क्रीडा क्षेत्रातील करिअर

0
345

– नागेश एस. सरदेसाई (वास्को)

अलीकडील रिओ ऑलिम्पिकमधील आपल्या मुलींनी केलेली खेळातील कामगिरी आपल्याला क्रीडा क्षेत्रात अच्छे दिनचे स्वप्न पुरे करण्यास बळ देणारे आहे… मग खेळ कोणतेही असोत- एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स किंवा २०२० मधील टोकियो येथील ऑलिम्पिक गेम्स! म्हणूनच करिअर करण्यास क्रीडा क्षेत्रात भरपूर संधी आहेत.

स्पोर्टस् मेडिसीनमुळे आज खेळताना होणार्‍या भीषण किंवा अपंग बनविणार्‍या आघातांपासून खेळाडूंची सुटका होते किंवा त्याचे करिअर वाचवता येते. आजच्या काळात स्पोर्टस् मेडिसीनची गरज आहे कां? सध्याच्या घडीला खेळताना होणार्‍या दुखापतींमध्ये सर्वांत जास्त आढळणारे शारीरिक इजा – अँकल स्प्रेन (घोट्याला दुखापत); जांघेतील सांधा ओढला जाणे (ग्रोइन पुल); पायाच्या मागील स्नायूवर ताण (हॅमस्ट्रिंग स्ट्रेन); शिन स्प्लिंट्‌स इजा म्हणजे गुडघ्याच्या खालील शिरेवर इजा (धावपटूंमध्ये आढळते), गुडघ्याच्या दुखापती; लिगामेंट तुटणे, आणि टेनिस एल्बो.
खेळताना होणार्‍या वरील दुखापती किंवा इजा या जिममध्ये दररोज वर्कआउट करून अथवा आठवड्याच्या शेवटच्या दिवसात वर्क आउट करून टाळता येऊ शकतात. प्रत्येक वर्कआउट ही वॉर्म अपच्या व्यायामांपासून सुरू व्हायला हवी. प्रत्येक खेळ सुरू होण्याच्या अर्धा तास आधी हे वॉर्म अप व्हायला हवे. सगळ्या प्रमुख स्नायुंकरिता स्ट्रेचिंगचे व्यायाम अतिशय आवश्यक आहेत. खेळल्यानंतर मात्र कुलिंग डाउनचे व्यायाम करणे गरजेचे असते. खेळताना होणार्‍या सगळ्या इजा ह्या खालील उपायांनी बर्‍या होतात जसे – एक म्हणजे – कॉम्प्रेशन म्हणजे दाब. म्हणजे त्यावर प्लास्टर किंवा क्रेप बँडेज बांधून ठेवणे.
दुसरे म्हणजे बर्फ. एक तर आजकाल आईस बॅग्ज मिळतात किंवा कॉटनच्या कपड्यात बर्फाचा चुरा किंवा खडे घेऊन त्या भागावर फिरवणे आणि तिसरे म्हणजे त्या इजा झालेल्या भागाला आराम देणे (रेस्ट). परंतु घोट्याला झालेल्या इजेच्या संदर्भात त्या सांध्याला हलका व्यायाम किंवा सांध्यामध्ये लवचिकता व शक्ती रहावी म्हणून सांधा हलवणे गरजेचे असते. हॅमस्ट्रिंगच्या इजा या हळूहळू भरतात कारण चालताना त्याच्यावर कायम ताण पडत असतो. यामध्ये संपूर्ण बरे होण्यास सहा महिने ते एक वर्षसुद्धा लागू शकते.
शिन स्प्लिंट्‌समध्ये गुडघ्याच्या खालील समोरील भागातील हाडाच्या शिरेला मार लागलेला असतो. त्यामुळे त्याला आराम, बर्फ आणि वेदनाशामक गोळ्या यांची गरज असते.
स्पोर्टस् मेडिसीनमधील करिअरबद्दल अनेकांना माहीत नसल्यामुळे बर्‍याच उमलणार्‍या किंवा तरुण खेळाडूंचेही करिअर संपून जाते. आपल्या गोव्यामध्ये स्पोर्टस् सायन्स, स्पोर्टस् मेडिसीन यांचे बारसे अजून व्हायचे आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पुनर्वसनाचे महत्त्व समजायला हवे. स्पोर्टस् मेडिसीन म्हणजे फिजिओथेरपी नाही… हे एकट्याने लक्षात घ्यायला हवे. स्पोर्टस् ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत येणार्‍या स्पोर्टस् मेडिसीनच्या सुविधा पटियाला येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस् येथे उपलब्ध आहेत. या सुविधा विशेष कॅटेगरीतील आहेत कारण त्यामध्ये मेडिसीन, फिजिऑलॉजी तसेच सायकॉलॉजीचा अंतर्भाव आहे. पुणे येथे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफ्‌एम्‌सी) येथे भव्य स्पोर्ट मेडिसीनच्या सोयी-सुविधा आहेत ज्या संरक्षण दलाच्या जवानांसाठी उपयोगी पडतात.
गोवा राज्यामध्येही स्पोर्टस् सायन्स आणि रिसर्च सेंटर पेड्डे-म्हापसा येथे आहे जेथे सायको-डायग्नोस्टिक सेंटर आणि बायोफीडबॅक युनिट्‌स आहेत. पण स्पोर्टस् सायन्सच्या इतर शाखांचा अभाव आहे. आपल्या खेळाडूंकरता आणि क्रीडा अधिकार्‍यांकरता प्रथमोपचार सेवेची सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे जेथे त्यांना झालेल्या दुखापतींची तसेच भावनिक दुखापतींची लगेच काळजी घेतली जाईल. खेळाशी संबंधित अधिकार्‍यांनी क्रीडा व्यावसायिकांच्या वाढत्या मागण्या लक्षात घेऊन त्यानुसार राज्यात सोयी-सुविधा निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. सध्याच्या घडीला राज्यात भरपूर प्रमाणात विविध खेळांच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत. आपल्याकडील