मांडला कसला हा बाजार!

0
149

– अनुराधा गानू (आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)

सामान्य माणसाला जगण्यासाठी काय लागतं हो..! आहे त्यात समाधान मानणं जास्त चांगलं. निदान ते आपल्याला विकत तरी घ्यावं लागत नाही. कारण ते मानण्यावरच असतं.
जाऊ दे ना..! आपण कशाला या घोडेबाजारात डोकावून बघायचं. जिथे ‘‘जगनिर्माता विधाता’’च आपल्या भक्तीचा मांडलेला बाजार थांबवू शकत नाही. त्याला उघड्या डोळ्यांनी निमूटपणे हा बाजार बघावा लागतोच ना! मग त्याच्यापुढे आपण काय हो… पामरच बापुडे. खरं की नाही???

मध्यंतरी आम्ही एका देवळात गेलो होतो. जवळजवळ अर्ध्या तासापेक्षा जास्तच वेळ रांगेत उभे होतो. आमच्या पुढे-मागेही बरेच लोक ताटकळत देवदर्शनासाठी रांगेत उभे होते. इतका वेळ रांगेत उभं राहूनही देवदर्शनासाठी किती वेळ मिळेल सांगता यायचं नाही. कारण सगळीकडे लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर दिसत होते की देवापुढे भरपूर गर्दी आणि ढकला-ढकली चालू होती. तिथले पुजारी म्हणा किंवा व्यवस्थापक… एक सेकंदही कुणाला देवापुढे हात जोडून उभं रहायला देत नव्हते. अक्षरशः ‘‘चला.. चला..’’ म्हणून पुढे ढकलत होते. पाऊण तासानंतर आमचा नंबर लागला. हात जोडे.. जोडेपर्यंत आम्हीही ढकलले गेलो. देवाची मूर्ती नीट दिसलीच नाही. बाहेर आल्यावर हीच चर्चा चालू होती. कुणीतरी म्हणाले – काही ठराविक रक्कम भरल्यावर या बाजूच्या दारानं आत जाता येतं. तिथं खूप गर्दी नसते. म्हणून ढकला-ढकलीही नसते. आणि त्या दुसर्‍या बाजूच्या दरवाजानं आत जायला दर आणखी वेगळा आहे. तिथून तुम्ही अगदी सावकाशीनं बसून देवाचे दर्शन घेऊ शकता.
हे असंच काहीसं मोठमोठ्या देवस्थानातूनही चालतं म्हणे! तिरुपती बालाजीच्या देवळात जाऊन येणारे लोकही असंच सांगतात. परवाच ऐकलं. मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायकाच्या देवळात तर गोल्डन कार्ड, सिल्व्हर कार्ड अशी पद्धत आहे म्हणे. गोल्डन कार्डवाल्यांची रांग वेगळी, सिल्व्हर कार्डवाल्यांची रांग वेगळी आणि सामान्य लोकांची रांग वेगळी. एका देवळात असंही बघितलं. एक बाई देवळात देवीची ओटी भरायला आली होती. तिथल्या पुजार्‍यानं तिला सांगितलं ‘‘बाई, एका नारळाची ओटी नाही स्वीकारली जाणार. ओटीसाठी दोन नारळं लागतात.’’ तिनं आणलेलं साहित्य तिथंच ठेवलं. देवीला हात जोडले आणि ती बाई निघून गेली. कदाचित तिच्याकडे दोन नारळं घ्यायला पैसे नसतीलही. पण म्हणून तिची ओटी स्विकारायची की नाही हे कोण ठरवणार? पुजारी की देवी?…
देव भक्तीचा भुकेला असतो असं म्हणतात तर मग त्याच्या दर्शनाचा असा मांडलेला बाजार कसा काय चालतो त्याला? एखाद्याची परिस्थिती नसेल तर मग त्याला देवदर्शन नीट नाहीच का घेता येणार? कां… त्याला तो अधिकारच नाही? देवाच्या भक्तीचा हा असा मांडलेला बाजार देव उघड्या डोळ्यांनी कसा काय बघू शकतो? राजस्थानमध्ये एक कृष्णाचं देऊळ आहे. ‘‘सटोडिया कृष्ण’’. सट्टा-जुगारवाले तिथं जाऊन नवस बोलतात आणि जुगारात जिंकले की पैशांच्या राशी कृष्णाला अर्पण करतात. ही कसली भक्ती आणि हा कसला बाजार. असा बाजार मांडणार्‍यांवर देवाची काठी आवाज न करता का नाही बसत?
