शिशिरातील दमा व उपचार

0
604
  •  डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

हिवाळा आला म्हणजे दमेकर्‍यांनी तसेच इतर रुग्णांनीसुद्धा स्वतःला सांभाळणे गरजेचे आहे. हिवाळ्यात हवा कोरडी असते. कोरड्या हवेमुळे श्‍वास घेताना अडथळा निर्माण होतो. आयुर्वेद शास्त्रानुसार कडाक्याची थंडी घेऊन येतो तो शिशिर ऋतु.

श्‍वासाचा वेग बर्‍याच वेळा रात्री येत असल्याने व जेवणानंतर स्वाभाविक कफप्रकोप होत असल्याने रोग्याने रात्रीचे जेवण टाळले पाहिजे. सायंकाळी लवकर व तोही अल्पप्रमाणात- लघु द्रव असा आहार घेतला पाहिजे.

सर्दी-खोकल्याबरोबर सध्या दम्याचा त्रासही डोके वर काढताना दिसत आहे. दिवसेंदिवस दम्याच्या रुग्णांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. वाढते प्रदूषण हे या रोगाचे मुख्य कारण आहे. दूषित वातावरणामुळे हवेतील धुलीकण श्‍वसनामध्ये अडथळे निर्माण करत आहे. परिसरातील अस्वच्छता, बांधकामे, कारखान्यातील धूर, अति प्रमाणात वाहनांची ये-जा, इ. कारणांनी हवेत प्रदूषण होत आहे व ही प्रदूषित हवा जेव्हा श्‍वसनामार्फत आपल्या शरिरात घेतो तेव्हा श्‍वसनामध्येच नव्हे तर दैनंदिन कामामध्येसुद्धा अडथळे येण्यास सुरुवात होते आणि याच्यामुळेच दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येते. सध्या ज्याच्या त्याच्या हातामध्ये इन्हेलेशन पम्प दिसत आहेत. बालदम्याचेही प्रमाण चिंताजनकरीत्या वाढलेले आढळते.

हिवाळा आला म्हणजे दमेकर्‍यांनी तसेच इतर रुग्णांनीसुद्धा स्वतःला सांभाळणे गरजेचे आहे. हिवाळ्यात हवा कोरडी असते. कोरड्या हवेमुळे श्‍वास घेताना अडथळा निर्माण होतो. आयुर्वेद शास्त्रानुसार कडाक्याची थंडी घेऊन येतो तो शिशिर ऋतु. मराठी महिन्यानुसार पौष- माघ- अर्धा फाल्गुन हा शिशिर ऋतुचा साधारण कालावधी. शिशिर ऋतु सुरू झाल्याच्या लक्षणांमध्ये कडाक्याची बोचरी थंडी पडणे, गार वारे वाहू लागणे, धुके अधिक दाट होणे ही प्रामुख्याने दिसून येतात. वातावरण अधिकाधिक थंड होत असल्याने शरीरात कफ दोष साठावयास सुरुवात होते. थंडीबरोबरच वातावरणात कोरडेपणाही वाढत असल्याने या ऋतुमध्ये शरीरात वातही वाढतो. अशा या अवस्थेत मुळात दम्याच्या रुग्णांना श्‍वसनमार्गात सुज आल्यामुळे फुप्फुसापर्यंत प्राणवायु पोचण्यात अडथळे येत असताना, कोरड्या हवेमुळे हा त्रास बळावतो आणि दम्याचा झटका येण्याचे प्रमाण वाढते. श्‍वासनलिकेवर सुज आल्याने अथवा श्‍वासनलिकेत एक चिकट पदार्थ जास्त प्रमाणात स्रवित झाल्यामुळे श्‍वासनलिकेचा मार्ग अरुंद होऊन श्‍वासोच्छ्वासाची प्रक्रिया त्रासदायक होते. ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला म्हणूनच डॉक्टर देतात. थंड हवेमुळे हिवाळ्यात दमा असलेल्या लोकांना श्‍वास घेताना त्रास होऊ शकतो. छातीत कफ साठण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो.

थंड आणि दमट हवेमुळे दम्याचा त्रास आणखी वाढत असून श्‍वसनामध्ये अडथळे निर्माण करणारा ठरतो. श्‍वसननलिकेवाटे शरीरात आलेल्या हवेतील ऑक्सीजन पेशींपर्यंत पोचवण्याचे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडण्याचे काम फुफ्फुसे करतात. मात्र दमा या आजारात श्‍वसनमार्गाला सुज आल्यामुळे ही वाहिनी आकुंचन पावते आणि ऑक्सीजन योग्य प्रमाणात फुफ्फुसापर्यंत पोचण्यास आणि कार्बन डायॉक्साइड बाहेर पडण्यास अडथळा येतो. श्‍वसनमार्गात कफ चिकटून राहिल्यामुळे श्‍वासोच्छ्वास करण्यास अडथळा निर्माण होतो. सतत खोकला येणे आणि कफ जमा होणे यामुळे रुग्ण त्रस्त होतो. त्यात हिवाळ्यात कोरडे वातावरण असल्यामुळे दमा नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वाढते.

आयुर्वेद शास्त्राप्रमाणे ज्या व्याधीमध्ये वायुला उर्ध्वगती प्राप्त होत असते तो व्याधी म्हणजे ‘श्‍वास’, ज्याला व्यावहारिक भाषेत दमा म्हणतात. लोहाराचा भाता जोराने फुंकला असता ज्याप्रमाणे आवाज करत वायु बाहेर पडतो त्याप्रमाणे श्‍वासोच्छ्वास हा सशब्द व अवरोधपूर्ण असतो. यामध्ये श्‍वासोच्छ्वासाची प्रति मिनिट गती वाढत असते.
हा एक प्राणवह स्रोतसाचा व्याधी आहे. यामध्ये श्‍वासावरोध हे लक्षण निर्माण झाल्याने शरीरास होणारा बाह्य सृष्टीतील प्राणवायुचा पुरवठा योग्य तर्‍हेने होऊ शकत नाही. रक्ताबरोबर सर्व शरीरात संचार करून जीवनाचे कार्य घडवून आणणारा प्राणवायु अपुरा झाल्याने प्राणाचे भय उत्पन्न होते. रुग्ण हा अधिकाधिक प्राणवायु ग्रहण करण्याचे प्रयत्न करतो. याचीच परिणती श्‍वासोच्छ्वासाची गती वाढण्यात होते.

दमा रोगाची सामान्य कारणे –
– धूर, धुळ, वावटळ, अतिशीत प्रदेशात राहणे.
– गार पाणी पिणे
– अतिव्यायाम करणे
– रुक्षान्न सेवन
– विषमाशन
– शरीरात आमोत्पत्ती अधिक प्रमाणात होणे
– अपतर्पण
– रौक्ष्य वाढणे
– दौर्बल्य
याशिवाय आहारात पावटा, उडीद, तिळाची पेंड, तिळाचे तेल, पिष्टमय पदार्थ, अवष्टंभ करणारी द्रव्ये, विदाही – गुरू पदार्थ, आतूप – औदक मांस, कच्चे दूध, अभिष्यंदी, कफकर पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करणे इ.
हिवाळ्यात, विशेषतः शिशिर ऋतुत ह्या सर्व कारणांची जोड जर मिळाली तर व्याधी स्वरूप अजूनच बिघडते व दम्याचा त्रास अतिशय वाढतो.

दम्यामधील सामान्य लक्षणे…
– आनाह, पार्श्‍वशूल, हृत्‌पिडा, श्‍वास बाहेर सोडताना त्रास होणे, अन्नावर वासना नसणे, अरुचि, आध्मान, श्‍वासवेगाच्या वेळी डोळ्यांसमोर अंधारी येते. बर्‍याच वेळा श्‍वासाचे वेग रात्रीच्या वेळी अधिक येतात. वेग आला असताना कास हे लक्षण प्रामुख्याने असते. खोकल्याची ढास लागते. कफ मात्र लवकर सुटत नाही. जीव कासावीस होतो. कफ पडून गेला की थोडावेळ आराम वाटतो. पुन्हा थोड्याशाच प्रमाणात पुन्हा खोकला सुरू होतो.
– घसा सतत खवखवत असतो.
– बोलणे सकष्ट होते
– रुग्णास झोपले असता अधिक श्‍वास वाढतो व उठून बसले असता बरे वाटते. उठून बसले असता प्राणवह स्रोतसात असणारा कफ, त्याच्या अधोगामी स्वभावामुळे केवळ खालच्या बाजूस राहतो व अवरोध त्यामानाने कमी प्रमाणात असतो. याउलट आडवे पडले असता हा विमार्ग कफ प्राणवह स्रोतस संपूर्ण व्यापून राहतो व त्यामुळे साहजिकच अधिक अवरोध, प्राणाचे अधिक प्रमाणात प्रतिलोम होणे व पर्यायाने श्‍वासवेग वाढणे घडत राहते.
हिवाळ्यात होणार्‍या या दम्यासाठी चिकित्सा व उपाय
वेगकालीन चिकित्सा –
* वेग आला असता व रोगी बलवान असल्यास वमन, विरेचन, धूम इत्यादी सर्व प्रकारचे उपचार हितकर ठरतात.
* रोगी दुर्बल असल्यास त्यास शोधन उपक्रम न करता केवळ शमन उपचार करावेत. त्यास स्नेह, मूष, रस आदींच्या सहाय्याने संतर्पण करावे.
* कफ दोष उत्क्लिष्ट नसेल, रोगी दुर्बल असेल अशा अवस्थेत स्वेदन न करता शोधनोपक्रम केले तर वातप्रकोपाची शक्यता असते.
* कफभूपिष्ठ दम्यात वमनाचा उत्तम उपयोग होतो.
* वमनापूर्वी छातीला मीठ व तेल यांनी अभ्यंग करावे.
* अभ्यंतर स्नेहासाठी तिळतैल वापरावे.
* स्निग्ध द्रव्यांनीच स्वेदन करावे. यामुळे ग्रथित कफाचे विलयन होऊन तो पातळ होतो, सुटा होतो. स्रोतसे मृदु होतात. वातानुलोमनही घडते. अशावेळी रुग्णास पुन्हा स्निग्ध पदार्थ खाण्यास देऊन कफोत्क्लेश करावा व वमन द्यावे.
* वमनामुळे दुष्ट, स्त्यान, ग्रथित असा कफ पडून जातो व स्रोतसे मोकळी झाल्यामुळे लगेच खास वेग कमी होतो.
* वमनानंतर काही शेष दोष कंठप्रदेशी लीन होऊन राहणे शक्य असते. त्यासाठी धूमपान करून त्या दोषांचे शमन करावे.
* दम्याच्या चिकित्सेत विरेचन चिकित्साही उपयुक्त ठरते. दम्यामध्ये प्राणवायुला प्रतिलोम गती प्राप्त झालेली असते. प्राणाची प्राकृत गती अधोगामी स्वरुपाची असते. विरेचनाने प्राणास त्याची ही प्राकृत गती प्राप्त करून दिली जाते. शिवाय विरेचन हा कफावरील एक महत्त्वाचा असा उपक्रम आहे.
– शोधनोपचारानंतर शमन उपचार करावेत.
