Home बातम्या कोळसा हाताळणीत वाढ नाहीच : मुख्यमंत्री

कोळसा हाताळणीत वाढ नाहीच : मुख्यमंत्री

0

मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी वाढ करण्याचा निर्णय केंद्राने किंवा राज्य सरकारने घेतलेला नाही. तसेच राज्यातून कोळसा वाहतुकीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. तसेच, कोळशाच्या प्रश्नावरून विनाकारण आवाज का उठवला जात आहे, असा सवाल त्यांनी केला. कोळशाच्या प्रश्नावरून मडगाव येथे घेण्यात आलेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. कोळशाच्या बाबतीत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्यात येणार असून कोळशात आणखी एका टनाचीसुद्धा वाढ करण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आता अचानक हे कोळसाविरोधी आंदोलन का करण्यात आले, असा प्रश्न करून ते राजकीयदृष्ट्या प्रेरित असावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. निवडणूका जवळ आल्या असल्याने हे सगळे केले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. हल्लीच मडगाव येथील लोहिया मैदानावर ‘गोयांत कोळसो नाका’ या संघटनेने आयोजित केलेल्या सभेला मोठ्या संख्यने नागरिक, कार्यकर्ते व विरोधी पक्षांचे नेते आले होते. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व राज्यातून कोळसा वाहतुकीस विरोध करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते.