गावांतून खनिज वाहतुकीसाठी नवे परवाने देण्यास तूर्त मनाई

0
19

>> गोवा खंडपीठाचा आदेश; मये ग्रामस्थांना मिळाला दिलास

>> मये गावात दिवसातून केवळ 5 तास 50 ट्रक फेऱ्यांना मुभा

खाण खाते आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढील आदेशापर्यंत गावांमधून खनिज वाहतुकीसाठी नवीन परवाने देऊ नयेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल दिला. यापुढे मये गावातून सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 2 ते 5 या वेळेत खनिज वाहतूक करावी. तसेच दररोज खनिज वाहतूक 50 ट्रक फेऱ्यांपुरतीच मर्यादित ठेवावी, असा आदेशही न्यायालयाने दिला. या आदेशाद्वारे उच्च न्यायालयाने खनिज वाहतुकीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मये ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला.

मये गावातून होणाऱ्या खनिज वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी एक याचिका गोवा खंडपीठात दाखल केली होती, त्यावर काल सुनावणी घेण्यात आली. खनिज वाहतूक विषयीच्या निर्देशांचे उल्लंघन व न्यायालयाचा अवमान करून ही वाहतूक सुरू असल्याने मयेतील शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत विविध मुद्दे उपस्थित करत, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा सरकार, डिचोली उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग आदींना प्रतिवादी करण्यात आले होते.

खाण खाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने मये गावातून खनिज वाहतूक परवाना देताना कोणताही विचार न केल्याबद्दल उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. खनिज वाहतुकीच्या व्यवस्थापनाबाबत कोणतीही स्पष्टता नाही, असे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. उर्वरित 5900 मेट्रिक टन खनिज वाहतुकीसाठी मये गावातील अंतर्गत रस्त्यांवर दररोज फक्त 50 ट्रकांद्वारे वाहतूक करावी. त्यानंतर पुढील आदेशापर्यंत नवीन खनिज वाहतूक करण्यास मान्यता देऊ नये, असा आदेश न्यायालयाने दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 20 फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे.

मये गावात जोपर्यंत आणखी 2 प्रदूषण देखरेख केंद्रे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये देखरेख यंत्रणा यांची व्यवस्था केल्याशिवाय नवीन खनिज वाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने खनिज वाहतुकीवरील अधिकाऱ्यांच्या देखरेखीबाबत नाराजी व्यक्त केली, अशी माहिती मये ग्रामस्थांच्या वकील नॉर्मा आल्वारिस यांनी दिली.
खाण खात्याने खाण कंपनीला 28 डिसेंबर रोजी पैरा येथील खाणीतून 26,000 मेट्रिक टन खनिजाची वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. खाण कंपनीने 8 जानेवारीपासून खनिजाची वाहतूक सुरू केली. खाण कंपनीने आत्तापर्यंत बहुतांश खनिजाची वाहतूक केली असून, केवळ 5,900 मेट्रिक टन मालाची वाहतूक करणे बाकी आहे.

आधी 230; आता केवळ 50 ट्रक फेऱ्यांना मुभा

खाण कंपनीकडून यापूर्वी मये गावातून दररोज 230 ट्रकांतून खनिज वाहतूक केली जात होती. आता, न्यायालयाने दररोज 50 ट्रकांतून खनिज वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. एकदा उरलेल्या खनिजाची वाहतूक झाल्यानंतर गावातील रस्त्यांवरून खनिजाची नवीन वाहतूक करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. गावातून खनिज वाहतुकीबाबतच्या खाण कंपन्यांना पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची सूचना न्यायालयान केली आहे.