बरेच कुस्तीगीर हे राष्ट्रीय शालेय खेळ, खुल्या राष्ट्रीय आणि लुसोफोनिया किंवा आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये चमकले आहेत. पण स्पोर्ट मेडिसीनविषयी अपुरी माहिती असल्यामुळे बर्‍याच उमलत्या खेळाडूंचे खेळातील करिअर धोक्यात येऊ शकते. सध्या गोव्यामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे पुनर्वसनाचे आणि खेळाच्या विज्ञानाचे महत्त्व जाणून घेणे! खेळाच्या क्षेत्रातील सगळ्या पातळ्यांवर योग्यरीत्या जनजागृती करण्यात आपण यशस्वी झालो तर बर्‍याच खेळाडूंची जास्तीत जास्त काळजी घेतली जाऊन त्यांचे करिअर वाचवण्यात त्यांना यश मिळू शकेल.
‘‘स्पोर्टस्’’ म्हणजेच ‘‘क्रीडा किंवा खेळ’’ हे क्षेत्र बर्‍याच करिअरच्या संधी उपलब्ध करून देते. क्रीडा शिक्षकाला विविध शाळा, कॉलेजेस, विद्यापीठांमध्ये संधी मिळू शकते. शाळांमध्ये एक क्रीडा प्रशिक्षक किंवा फिजिकल एज्युकेशन टीचर विद्यार्थ्याचे चारित्र्य घडविण्यास, शारीरिक स्वास्थ्य राखण्यास आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणण्यात मदत करतो. तसेच स्पोर्टस्‌मनशिप स्पिरीट म्हणजेच खिलाडू वृत्तीसुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात तो स्थापित करू शकतो. शाळेत शिक्षक होण्याकरता कुणालाही बीपीएड – बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन – दोन वर्षांचा कोर्स करावाच लागतो. हा कोर्स पदवी घेतल्यानंतरही करता येतो. कला, विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर हा कोर्स करू शकतो.
उच्च माध्यमिक पातळीवरील क्रीडा शिक्षक बनण्यासाठी एकट्याला मास्टर म्हणजेच उच्च पदवी – (एम्‌पीएड्) प्राप्त करणे गरजेचे असते. गोव्यामध्ये एकच कॉलेज आहे – पणजी येथील डॉन बॉस्को कॉलेज जेथे बीपीएडचा कोर्स उपलब्ध आहे. त्यात ५० जागा आहेत.
डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन- शाळा किंवा कॉलेज पातळीवर – फिजिकल एज्यु.मध्ये उच्चपदवी तीसुद्धा ५५% गुण (बी-ग्रेड) असणे आवश्यक असून नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (एन.इ.टी.) ची परीक्षा – युनिव्हर्सिटी ग्रान्ट कमिशन, नवी दिल्ली किंवा स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट – (एस.इ.टी.) – जी सावित्रिबाई फुले विद्यापीठ, पुणे येथून यशस्वीपणे पार केलेली असावी लागते.
खेळातील मार्गदर्शक (कोच) किंवा गुरू बनूनही खेळात करिअर करता येते. भारत रत्न सचीन तेंडुलकरचे गुरू रमाकांत आचरेकर यांनी जागतिक पातळीवर श्रेष्ठत्व मिळविलेले आहे. पी.टी. उषा, विराट कोहली आणि इतर बर्‍याच उच्चतम खेळाडूंनाही गुरु-शिष्य परंपरेनुसार गुरू किंवा प्रशिक्षक मिळाले आहेत जे आपल्या देशाने जगाला दिलेली देणगी आहे. कोच किंवा प्रशिक्षक बनण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस्, पतियाला-पंजाब या संस्थेमध्ये प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यानंतर त्याला राज्य पातळीवर क्रीडा संचालनालयातर्फे त्या त्या खेळाचे प्रशिक्षक म्हणून नेमले जाते. नॅशनल पातळीवर त्यांच्या राष्ट्रीय किंवा विभागीय केंद्रावर कोच म्हणून भारतीय क्रीडा अधिकार्‍याकडून नियुक्ती केली जाते.
२९ ऑगस्ट – नॅशनल स्पोर्टस् डे – मेजर ध्यान चंद यांचा जन्मदिवस ज्यांनी हॉकी या खेळाद्वारे सार्‍या जगाला वेड लावले…आणि त्यांचे नाव नॅशनल स्टेडियमलाही देण्यात आले आहे. या दिवशी खेळात नैपुण्य मिळविणार्‍या खेळाडूंना गौरविले जाते. याशिवाय देशातर्फे खेळातील सर्वोच्च असा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार हा दरवर्षी खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूला देण्यात येतो ज्यामध्ये ७.५ लाख रुपये रोख असतात. त्याशिवाय अर्जुन पुरस्कारही विविध खेळांमध्ये उत्कृष्ट खेळाडूला दरवर्षी देण्यात येतो.
अलीकडील रिओ ऑलिम्पिकमधील आपल्या मुलींनी केलेली खेळातील कामगिरी आपल्याला क्रीडा क्षेत्रात अच्छे दिनचे स्वप्न पुरे करण्यास बळ देणारे आहे… मग खेळ कोणतेही असोत- एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स किंवा २०२० मधील टोकियो येथील ऑलिम्पिक गेम्स! म्हणूनच करिअर करण्यास क्रीडा क्षेत्रात भरपूर संधी आहेत.