खडे बोल

0
142

राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘प्रुडंट’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हादईसारख्या गोव्याच्या दृष्टीने जीवनमरणाच्या असलेल्या प्रश्नावर सुनावलेले खडे बोल आणि म्हादईच्या विषयात आपण सदैव गोमंतकीय जनतेसोबतच राहणार असल्याची दिलेली निःसंदिग्ध ग्वाही आश्वस्त करणारी आहे. म्हादईच्या रक्षणात राज्य सरकार कमी पडले असले तरी राज्यपाल जागृत आहेत आणि केंद्र सरकारकडे स्वतःहून पाठपुरावा करीत आहेत हे सातत्याने दिसून आले आहे. आपल्या संवैधानिक मर्यादांची जाणिव ठेवून, परंतु राज्यपाल या नात्याने असलेल्या कर्तव्यांचेही भान राखून ज्या रामशास्त्री बाण्याने राज्यपाल महोदयांनी म्हादईसंदर्भात सुस्पष्ट व न्याय्य भूमिका घेतली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. यापूर्वीही हा विषय ऐरणीवर येताच त्यांनी कमालीची सक्रियता दाखवीत स्वेच्छेने त्याचा पाठपुरावा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी म्हादईच्या विषयावर थेट बोलण्याचे जे धैर्य त्यांनी दाखविले, त्याचे यापूर्वीही आम्ही कौतुक केले आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकला दिलेल्या पत्राचा वाद उद्भवताच, त्याविषयी स्पष्टीकरण करणारे पत्र द्यावे असे जावडेकरांना राज्यपालांनीच सुनावले होते आणि त्यांनी दोन दिवसांत पत्र देतो असे सांगितल्याने, दिल्ली भेटीवर गेलेल्या मुख्यमंत्र्यांना परत येताना जावडेकरांकडून ते पत्र घेऊन यायलाही राज्यपाल महोदयांनीच सांगितले होते हे सत्य आता मलिक यांच्या मुलाखतीतून उजेडात आलेले आहे. म्हणजेच केंद्र सरकारला म्हादईप्रश्नी गोव्याच्या जनमानसातील चिंतेबाबत सर्वोच्च स्तरावर सतत जाणीव करून देण्याचे काम राज्यपाल महोदयांनीच केलेले दिसते, जी वास्तविक राज्य सरकारची जबाबदारी होती. राज्याचा राज्यपाल हा केवळ रबरी शिक्का नसतो, तर राज्याच्या सुखदुःखाशी, प्रश्नांशी त्याने जोडलेले असावे आणि सरकारचे काही चुकत असेल तर कानउघाडणी करावी हेही त्याच्याकडून अपेक्षित असते हे मलिक यांनी आपल्या स्पष्टोक्तीतून दाखवून दिले आहे. गोव्याला केंद्र सरकारने धोका दिला आहे असे सडेतोडपणेे सांगणे ही एका परीने हाराकिरीच आहे, परंतु आपल्या नावाप्रमाणेच सत्याचे पालन करण्याला मलिक यांनी प्राधान्य दिलेले आहे. राज्यपाल पदावरील एखादी व्यक्ती एवढे बेधडक व सडेतोड बोलू शकते याची उदाहरणे अलीकडच्या होयबा संस्कृतीत तर दुर्मीळच झालेली आहेत. मलिक यांची एकंदर पार्श्वभूमी लक्षात घेतली तर त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाचे गुपित उमगते. मलिक हे मुळात संघपरंपरेतून आलेले नेते नव्हेत, त्यामुळे त्यांच्यावर विचारधारेचे दडपण नाही. त्यांचा राजकीय प्रवास जनता दल, समाजवादी पक्ष अशा समाजवादी विचारसरणीतून झालेला आहे आणि राज्यपालपदावरील त्यांची नियुक्तीही त्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारावर झालेली आहे, मैत्रीखातर नव्हे. काश्मीरमधील ३७० कलमाचे विशेषाधिकार काढले गेले, तेव्हा तेथील राज्यपालपदी मलिक यांच्यासारखी खंबीर व्यक्ती आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी फार मोठा दिलासा ठरला होता. आपल्या काश्मीरमधील कार्यकाळामध्ये अत्यंत कार्यक्षमतेने मलिक यांनी तेथील प्रशासकीय कारभार चालवला. काश्मीर प्रश्‍नाचे राजकारण करू पाहणार्‍या राहुल गांधींना त्यांनी त्यावेळी खडे बोल सुनावले होते. हे पाहता जे आपल्या मनाला पटेल ते बोलण्याचा मलिक यांचा हा बाणाच म्हादईच्या संदर्भात गोव्याच्या मदतीला धावून आला आहे. म्हादईचे पाणी जर कमी झाले, तर खाड्यांतील खार्‍या पाण्याची पातळी वाढेल आणि त्याचा परिणाम म्हणून भूजलातही क्षाराचे प्रमाण वाढेल असा इशारा राज्यपालांनी वरील मुलाखतीमध्ये दिलेला आहे. वास्तविक, राज्यातील पर्यावरणप्रेमींनी आणि तथाकथित संशोधकांनी म्हादईच्या विषयामध्ये अधिक आक्रमकपणे समोर येऊन सरकारला त्याच्या गाफिलपणाबद्दल जाब विचारणे अपेक्षित आहे, परंतु त्यांना तर सरकारला फैलावर घेण्यापेक्षा सरकारी समित्यांत अधिक रस दिसतो. म्हादईचा लढा गेली तीन दशके लढत आलेल्या म्हादई बचाव अभियानानेही एकाएकी आपली सगळी अस्रे आणि शस्त्रे म्हादई बचाव आंदोलनाकडे सुपूर्द करून वानप्रस्थाश्रम स्वीकारला आहे. म्हादई बचाव आंदोलनाचे व्यासपीठ हे राजकीय व्यासपीठ आहे, त्यामुळे त्याला त्याच्या मर्यादा आहेत. त्यांनी सरकारला दिलेली सात दिवसांची मुदत तर केव्हाच उलटून गेली आहे. म्हादईचा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्याने जावडेकरांच्या पत्राला काही अर्थ नाही हे मंत्री फिलीप नेरी यांचे म्हणणे हास्यास्पद आहे. एकीकडे तुम्ही त्या पत्राचा काही परिणाम होणार नाही म्हणता आणि दुसरीकडे कर्नाटकने पाणी वळवल्याची कबुलीही देता? जावडेकरांवर भरवसा ठेवून राज्य सरकार स्वतःचे असे कुठवर हसे करून घेत राहणार आहे? कॉंग्रेसच्या मागील सरकारवर दोषारोप केल्याने विद्यमान सरकारची जबाबदारी संपत नाही. म्हादईच्या विषयामध्ये राज्य सरकारचा कस लागलेला आहे. त्या कसाला उतरता आले नाही तर जावडेकरांच्या मागून म्हादई प्रश्नी आपलीही विश्वासार्हता गमावण्याची वेळ आता फार दूर नाही!