येथील जनतेला लाभ होणार आहे. दिल्ली, मुंबई या भागात सर्वच वाहने गॅसवर चालतात. गोव्यातही गॅस उपलब्ध झाल्यानंतर फायदा होईल. तसेच प्रत्येकाच्या घरात जोडण्या देणे शक्य होईल. सुरक्षेच्या बाबतीत या प्रकल्पासाठी जागतिक मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली असून त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत कोणताही धोका नसल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले. वरील प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे नाईक यांनी सांगितले.