हल्लीच एका ओळखीच्या मुलीचे वडील वारले म्हणून भेटायला गेले होते. त्यांचे दिवस वगैरे करायचे होते. शिवाय मरताना शांत लागली होती असं भटजी म्हणाले. त्यामुळे या सगळ्याला आठ-दहा हजार तरी लागतील असं म्हणाले भटजी! हा दर ठरवला कुणी कोण जाणे! ज्या कुटुंबात कमावणारा कुणी नाही, ती मुलगी दर महिन्याला तिला मिळणार्‍या चार-पाच हजारात अख्खं कुटुंब चालवत होती. एकेक दिवस नुसत्या पेजेवर हे कुटुंब राहात होते. तिथेही हे दर ठरवले जातात याचं आश्‍चर्य वाटलं. फक्त दहाव्या दिवसाचा इतका खर्च… दहावा-बारावा मिळून इतका खर्च… आणि शांत वगैरे लागली असेल तर अमुक इतका खर्च..! काय हा बाजार भाव!!
हा सगळा बाजार हल्ली प्रत्येक क्षेत्रात चालतो. एकही क्षेत्र असं नाही की जिथे हा बाजार मांडला जात नाही. शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रासारखी अत्यंत मानाची आणि महत्त्वाची क्षेत्रही यांतून सुटलेली नाहीत. परीक्षेचे पेपर्स फोडायचे आहेत- मग प्रत्येक पेपरचा दर इतका पडेल. दुसर्‍या दुसर्‍या ठिकाणी जाऊन पेपर्स फोडायचे असले तर दर वेगळा. डिग्र्या तर काय दलालांकडून अशाच विकल्या जातात. कोणत्या डिग्रीला किती रुपये… हा दर ठरलेला असतो. ऍडमिशनसाठी किती लाख… हे पण ठरलेलं असतं. ओळखीच्या एका गृहस्थाचा मुलगा इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठी दुसर्‍या राज्यांत गेला होता. नुसत्या प्रवेशासाठी ‘‘पाच लाख’’. मग फी, होस्टेल, जेवणखाण हा खर्च वेगळाच! मग वाटतं… शिक्षण विकत घ्यायला फक्त हुशारी असून उपयोगी नाही तर बाप लखपती असणं आवश्यकच आहे. बरं एवढं करून शिक्षण पूर्ण झालं तरी नोकरीचा बाजार आहेच! साध्या चतुर्थ श्रेणीच्या नोकरीसाठी सध्या एका लाखाचा भाव चालू आहे, असं ऐकलं. मग क्लार्क, सुपरवायझर, अकाउंटंट, ऑफीसर जसजसा तुमच्या नोकरीचा दर्जा वाढत जाईल तसतशी त्याची किंमत वाढत जाते. तसतसा लाखाचा आकडा वाढत जातो.
काही वर्षांपूर्वी ऐकलेली घटना. एका प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमधील एक गृहस्थ आपल्या मुलीला घेऊन ऍडमिशनसाठी त्या कॉलेजमधे गेले होते. टेबलासमोरच्या खुर्चीवर बसलेल्या माणसानं सांगितलं ‘‘पाच लाख’’. मुलीच्या वडीलांनी विचारलं ‘‘थोडे फार कमी करता येतात का बघा ना!’’ खुर्चीवरचा माणूस म्हणाला, ‘‘अहो रांगेत तुमच्या मागे उभा आहे ना त्यानं पाच लाख पन्नास हजार आणले आहेत. कॅश हातात घेऊन उभा आहे तो तुमच्या मागे. परवडतंय तर बघा.’’ हे तो इतक्या सहजपणे सांगत होता… जसं एखाद्या भाजीवालीनं म्हणावं, ‘‘बाई पालकाची जुडी २० रुपयाला एक आहे… परवडतेय तर बघा.’’ हा पाच लाखाचा दर होता होमिओपॅथीचा! मग आयुर्वेदाचा थोडा जास्त आणि एम्‌बीबीएस्‌चा भाव किती असेल कोण जाणे? जसं कोथिंबीर जुडी २० रुपये आणि मेथी जुडी २५ रुपये… असाच हा मेडिकल कॉलेजेसचा बाजार! आणि आपण… आवश्यक म्हणून जशी महाग असली तरी भाजी घेतोच ना, तसंच भविष्यात जास्त पैसे मिळविण्यासाठी कितीही दर असला तरी ऍडमिशन घेणे आवश्यकच असतं. त्यांतल्या एका डॉक्टरकडे तुम्ही गेलात की तो तर तुमच्याकडून भरपूर फी उकळतोच… शिवाय इतक्या तपासण्या करायला लावतो की त्याच्या पूर्ण ग्रुपची पैशांची सोय करतो. या अशाच काहीशा कारणामुळे मुंबईच्या एका हॉस्पिटलमधून चार-पाच डॉक्टर्सना निलंबित केले गेले असं नुकतंच वाचनात आलं. असाच माणसाच्या जिवाशी खेळण्याचा बाजार औषधी कंपन्यांकडूनही खेळला जातो.
