गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणींची निवड

0
64

गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा विजय रुपाणी यांचीच निवड करण्यात आली आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल याविषयी घोषणा केली. नव्या विधानसभेवर भाजपचे ९९ आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याविषयी चर्चा सुरू होती. मात्र जेटली यांच्या घोषणेमुळे या चर्चांना विराम मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नितिन पटेल यांची निवड झाली आहे.

गुजरातेत सलग सहाव्यांदा भाजपचे सरकार सत्तेवर येणार आहे. मात्र भाजपला निवडणुकीआधी ठेवलेले १५० जागांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. प्रारंभी जनमत चाचण्यांत भाजपला १३५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रभावी प्रचार व त्यांना हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाडी, अल्पेश ठाकूर यांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे भाजपच्या जागा घटल्या. बहुमतासाठी आवश्यक संख्येपेक्षा फक्त ७ जागा त्यांना जास्त मिळाल्या. या सर्व घटनांमुळे गुजरातेत विजय रुपाणी यांचा प्रभाव नसल्याचे स्पष्ट झाल्याने यावेळी मुख्यमंत्रीपदी अन्य कोणाची निवड होण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र रुपाणी यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रुपाणी हे भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे विश्‍वासू आहेत.