मुकी व्यथा

0
133

– अनिल लाड

माझ्या डोळ्यातून पाणी आलं. काय ही दशा… अशी सुशिक्षित माणसं वाया जाऊ लागली तर देशाचं पुढे काय होणार? हाच नव्हे, अशी कितीतरी माणसं असतील जी या-त्या कारणाने रस्त्यावर आली असतील. त्यांना कोण जाणून घेणार? त्यांच्या व्यथा कोण ऐकणार? त्यांना मायेच्या पदराखाली कोण घेणार? 

तो गोणपाटावर निवांत पडला होता. त्याचे डोळे शेजारच्या झाडाकडे लागले होते. झाडावर कावळ्यांनी गलका केला होता. तेवढ्यात एक पावाचा तुकडा टुपकन् खाली पडला. त्याने तो पाहिला आणि धावत जाऊन त्यावर झडप घातली. तुकडा पटापट तोंडात कोंबून तो पुन्हा झाडाकडे डोळे लावून बसला. जसा एखादा कोळी टपून बसावा आणि भक्ष्य आवाक्यात येताच त्यावर झडप घालावी तसाच काहीसा हा प्रकार. केव्हा केव्हा हे झाड असेच काहीतरी त्याला द्यायचे. त्याच्यासाठी जणू ते खाऊचेच झाड होते!
कितीतरी वर्षे तो त्या झाडाशेजारी असलेल्या बसस्टॉपच्या शेडचा आसरा घेऊन होता. ते त्याच्यासाठी घरच झाले होते. तोच त्याचा संसार. एक फाटकी कांबळ, गोणपाट आणि एक कळकट-मळकट थाळी. कधीकाळी अंगावर चढवलेल्या त्या कपड्यांचा वास सोसवत नव्हता.
तो मला नेहमीच दिसायचा. हुरहुर वाटायची. कधी खाऊ पुढे केला तर घ्यायचा आणि लागलीच पुडी सोडवून बोटे चोखत खायचा. कधी कुणाशी बोलत नव्हता की कुणाकडे मागत नव्हता. त्याची कुठली भाषा हेही मला ठावूक नव्हते. कधी विचारण्याचंही धाडस मी केलं नाही.
एकदा तो असाच काहीतरी खात बसला होता. त्याच्या शेजारी एक कुत्र्याचं पिल्लू शेपटी हलवत घुटमळत होतं. त्यालाही हा श्‍वानदारचा माणूस आवडला असावा. त्याने त्याला जवळ घेतलं, त्याची पाट थोपटली आणि आपल्या पुढ्यातले अन्न त्याला भरवू लागला. दोघेही आळीपाळीने एकाच थाळीत खाऊ लागले.
त्या माणसाला आपण माणूस आहोत याचा जणू विसरच पडला असावा. एक दिवस एक सुटाबुटातला माणूस गाडीतून उतरला. त्याने त्याच्यासाठी काही खायला आणले होते. त्याने ते पुढे करताच तो माणूस त्याच्या चेहर्‍याकडे टकमट पाहत राहिला. मला आश्‍चर्य वाटले. तो तसा कुणाला कधी पाहताना मी पाहिले नव्हते. मी थोडा पुढे सरकून शेजारच्या हॉटेलमध्ये शिरलो. चहा घेता घेता मी त्यांना न्याहाळत होतो. हॉटेलच्या काऊंटरवर बसलेल्या माणसाच्या हे ध्यानात आले असावे. तो माझ्याकडे पाहून म्हणाला, ‘‘आज त्याचा भाऊ काहीतरी घेऊन आला आसावा.’’ ‘भाऊ’ हा शब्द ऐकून मी बुचकळ्यात पडलो. तो पुढे म्हणाला, ‘‘येतो एकदोन दिवसांनी काहीतरी घेऊन. हल्ली काही दिवस दिसला नाही. बहुतेक कुठेतरी गेला असावा काही दिवसांसाठी.’’ मी त्याला म्हटले, ‘‘भाऊ? मी काही समजलो नाही.’’
