Home बातम्या गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लिन चिट

गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लिन चिट

0

गोध्रा जळीतकांडानंतर उसळलेल्या गुलबर्ग दंगलीत नरेंद्र मोदी यांच्या सहभागाविषयी कोणतेच पुरावे सापडले नसल्याने हे प्रकरण बंद करण्याचे सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या विशेष चौकशी पथकाने ठरविले असून मुख्यमंत्री मोदी यांना क्लिन चिट देण्यात आली आहे.

गुलबर्ग येथे दंगलींदरम्यान, ६९ जणांना जाळून मारण्यात आले होते. यात तत्कालीन कॉंग्रेस आमदार एहसान जाफरी यांचा समावेश होता. याप्रकरणी जाफरी यांच्या पत्नी झकिया यांनी मोदींसह एकुण ५८ जणांविरुद्ध कट रचल्याची फौजदारी तक्रार नोंदवली होती.

दरम्यान, याप्रकरणी विशेष चौकशी पथकाचा अहवाल व संबंधित दस्तावेज झकिया यांना ३० दिवसांत देण्यात यावेत तसेच श्रीमती जाफरी यांना तक्रार पुढे नेण्याविषयी अधिकार द्यावेत असे दंडाधिकार्‍यांनी म्हटले आहे. तक्रारदाराचे म्हणणे ऐकल्यानंतरच याविषयी केस बंद करण्याविषयी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

झकिया यांनी तक्रारीत मुख्यमंत्री मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य, पोलीस अधिकारी, भाजप पदाधिकारी यांची नावे घेऊन दंगलींचा कट रचल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष चौकशी पथक नेमले होते.

दरम्यान, तपास बंद करण्याच्या विशेष चौकशी पथकाच्या निर्णयाचा खेद वाटत असल्याचे सांगून झकिया यांनी याप्रकरणी लढा चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.