गणित वर्ल्डकप सेमीफायनलच

0
123

क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या भारतावरील विजयाने श्रीलंकेला स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे. तसेच टीम इंडियाच्या पराभवामुळे उपांत्य फेरीचे गणित अधिक किचकट बनले आहे. भारताने इंग्लंडचा पराभव केला असता तर पाकिस्तानला याचा फायदा झाला असता. आतापर्यंत फक्त ऑस्ट्रेलियाचा संघ १४ गुणांसह उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला असून गुणतक्त्यामध्ये दुसर्‍या स्थानावर असूनही भारताला अजून उपांत्य फेरीचे तिकिट मिळालेले नाही.

विश्‍वचषकामध्ये टीम इंडियाने आतापर्यंत ७ सामने खेळून ११ गुण घेत दुसर्‍या स्थान मिळविले आहे. भारताचे दोन सामने अजून बाकी आहेत. यातील एक सामना आज मंगळवारी बांगलादेशविरुद्ध आणि दुसरा शनिवारी श्रीलंकेविरुद्ध रंगणार आहे. भारताला उपांत्य फेरीत आगेकूच करण्यासाठी दोनपैकी एक सामना जिंकणे गरजेचे आहे. परंतु टीम इंडियाचा पुढील दोन्ही लढतींमध्ये मोठ्या फरकाने पराभव झाला आणि दुसरीकडे इंग्लंड संघाने न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला तर भारतीय संघाच्या उपांत्य फेरीमध्ये जाण्याच्या आशांना सुरुंग लागणार आहे.

न्यूझीलंडचा संघ आठ लढती खेळला असून ११ गुण त्यांच्याकडे आहेत. परंतु निव्वळ धावगती कमी असल्यामुळे ते गुणक्तक्त्यात भारतीय संघानंतर आहेत. किवी संघाचा पुढचा सामना यजमान इंग्लंडशी होणार आहे. बाद फेरीतील प्रवेशासाठी न्यूझीलंडला हा सामना जिंकावाच लागणार आहे. न्यूझीलंडचा संघ हा सामना हरला तर दुसर्‍या संघांच्या कामगिरीवर त्यांच्या उपांत्य फेरीतील प्रवेश अवलंबून असेल.

बांग्लादेशच्या संघाने पुढील दोन्ही लढतीत भारत आणि पाकिस्तानचा पराभव केल्यास निव्वळ धावगतीच्या आधारवर सेमी फायनलमध्ये जाणारा चौथा संघ ठरेल.
पाकिस्तानचे ८ सामन्यांतून ९ गुण झाले आहेत. पाकिस्तानचा शेवटचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत केले आणि पाकने बांगलादेशचा पराभव केल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीत दाखल होईल. परंतु न्यूझीलंडला इंग्लंडला पराभूत करण्यात अपयश आले आणि पाकिस्तान शेवटचा सामना हरला तर बांगलादेशला सेमी फायनलची संधी असेल. परंतु त्यांना पाकिस्तानविरुद्ध होणार्‍या लढतीआधी भारताचा पराभव मात्र करावा लागेल.
भारताचा पराभव केल्यानंतर इंग्लंडने पुन्हा एकदा सेमी फायनलच्या शर्यतीत स्थान मिळविले आहे. बुधवारी इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात सामना होणार आहे. दोन्ही संघांना उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी या लढतीत विजय आवश्यक आहे. दोन्हीपैकी जो संघ पराभूत होईल त्याला दुसर्‍या संघांच्या लढतींच्या निकालांची वाट पाहावी लागणार आहे. इंग्लंड न्यूझीलंड-कडून पराभूत झाला आणि बांग्लादेशचा पाकिस्तानने पराभव केल्यास इंग्लंड स्पर्धेतून बाहेर जाईल. दुसरीकडे इंग्लंडने विजय मिळवल्यास बांगलादेशने पुढील दोन्ही लढती जिंकल्या तरी त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचे दार बंद होईल.

बांगलादेशने अखेरच्या दोन लढतीत भारत आणि पाकिस्तानचा पराभव केल्यास त्यांच्यासाठी उपांत्य फेरीती प्रवेशाच्या आशा जिवंत असतील. बांगलादेशने दोन्ही लढतीत विजय मिळवला आणि न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत केल्यास बांगलादेश ‘अंतिम चार’मध्ये पोहोचेल. दुसरीकडे इंग्लंड विजयी झाल्यास बांगलादेशला न्यूझीलंडपेक्षा जास्त निव्वळ धावगती राखावी लागेल.