‘‘हो! त्याचा तो भाऊ आहे. तुम्हाला आश्‍चर्य वाटलं ना? बर्‍याच लोकांना हे माहीत नाही.’’
आता माझं कुतूहल जागं झालं. मी त्याला म्हटलं, ‘‘मग हा माणूस रस्त्यावर कशाला?’’
‘‘पैसा… पैसा फार वाईट गोष्ट असते. पैशांसाठी लोक नातीगोती सारं काही विसरतात. चांगल्या घराण्यातला माणूस आहे तो. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल, तो गॅज्युएट आहे. बी.ए. केलंय त्याने इंग्रजीमधून. आईवडील वारली आणि घरातील लोकांनी हाकलून दिलं.’’
‘‘का?’’
‘‘अहो, ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो नोकरीच्या मागे लागला. नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज पाठवले, पण त्याला नोकरी काही मिळाली नाही. दरम्यानच्या काळात आईवडील वारली, त्यामुळे हे उपद्व्याप करायला पैसाही कमी पडू लागला. आता करणार काय? नंतर नंतर तो इतका कंटाळला की त्याने डोक्यावर परिणाम करून घेतला. घरातच बसून राहायचा. उठला तर तोंड असेल त्या बाजूने चालत राहायचा. पुढे पुढे तर त्याला वेडच लागले. मग घरातील माणसांनी त्याला दरवाजाच बंद करून टाकला.
या गोष्टीला दहा वर्षे झाली. आज त्याचं वय चाळीस-पंचेचाळीसाच्या घरात आहे. ज्या दिवशी त्याला घराबाहेर काढलं त्या दिवशी पाऊस होता. हा इकडेतिकडे भटकत इथे पोचला आणि त्या बसस्टॉपच्या आसर्‍याला आला. आता तेच त्याचं घर झालंय. त्याला कुणी पैसे दिले तर रागाला येतो. इंग्रजीमधून फाड फाड शिव्या देतो. खाऊ दिला तर मात्र मुकाट्याने घेतो. उगीच कधी कुणाच्या कळीला जात नाही. कुणी डिवचलंच तर दगड घेऊन त्याच्या मागे लागतो. त्यामुळे त्याच्याजवळ कुणी जातही नाही. आता जो आलाय ना त्याचा भाऊ… त्याला पाहिल्यावर तो खूश होतो. त्याला पाहून मोठ्याने गाऊ लागतो. आता बघालच तुम्ही, तो भाऊ गेला की तो गायला सुरुवात करणार!’’
तेवढ्यात त्याचा भाऊ जायला गाडीत बसला. मग तो मोठमोठ्याने गाऊ लागला… ‘ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हाव आय वंडर व्हॉट यू आर….’
माझ्या डोळ्यातून पाणी आलं. काय ही दशा… अशी सुशिक्षित माणसं वाया जाऊ लागली तर देशाचं पुढे काय होणार? हाच नव्हे, अशी कितीतरी माणसं असतील जी या-त्या कारणाने रस्त्यावर आली असतील. त्यांना कोण जाणून घेणार? त्यांच्या व्यथा कोण ऐकणार? त्यांना मायेच्या पदराखाली कोण घेणार?
बाहेर पाऊस पडत होता. मी छत्री उघडली आणि चालायला लागलो. माझ्या डोक्यात प्रश्‍नांचे मोहोळ उठले होते…
काही दिवसांनी मी तिथून निघालो होतो. मला तिथे लोकांची गर्दी दिसली. काय झालं म्हणून मी पाहायला गेलो तर तो माणूस मेल्याची वार्ता कळली. माझी दोन आसवे तिथे पडली… माझ्यासारखी आणखीही काहीजणांची… त्या आसवांना किंमत मात्र नव्हती!!