अफगाणिस्तानात तालिबानविरोधात जनता रस्त्यावर

0
55

>> महिलांचाही सहभाग

>> तालिबानच्या झेड्यांच्या जागी राष्ट्रध्वज फडकावले

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पुन्हा सत्ता स्थापन करत सरकार स्थापनेच्या हालचाली करत आहे. त्याचवेळी अफगाण जनतेने रस्त्यावर उतरत तालिबानच्या राजवटीचा निषेध केला आहे. अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तालिबानची दहशत झुगारून देत नागरिकांनी राजधानी काबूलसह इतर ठिकाणी अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज फडकवला.

काही ठिकाणी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. असाबाद येथे तालिबानींनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाल्याचे वृत्त आहे.
बुधवारी जलालाबादमध्ये तालिबानचा झेंडा हटवून अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज लावण्याची मागणी झाली होती. त्यासाठी शेकडोजण रस्त्यांवर उतरले होते. एके ठिकाणी असलेला तालिबानचा झेंडा काढून अफगाणिस्तानचा झेंडा लावण्यात आला. सरकारी कार्यालये आणि इतर वास्तूंवरील तालिबानचे झेंडे काढण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी तालिबानींना जमाव पांगवण्यासाठी गोळीबारही करावा लागला.
असादाबाद शहरातही अफगाणिस्तानच्या युवकांनी एक मोर्चा काढला. अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज लावण्याची मागणी करणार्‍या जमावावर तालिबान्यांनी गोळीबार केला होता. त्याशिवाय अफगाणिस्तानमधील इतर ठिकाणीही राष्ट्रध्वजासाठी आंदोलन करण्यात आले. राजधानी काबूलमध्येही लोकांनी दहशत झुगारून देत अब्दुल हक चौकात असलेला तालिबानचा झेंडा हटवून अफगाणिस्तानचा झेंडा फडकवला.

अफगाणिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेल्या या आंदोलनात अफगाणिस्तानच्या महिलांचाही सहभाग दिसून आला. काबूलमध्येच मंगळवारी काही महिलांनी शिक्षण, रोजगार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची मागणी करत सशस्त्र तालिबानींसमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाची जगभरात चर्चा झाली. भविष्यात तालिबानविरोधात लोकांचे आंदोलन पेटण्याची शक्यता असल्याने तालिबान कट्टरतावादापेक्षा लवचिक धोरण स्वीकारत असल्याची चर्चा आहे. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर काबूलमध्ये काही मोजक्याच महिलांनी आंदोलन केले. तालिबानी राजवट येताच महिलांच्या अधिकारांबाबत चर्चा होत असताना हे आंदोलन होत आहे.

कोरोना लसीकरणाला
तालिबानचा विरोध

तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर आता तेथील कोरोना लसीकरणही बंद होण्याचा धोका आहे. कारण तालिबानचा या कोरोना लसीकरणाला विरोध आहे. अफगाणिस्तानमधील कोरोना लसीकरणाची टक्केवारी अवघी ०.६ टक्के इतकी असून जगभरामध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्याची हीच टक्केवारी २३.६ टक्के इतकी आहे. तालिबानने मागील आठवड्यामध्ये पाक्तिका प्रांतामधील लसीकरण केंद्र बंद करुन लसीकरणाला विरोध केला होता. तालिबानच्या करोना लसीकरणाविरोधी भूमिकेमुळे अफगाणिस्तानबरोबरच शेजारच्या देशांमध्येही कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका आहे.

काबूल विमानतळावर
आतापर्यंत १२ ठार

तालिबान्यांनी रविवारी देशाचा ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिक देश सोडून पळून जाण्यासाठी धडपड करत आहेत. काही नागरिक अमेरिकन लष्कराच्या विमानाला लटकले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर खाली पडून या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान काबूल विमानतळावर आतापर्यंत १२ नागरिक ठार झाले आहेत. नाटो आणि तालिबानच्या अधिकार्‍यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
तालिबानने भारतासोबतची
आयात – निर्यात रोखली

तालिबानने सत्तेवर येताच त्यांनी भारतासोबतचे आयात आणि निर्यात दोन्ही बंद केले आहेत. तालिबानने भारतासोबतची सर्व प्रकारची आयात आणि निर्यात रोखली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशनचे महासंचालक डॉ. अजय सहाई यांनी यासंदर्भातली माहिती दिली. तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे. देशातून होणारी आयातही रोखण्यात आली आहे.