गुळेतील अपघातात पती-पत्नी ठार

0
5

कारवार-मडगाव मार्गावरील घटना; प्रवासी बसची दुचाकीला धडक

कारवार ते मडगाव मार्गावर प्रवासी बसने जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पती-पत्नीचा दुर्दैवी अंत होण्याची घटना काल सकाळी गुळे-काणकोण येथे पडली. या अपघातात पायक काढू वागोणकर (40) आणि त्यांची पत्नी प्रियांका पायक वागोणकर (38) यांचा मृत्यू झाला. या अपघातात बसमधील दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. या अपघात प्रकरणी बसचालकाला काणकोण पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वागोणकर दांपत्य गुळे येथून चापोली येथे आपल्या दुचाकीवरून (क्र. जीए-09-जे-1225) जात असताना गुळे येथील श्री भूमिपुरुष देवालयाजवळच्या एका वळणावर मडगावच्या दिशेने येणाऱ्या सदर प्रवासी बसने (क्र. एनएल-01-बी-1631) रस्त्याच्या विरुद्ध बाजूला येऊन दुचाकी धक्का दिला. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या प्रियांका वागोणकर यांचा जागीच मृत्यू झाला. या बसची धडक एवढी जबरदस्त होती की, त्याच्या धडकेने एक झाड देखील कोसळले. तसेच बसच्या काचा फुटून खाली पडल्या. या अपघातानंतर पायक वागोणकर यांना गंभीर अवस्थेत काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. अपघातग्रस्त बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते. सदर बसमधील सोनल पिंटो या प्रवाशाच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून, अन्य एक प्रवासी देखील गंभीर जखमी झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी दोन्ही प्रवाशांवर काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्यांना मडगावच्या जिल्हा इस्पितळात पाठविण्यात आल्याची माहिती चंद्रकांत गावस यांनी दिली. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या एन. नागराज (रा. कर्नाटक) या बसचालकाला काणकोणच्या पोलिसांनी अटक केली आहे.

गुळे येथील स्नेहसंमेलनाला दोघांची उपस्थिती
सोमवारी गुळे येथे आयोजित एका स्नेहसंमेलनाला दोघेही पती-पत्नी उपस्थित होते. स्नेहसंमेलन संपल्यानंतर पायक वाघोणकर हे रात्री घरी परतले होते. त्यानंतर काल सकाळी पुन्हा गुळे येथे येऊन आपल्या पत्नीला चापोली येथे घेऊन जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. पायक वागोणकर हे चापोली एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. पाच बहिणीनंतर एकुलता एक भाऊ असलेल्या पायक यांचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

रस्ता रुंदीकरणाला 8 दिवसांची मुदत
आठ दिवसांत जर रस्त्याच्या रुंदीकरणाला प्रारंभ केला नाही, तर या मार्गावरील संपूर्ण वाहतूक रोखली जाईल, असा स्पष्ट इशारा गुळे ग्रामस्थ आणि काणकोणच्या जागरुक नागरिकांनी दिला आहे.