गॅसजोडण्या नसलेल्यांना ५ किलोंचे सिलिंडर देणार

0
130

>> गोवा केरोसिनमुक्त करण्याचे उद्दिष्ट

 

केरोसिनमुक्त गोवा करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एलपीजी गॅस जोडण्या नसलेल्या कुटुंबांना अनुदानित दरात पाच किलो वजनाचे एलपीजी गॅस सिलिंडर देण्याची सोय होणार असून सरकारने गॅस कंपनीला तसा प्रस्तावही दिला आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे संचालक खोर्जुवेकर यांनी दिली.
राज्यातील स्वस्त दराच्या दुकानांमध्ये वरील एलपीजी सिलिंडर उपलब्ध केले जातील. त्यासाठी सरकारने सर्व दुकानदारांना प्रस्ताव पाठविला होता, पैकी सुमारे २६२ जणांनी सिलिंडर ठेवून घेण्याची तयारी दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण गोव्यात मिळून १३,३४३ कुटुंबांकडे गॅस जोडण्या नसल्याची यादी खात्याकडे होती. परंतु संबंधित कंपन्यांना वरील यादीतील किमान पाच हजार कुटुंबांकडे गॅसजोडण्या असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गॅस नसलेल्यांची संख्या आणखी कमी होऊ शकेल.
दरम्यान, दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना केंद्र सरकारच्या उज्ज्वला या योजनेखाली गॅस जोडण्या वितरित करण्याचा प्रस्ताव असून अशा कुटुंबांची संख्या सुमारे ३० हजार इतकी आहे. जनगणनेच्या अहवालानुसार वरील कुटुंबांची यादी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.