गांधी जयंतीची सुट्टी  रद्द केलेली नाही

0
112

मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे स्पष्टीकरण
आपल्या सरकारने २ ऑक्टोबर ही गांधी जयंतीची सुट्टी रद्द केलेली नाही. राजपत्र छपाईच्या वेळी नजरचुकीने झालेली ती चूक असावी किंवा गोंधळ निर्माण करण्यासाठी कुणीतरी केलेला तो प्रयत्न असावा, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल सांगितले.भाजपशासित गोव्यात या वर्षी राजपत्रात दाखविलेल्या शासकीय सुट्‌ट्यांच्या यादीमधून गांधी जयंतीला (२ ऑक्टोबर) वगळण्यात आल्याचे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिल्यानंतर काल बराच गोंधळ व खळबळ निर्माण झाली होती. या वादग्रस्त चालीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी वरील स्पष्टीकरण केले आहे.
भाजप सरकारने यापूर्वी गांधी जयंतीची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर बराच वाद झाला होता. गेल्या २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत योजनेखाली सर्व कर्मचार्‍यांना कार्यालयात हजर राहणे सक्तीचे केले होते. त्यामुळे सुट्टीच्या बाबतीत जनतेमध्ये संशय निर्माण झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या खुलाशामुळे तो दूर झाला आहे.
धर्मांध राजकारण : कॉंग्रेस
प्रदेश कॉंग्रेसने भाजपच्या या निर्णयावर कडाडून हल्ला चढवला असून राज्यात भाजप धर्मांध राजकारण करीत असल्याचे प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी म्हटले आहे. गांधी जयंतीची सुट्टी रद्द केल्याने इतिहास बदलू शकत नाही. गांधीजींची शिकवण संपूर्ण जगाने स्वीकारली आहे. त्यांचा जगासाठीचा संदेश भाजपने गृहीत धरू नये असे प्रवक्ते कवठणकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कारकिर्दीत २ ऑक्टोबरची सुटी रद्द करण्याचा प्रयत्न केला होता, याचा जनतेला विसर पडलेला नाही. नेहमीच हिंसेला थारा देण्याची मानसिकता असलेल्या भाजपकडून भविष्यात नथुराम गोडसे जयंतीची सुट्टी जाहीर केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही असेही कवठणकर म्हणाले.
हा राष्ट्रपित्याचा अपमान : आमदार लोबो
दरम्यान, उत्तर गोवा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार मायकल लोबो यांनी शासकीय सुट्‌ट्यांच्या यादीमधून गांधी जयंतीला वगळण्याच्या निर्णयाने धक्का बसल्याचे म्हटले आहे. देशाच्या राष्ट्रपित्याचा अपमान करू शकत नाही, असा नाराजीचा सुर आमदार लोबो यांनी व्यक्त केला आहे. या प्रश्‍नी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.