खून प्रकरणातील फरार आरोपीला १५ वर्षांनंतर अटक

0
8

>> गॉडविन डिसिल्वा खून प्रकरण; आरोपी जॅक्सन दादेल याला पश्‍चिम बंगालमधून शिताफीने अटक

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने आल्तिनो-पणजी येथील गॉडविन डिसिल्वा याच्या खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीतून फरार झालेल्या जॅक्सन दादेल याला पश्‍चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातून अखेर १५ वर्षांनतर अटक करण्यात यश मिळविले. जॅक्सन हा राजीव कश्यप असे नाव बदलून एका हॉटेल आस्थापनात कामाला होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याला मडगाव पोलिसांच्या काल स्वाधीन करण्यात आले.

जॅक्सन याला गॉडविन डिसिल्वा याच्या खून प्रकरणात दोषी ठरविण्यात आले होते; मात्र शिक्षा होण्याअगोदर मडगाव येथील न्यायालयीन कोठडीतून तो फरार झाला होता. आल्तिनो येथील गॉडविन डिसिल्वा याचा २३ एप्रिल २००५ रोजी करंजाळे येथे सुरा खुपसून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी जॅक्सन दादेल (भाटले) आणि रुडॉल्फ गोम्स या दोघांना अटक केली होती. पणजी येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दोघाही संशयितांना खून प्रकरणी दोषी ठरविले होते. त्या दोघांना मडगाव येथील न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.

१६ सप्टेंबर २००७ रोजी न्यायालयाने खून प्रकरणी शिक्षा सुनावण्याआधी आरोपी जॅक्सन दादेल आणि रुडॉल्फ गोम्स या दोघांनी १२ इतर आरोपींसह मडगाव येथील न्यायालयीन कोठडीच्या तुरुंगाचे दरवाजे तोडले, तुरुंगाच्या रक्षकांवर हल्ला केला, त्यांना लॉक-अपमध्ये कोंडून ठेवले आणि पलायन केले. या प्रकरणी मडगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेला गॉडविन डिसिल्वा खून प्रकरणातील आरोपी पश्‍चिम बंगालमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हा शाखेने साधारण महिनाभर तपासकाम करून जॅक्सनला ताब्यात घेण्यात यश प्राप्त केले, अशी माहिती गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

न्यायालयीन कोठडीतून पळून गेल्यानंतर सुरुवातीला जॅक्सन हा झारखंड येथे राहिला. त्याने गोव्यातील व्यक्तीशी संपर्क साधणे बंद केले. त्यानंतर आपले नाव बदलून पश्‍चिम बंगालमधील दिघा शहरातील एका हॉटेलमध्ये राजीव कश्यप या नावाने फ्रंट ऑफिस मॅनेजर म्हणून काम करत होता. दादेल याचा साथीदार गोम्स याला यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे, असे वाल्सन यांनी सांगितले. या कारवाईत उपअधीक्षक हर्ळणकर यांच्यासमवेत हवालदार संदीप मडकईकर, शिपाई संदेश कांबळी, संजय गावकर यांनी सहभाग घेतला.

हॉटेलमध्ये मॅनेजर
म्हणून करता होता काम

कोलकात्यापासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम बंगालमधील पूर्बा मेदिनीपूर जिल्ह्यातील दिघा शहरामध्ये एका हॉटेलात फ्रंट ऑफिस मॅनेजर म्हणून जॅक्सन दादेल हा काम करीत होता. गुन्हा शाखेेचे उपअधीक्षक सूरज हर्ळणकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पूर्बा मेदिनीपूर येथे जाऊन त्याला अटक करून गोव्यात आणून पुढील कार्यवाहीसाठी मडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.