गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत

0
16

>> १८२ जागांसाठी १ आणि ५ डिसेंबर रोजी होणार मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या १८२ जागांसाठी १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. ४.९ कोटी मतदार गुजरातमधील नव्या सरकारसाठी मतदान करणार आहेत. पहिल्या टप्प्यात ८९ आणि दुसर्‍या टप्प्यात ९३ जागांवर निवडणूक होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असल्याने या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ५० टक्के मतदान केंद्रांचे थेट प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळी दिली. गुजरात निवडणुकीसाठी ३.२४ लाख मतदार पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

त्रिपक्षीय लढत
गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षांचे आव्हान आहे. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला कॉंग्रेसने जोरदार टक्कर दिली होती. भाजपचे संख्याबळ १०० पेक्षा खाली आले होते. तर, कॉंग्रेसने ८० जागांवर मुसंडी मारली होती. यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. पाटीदार आंदोलनाचा चेहरा असलेले हार्दिक पटेल यांनी कॉंग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ स्वीकारले आहे. तर, कॉंग्रेसच्या काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

त्याचवेळी गुजरातच्या शहरी भागात आम आदमी पक्ष उभारणी घेत आहे. त्याची झलक नगरपालिका, महापालिका निवडणुकीत दिसून आली आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम

पहिल्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख ५ नोव्हेंबर असून छाननीची तारीख १५ नोव्हेंबर आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख १७ नोव्हेंबर आहे. दुसर्‍या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख १० नोव्हेंबर २०२२ ही असून छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल. तर अर्ज मागे घेण्याची तारीख २१ नोव्हेंबर आहे.
दरम्यान, कोरोनाबाधितांसाठी घरातून मतदान करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. ४.६ लाख युवा मतदार गुजरातमध्ये मतदान करणार आहेत. गुजरातमध्ये ४ लाख ४ हजार दिव्यांग मतदार असून निवडणुकीत त्यांच्यासाठी १८२ विशेष मतदान केंद्र असणार आहेत. तसेच १४२ आदर्श मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.