खाणींसाठीचे पर्यावरण परवाने अर्थसंकल्पापूर्वी मिळणार : मुख्यमंत्री

0
120

खाणींसाठीचे पर्यावरण परवाने येत्या अर्थसंकल्पापूर्वी मिळणारच, असे सांगून केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना आपण पर्यावरण परवाने मिळाल्यानंतरच अर्थसंकल्प मांडणार, असे सांगितले आहे. त्यामुळे दाखल्यांवरील निलंबनाचा आदेश कोणत्याहीक्षणी येऊ शकेल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.निवडणूक प्रचार काळात जनतेने खाणींविषयी प्रश्‍न विचारले, त्याचप्रमाणे पक्षीय पातळीवर जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयावरही प्रश्‍न केले. सरकारने खुलासा करून सर्वांचे समाधान केले आहे. त्यामुळे उद्याच्या जिल्हा पंचायत निवडणुकीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. उत्तर गोवा व दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायती भाजप-मगो, गोवा विकास पार्टी या युतीलाच मिळेल, असा विश्‍वास पार्सेकर यांनी व्यक्त केला.
जिल्हा पातळीवर निवडणुका लढविल्याने जिल्हा पंचायतींना अधिकार देणेही शक्य होईल, असे ते म्हणाले. बंडखोरांचा पक्षावर परिणाम होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. गोव्याबाहेर घडणार्‍या हिंसक घटनांचा येथील अल्पसंख्यांकावर परिणाम होत नाही. त्यांचा आपल्या सरकारवर विश्‍वास आहे, असे पार्सेकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
४४ दिवस चाललेल्या जुने गोवे येथील सेंट झेवियर शवप्रदर्शनाच्या वेळी प्रशासनाने केलेल्या कामगिरीची बिशपनेही प्रशंसा केली आहे. हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडला, असे पार्सेकर यांनी सांगितले. या काळात ५६ लाख भाविकांनी जुने गोव्याला भेट दिल्याचे ते म्हणाले.