कोविडस्थिती नियंत्रणात आल्यास यंदा इफ्फी ऑफलाइन : फळदेसाई

0
42

नोव्हेंबरपर्यंत राज्यातील कोविडस्थिती जर नियंत्रणात आली तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ऑफलाईन होणार असल्याचे गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी काल सांगितले. गेल्या वर्षीचा इफ्फी कोविडमुळे विलंबाने आयोजित करण्यात आला व तो ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात संपन्न झाला असे सांगून कोविडमुळे तो ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात आला. शिवाय हा प्रयोग यशस्वीही झाल्याचे फळदेसाई म्हणाले.

यावर्षीचेही इफ्फीचे स्वरूप कोविड स्थितीवरच अवलंबून राहणार असल्याचे यावेळी फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

या आधी इफ्फी आयोजनाची संपूर्ण जबाबदारी माहिती आणि प्रसारण मंत्रालय सांभाळत असे. पण गेल्या तीन वर्षांपासून बरीचशी जबाबदारी ईएसजीच सांभाळत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच स्थानिक कलाकारांनाही प्राधान्य मिळत असल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

राज्यात जोरात चित्रीकरण
सध्या चित्रपट निर्मांत्यांकडून चित्रीकरणासाठी गोव्याला मोठी पसंती मिळत असल्याचे ते म्हणाले. गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून चित्रीकरणास सुरूवात झाली असल्याचे ते म्हणाले. कोविड नियमावली पाळून चित्रीकरणास मान्यता देण्यात येत आहे. त्याचा फायदा गोमंतकीय जनतेस होत असल्याचे ते म्हणाले. मध्यंतरी ईसजीची मान्यता न घेता अनेकांनी मोठ्या प्रमाणात चित्रीकरण केल्याचेही ते म्हणाले.