खाण उद्योग प्रक्रिया तीन महिन्यांत सुरू

0
44

>> मुख्यमंत्र्यांची धारबांदोडा दौर्‍यात माहिती

>> खनिज विकास महामंडळातर्फे प्रक्रिया

राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठीची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. गोवा खनिज विकास महामंडळातर्फे हे काम सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

धारबांदोडा येथे आयोजित करण्यात आलेल्या संकल्प यात्रेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, सरपंच स्वाती गावस, माजी आमदार गणेश गावकर, अधिकारी अजित पंचवाडकर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी धारबांदोडा येथून संपर्क यात्रेला सुरुवात केली. यावेळी महिलांनी त्यांचे राख्या बांधून स्वागत केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यातील खाणींचा लिलाव करणे तसेच त्यापूर्वीच लिलाव करण्यात आलेले खनिज हलवणे हे काम खनिज विकास महामंडळातर्फे येत्या तीन महिन्यांच्या काळात सुरू होणार असल्याची माहिती दिली.

२०१८ साली सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ८८ खाण लिजेसचे परवाने रद्द केल्यापासून राज्यातील खाण उद्योग बंद आहे. राज्यातील बंद असलेला खाण उद्योेग सुरू करता यावा यासाठी सर्व ते प्रयत्न केले असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्या प्रयत्नांना यश येऊ शकले नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हल्लीच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारने गोवा खनिज विकास महामंडळ संमत केल्याचे सांगून त्यामुळे आता राज्यातील बंद असलेला खाण उद्योग सुरू करण्याच्या कामाला गती मिळू शकणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील खाण उद्योग बंद पडल्याने खाणपट्‌ट्यातील लोकांवर जे आर्थिक संकट कोसळलेले आहे त्याची आपणाला जाणीव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करून, आपणही खाणपट्‌ट्यातील राहणारा असल्याने आपल्याला परिस्थितीची कल्पना असल्याचे ते म्हणाले. बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठी तोडगा काढताना आम्ही खनिज महामंडळाची स्थापना केल्याचे ते पुढे म्हणाले. आयआयटी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अथवा फॉरेर्लिक इन्स्टिट्यूट ह्या तीन संस्थांपैकी एखादी संस्था ही धारबांदोडा तालुक्यात सुरू करण्यात येणार असून ती सुरू केल्यानंतर धारबांदोडा तालुक्याचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

धारबांदोड्यात एक प्रकल्प
धारबांदोडा तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. येणार्‍या काळात आयआयटी प्रकल्प, फॉरेन्सिक संस्था किंवा नॅशनल स्कूल ऑफ लॉ यतील एक प्रकल्प धारबांदोड्यात स्थापन केला जाणार आहे. सरकार विविध प्रकल्प धारबांदोडा तालुक्यातील सरकारी जमिनीवर स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या प्रकल्पांचे लोकांनी स्वागत करावे असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.