– वातप्रधान दमा असल्यास खोकला हे लक्षण फार मोठ्या प्रमाणात असले तरी कफष्ठीवन मात्र फारसे असत नाही. रोग्याला ढास लागते. बराच वेळ खोकल्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात कफ सुटतो. रुग्ण अत्यंत बेचैन असतो. उरःपरीक्षणात सर्वत्र वातध्वनी ऐकू येतात. या अशा अवस्थेत स्नेहपान ही महत्त्वाची चिकित्सा ठरते. तिळतेल २-२ चमचे गरम करून किंवा गरम पाण्याबरोबर वारंवार दिल्याने फायदा होतो. चंदनबलाक्षादि तेल किंवा नारायण तेल यांचाही चांगला उपयोग होतो.
– कफप्रधान श्‍वासामध्ये कफष्ठीवन पुष्कळ प्रमाणात असते. फुफ्फुसात सर्वत्र कफध्वनी मिळतात. या रोग्यास उष्ण, रुक्ष, कफघ्न असे उपचार करणे लाभदायी ठरते.
– बाह्य स्नेह, स्वेद अपेक्षित असतो. यामुळे कफाचे विलयन होण्यास मदत होते.
– कनकासवसारखे औषध वारंवार दोन-दोन तासांनी घेतल्यास दम्याचा वेग कमी होतो.
यष्टीमधु चूर्णही वारंवार दोन-दोन तासांनी साधारण पाव चमचा तोंडात घालून चघळत राहिल्यास उत्तम परिणाम मिळतो.
अवेगकालीन चिकित्सा –
– अवेगकालीन अवस्थेत म्हणजेच वेगमध्यकालामध्ये मुख्यतः स्थानाला बल देणारी रसायन चिकित्सा करावी. प्राणवह स्रोतसाला बल प्राप्त होण्यासाठी चौसष्ठी पिंपळी किंवा वर्धमान पिंपळी प्रयोग लाभदायक ठरतो.
– आमलकीचे विविध कल्प हे फुफ्फुसाला बल देणार्‍या द्रव्यात अग्रगण्य समजले जातात. च्यवनप्राशावलेह, धात्री अवलेह हे विशेष लाभदायी ठरतात.
– दम्याच्या रुग्णाने रोज सकाळी च्यवनप्राश सेवन करावा.
शिशिरातील दम्याची विशेष काळजी-
– सकाळी बाहेर जाताना कानटोपी – मफलरचा उपयोग करावा.
– उठल्या उठल्या चेहर्‍यावर थंड पाण्याचा भपका मारू नये.
– सकाळी उठताच तिळतेलामध्ये हाताचे बोट बुडवून ते तेलाचे बोट दोन्ही नाकपुडीत फिरवावे व तेलाने नाकाचे लेपन करावे.
– सकाळी अनशापोटी १-२ चमचे तिळतेल गरम पाण्याबरोबर घ्यावे.
– एरंडतेल गव्हाच्या पीठात घालून त्याची चपाती किंवा भाकरी खावी,
– च्यवनप्राश किंवा धात्री अवलेह रोज सकाळी सेवन करावे.
– गुडूची हेही चांगले रसायन असल्याने, गुडूची घनवटी, किंवा गुडूची स्वरस नेहमी सेवन करावा.
दम्यामध्ये मुख्यतः सांभाळावे लागते ते पथ्यापथ्य. वात व कफाचा प्रकोप न होईल याची काळजी रुग्णाने सतत घेतली पाहिजे. धूर, धुळ, गार वारा यांपासून दूर राहिले पाहिजे.
– शीत, विदाही, अग्निमांद्यकर असे पदार्थ सेवन करणे टाळले पाहिजे.
– श्‍वासाचा वेग बर्‍याच वेळा रात्री येत असल्याने व जेवणानंतर स्वाभाविक कफप्रकोप होत असल्याने रोग्याने रात्रीचे जेवण टाळले पाहिजे. सायंकाळी लवकर व तोही अल्पप्रमाणात- लघु द्रव असा आहार घेतला पाहिजे.
– आहारात द्रव, उष्ण, लघु, दीपन-पाचन करणारी द्रव्ये अधिक प्रमाणात हवीत.
– लसूण, आले दररोज आहारात जरूर असले पाहिजे.
– स्नान व पानासाठीही गरम पाणी वापरावे.
– सर्व प्रकारचे अभिष्यंदी पदार्थ विशेषतः दही, मासे, आंबवून केलेले पदार्थ (इडली, डोसा, ब्रेड इ.) हे अपथ्यकर ठरतात. त्यांचे सेवन करू नये.