विरोधी खासदारांना पुन्हा सायबर हल्ल्याचा संदेश

0
23

विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनी काल मंगळवारी आयफोनवर सरकारपुरस्कृत सायबर हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याचा आरोप केला. केंद्र सरकारने हे आरोप फेटाळले असले, तरी आरोपांची दखल घेत चौकशीचे आदेशही दिले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, शशी थरूर यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांनी पुराव्यादाखल इशाऱ्याचे स्क्रीनशॉट ‘एक्स’ या समाजमाध्यमावर प्रसृत केले.

सदरचा ‘स्क्रीनशॉट’ मोइत्रा यांनी ट्विटरवर प्रसृत केल्यानंतर लगोलग काँग्रेसचे थरूर व पवन खेरा, शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) प्रियंका चतुर्वेदी, आपचे राघव चढ्ढा आणि माकपचे सीताराम येचुरी यांच्यासह अन्य खासदारांनी असेच इशारे मिळाल्याचे जाहीर केले. त्यानंतर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
दरम्यान, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याप्रकरणी ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ (सर्ट-इन) मार्फत चौकशी केली जाईल, असे जाहीर केले. माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याप्रकरणी ‘ॲपल’ने खुलासा करावा असे आवाहन केले आहे.