गुजरातमधील दरोड्यातील संशयितास केप्यात अटक

0
101

गुजरातमध्ये तीन कोटी चाळीस लाख रुपयांचा दरोडा घालून पसार झालेल्या सराईत दरोडेखोर नारायण संन्याल (मंगलोर) याला केपे पोलिसांनी केपे येथे अटक केली.
गुजरात येथे ३ कोटी ४० लाखांचा दरोडा घातला गेला होता व या दरोड्यातील एका आरोपीला गुजरात पोलिसांनी अटक केली होती. दुसरा आरोपी संन्याल हा फरारीच होता. गुजरात पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनचे लोकेशन तपासून तो गोव्यात केपे भागात वावरत असल्याची खबर केपे पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक अरविंद गावस, उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम सुरू झाली असता केपे येथील वनखात्याच्या समोरील एका घरासमोर कर्नाटकची नंबरप्लेट असलेली एक गाडी दिसली. पोलिसांनी आपला हिसका दाखवत विचारपूस केल्यावर संन्याल याने आपण गुन्हेगार असल्याचे कबूल केले. त्या तिघांनाही केपे पोलिसांनी कारसह ताब्यात घेऊन गुजरात पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी आरोपीला केपेच्या वरिष्ठ न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी आरोपीला अटक करून आज बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यास सांगितले आहे. नंतर त्याला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.