गांधींवरून गहजब

0
121

गोव्यातील गांधी जयंतीची सुटी रद्द करण्यात आल्याचा गहजब राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी नुकताच केला. सरकारी राजपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या सन २०१५ च्या सुट्यांच्या यादीमध्ये गांधी जयंतीची सुटी दर्शविण्यात आलेली नसल्याचे त्यातून समोर आले. एक तर हे नजरचुकीने वा गैरसमजातून घडले असावे वा कोणी तरी खोडसाळपणा केला असावा असा खुलासा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्यावर केला आहे. सरकारी राजपत्रामध्ये प्रकाशित होणारी माहिती ही अधिकृत मानली जाते, त्यामुळे ती विपर्यस्त असणे ही गंभीर चूक आहे आणि ती कशी घडली त्याची चौकशी सरकारने करणे इष्ट ठरेल. दुसरीकडे, ऐन जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तोंडावर हा विषय उकरून काढणार्‍यांचा हेतूही शुद्ध दिसत नाही. गोवा सरकार गांधी जयंती, गुड फ्रायडे आणि सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त या सुट्या काढू पाहात आहे असा आरोप कॉंग्रेसच्या एका नेत्याने केला आहे, तो अल्पसंख्यक समुदायाला चिथावण्यासाठीच केलेला आहे अशी शंका घेण्यास वाव आहे. खरे तर केंद्र सरकारने ज्या तीन सरकारी सुट्या अधिसूचित केलेल्या आहेत, त्यात स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाबरोबरच गांधी जयंतीचाही समावेश होतो. त्यामुळे संपूर्ण देशभरात त्या सुट्या अनिवार्य आहेत. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाची सुरूवात गांधी जयंतीच्या दिवशीच केली होती आणि सुटीच्या दिवशी सरकारी कर्मचार्‍यांनी स्वयंप्रेरणेने कार्यालयांमध्ये यावे आणि आपली कार्यालये स्वच्छ करावीत असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे सुटी असूनही कर्मचारी सरकारी कार्यालयांमध्ये आले आणि त्यांनी स्वच्छता अभियान राबवले होते. गांधीजींच्या जयंतीचे निव्वळ ‘सोहळे’ करण्यापेक्षा अशा प्रकारचे प्रत्यक्ष कृती अभियान निश्‍चितच अधिक अर्थपूर्ण ठरते, परंतु भरपूर सुट्यांना चटावलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना तेव्हा आपल्यावरील हे गंडांतर वाटले. नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये प्रवेश करताना सर्वप्रथम गांधींना वंदन केले होते आणि स्वच्छ भारत अभियानाच्या शुभारंभासाठी गांधीजयंतीचेच औचित्य निवडले हे लक्षात घेण्यासारखे आहे. नुकताच ब्रिटीश सरकारने गांधीजींचा पुतळा उभारला त्याच्या अनावरण सोहळ्यालाही अर्थमंत्री अरूण जेटली उपस्थित राहिले. गांधीजींविषयी कितीही विखारी प्रचार केला जात असला, तरी त्यांचे भारतीय समाजजीवनातील स्थान श्रद्धेचेच राहील. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास मोहनदास करमचंद गांधी या नावाविना पूर्णच होऊ शकणार नाही. रक्तपात न करता अहिंसक मार्गांनी, सत्याग्रहाद्वारेही प्रश्न धसास लावता येऊ शकतात हा विचार गांधींनी जगाला दिला, परंतु हा विचार आपण मांडलेला नाही, तर तो आपल्या भारतीय परंपरेतूनच आलेला आहे हे सांगण्याचा प्रांजळपणाही त्यांनी दाखवला. ‘गांधीवाद’ वगैरे काहीही नाही. माझ्या मागे मला आपला कोेणताही पंथ मागे ठेवायचा नाही. दैनंदिन जीवनातील प्रश्नांवर शाश्‍वत सत्याच्या मार्गाने जात उत्तरे शोधण्याचा मी प्रयत्न केला. माझे निष्कर्ष अंतिम आहेत असेही नाही. मी जगाला नवे काही दिलेले नाही. सत्य, अहिंसा हे पर्वतांएवढेच प्राचीन आहेत असे गांधीजींनी स्पष्टपणे सांगितले होते. आपले जीवन उघड्या पुस्तकासारखे आहे असे ते म्हणत असत, परंतु दुर्दैवाने गांधीजी ‘राष्ट्रपिता’ आहेत का इथपासून त्यांना टीकेचे धनी व्हावे लागलेले आहे. गांधीजींसारख्या निःशस्त्र फाटक्या फकिराची हत्या तर झालीच, परंतु त्यांच्या विचारांची हत्या पदोपदी झाली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात केवळ नोटांवरच्या गांधीजींना महत्त्व आले. त्यांचे विचार त्यांचा वारसा मिरवणार्‍यांनीही सदैव पायदळीच तुडवले. आदर्श रामराज्याची त्यांची स्वराज्याची संकल्पना केवळ पुस्तकातच राहिली. त्यांचे सत्याचे प्रयोग स्वातंत्र्यानंतरच्या राजकारण्यांना परवडणारे नव्हतेच. त्यामुळे गांधी हा केवळ मिरवण्याचा विषय झाला. वर्षभर गलीच्छ स्थितीत उभे असलेले त्यांचे पुतळे जयंतीच्या निमित्ताने साफसूफ करून त्यांच्या गळ्यांत माळा घालण्यापेक्षा आणि भाषणबाजी करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा वारसा स्वतःच्या जीवनामध्ये कृतीत आणण्याचा प्रयत्न करणे आणि तो येणार्‍या नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे अधिक उचित ठरेल. ‘गांधी’ ही अशी दोन अक्षरे आहेत जी अ-क्षर आहेत, मिटवता न येणारी आहेत!