आता हे सगळं सगळं तक्रार म्हणून तुम्ही नोंदवायला पोलीस स्टेशनमध्ये गेलात तर फक्त तक्रार नोंदविण्याचा दर वेगळा आणि ती किंमत चुकविल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार तरी कसे? मग पुढे कोर्ट-कचेरी, पुरावा-निर्णय-कारवाई यांचे दर वेगळे वेगळे! वर्तमानपत्रात अशा बातम्या नेहमीच वाचायला मिळतात. कायदा मोडणार्‍यासाठीही दर वेगवेगळे असतात. जर तुम्ही सामान्य माणूस असाल आणि तुम्ही कायदा मोडला आणि जर तुम्हाला शिक्षा व्हायला नको असेल तर तुमच्यासाठी दर वेगळा. जर तुम्ही राजकारणी असाल तर भरायची किंमत वेगळी आणि जर तुम्ही नट वगैरे असाल तर भाव आणखी वेगळा. तुम्ही जितके मोठे असाल तितका तुमचा दर कमी.
आमच्या राजकारणात तर अक्षरशः घोडेबाजार चालू असतो. ही गोष्ट आता सर्वसामान्यांपासून लपून राहिलेली नाही. हा बाजार सर्वसाधारणपणे निवडणुकांच्या पुढे-मागे भरलेला आढळतो. पक्षबदलूंसाठी हा बाजार महत्त्वाचा आहे. त्या त्या भागात तुमचं वजन (किलोमध्ये नव्हे) किती असेल आणि तुम्ही विकत घेणार्‍या पक्षाचा लौकीक किती असेल, शिवाय तुम्हाला कोणत्या खात्याचे मंत्रिपद हवे असेल तर त्याप्रमाणे हे दर ठरलेले असतात. अर्थात थोडी घासाघीस केली तर हा भाव थोडा कमी-जास्त होऊ शकतो. मतदारांसाठी तर या बाजाराला जास्तच महत्त्व आहे. कोणत्या वस्तीत ही खरेदी-विक्री चालते, त्याप्रमाणे दर माणसाला हा दर वेगळा असतो. प्रचार करणार्‍यांचाही दर कोणत्या भागात प्रचार करायचा यावर अवलंबून असतो. ही खरेदी-विक्रीची प्रक्रिया पार दिल्लीपासून गल्लीपर्यंत चालू असते. शिवाय ही प्रक्रिया रोख रकमेतून होत असल्यामुळे याचा पुरावा सापडत नाही. पण प्रसार माध्यमं गप्प कुठे असतात! त्याचा छडा लावल्याशिवाय ते राहात नाहीत. इतकंच कशाला… आपल्या संरक्षण खात्यामधून महत्त्वाची कागदंपत्रं बाहेर पडतात ती काय अशी फुकटातंच? क्रीडा क्षेत्रातही तेच! ‘‘मॅच फिक्सींग’’ म्हणजे तरी दुसरं-तिसरं काय असतं?
हे सगळे बाजार परवडले. पण आपल्याकडे सर्वांत घृणास्पद बाजार म्हणजे वेश्याव्यवसाय. स्त्रीच्या चारित्र्याचा, तिच्या शीलाचा, तिच्या अब्रूचा बाजार! इथे विकली जाणार असते आपल्याच समाजातील एक स्त्री आणि तिला खरेदी करणारा असतो आपल्याच समाजातील एक पुरुष!! जिच्या उदरी आपण जन्म घेतो, तिलाच आपल्या देहाची विक्री करायला लावणं ही गोष्ट समाजाला निश्‍चितच लांछनास्पद आहे. आपल्या संस्कृतीचाच हा बाजार आहे… लीलाव आहे. पण… याची लाज वाटतेय कुणाला? अहो, माणसाच्या जिवाचीसुद्धा आजकाल किंमत लावली जाते. माणूस जितका मोठा, जितका महत्वाचा… त्याप्रमाणे त्याला मारण्याच्या सुपारीचा दर लावला जातो.
पण काय? आपण आपली सामान्य माणसं. आपण आपले भाजी मंडईत जाणार नाहीतर किराण्याच्या दुकानात! ‘‘एका वस्तूवर एक फ्री’’ मिळाली की खुश होतो आपण. वीस रुपयाला दहा ऐवजी बारा आंबाडे घातले, पन्नास रुपयांना पाच ऐवजी सहा काकड्या मिळाल्या की आनंद मानणारे. मटार साठ रुपयांऐवजी पन्नास रु. किलोे झाले की आनंदाने एक किलो मटार घेऊन येणारे. तुरीची डाळ १८० रु. किलो ऐवजी १६० रु. किलो झाली की आपण खुश!! आणि तसंही… सामान्य माणसाला जगण्यासाठी काय लागतं हो..! आहे त्यात समाधान मानणं जास्त चांगलं. निदान ते आपल्याला विकत तरी घ्यावं लागत नाही. कारण ते मानण्यावरच असतं.
जाऊ दे ना..! आपण कशाला या घोडेबाजारात डोकावून बघायचं. जिथे ‘‘जगनिर्माता विधाता’’च आपल्या भक्तीचा मांडलेला बाजार थांबवू शकत नाही. त्याला उघड्या डोळ्यांनी निमूटपणे हा बाजार बघावा लागतोच ना! मग त्याच्यापुढे आपण काय हो… पामरच बापुडे. खरं की नाही???