कोलवाळ येथे साकारणार ४०० कोटींचा गृहनिर्माण प्रकल्प

0
88

गोवा गृहनिर्माण महामंडळातर्फे कोलवाळ येथे अंदाजे ४०० कोटी रुपये खर्चून १६५० फ्लॅट्‌स बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची निविदा येत्या ३ ते ४ महिन्यांत जारी केली जाणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी काल दिली.

मंत्री साळगावकर यांनी मंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर कोलवाळ येथे महामंडळाच्या जागेत गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू केले. या ठिकाणी १६५० फ्लॅट्‌स उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे, या प्रकल्पावर चारशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच गृहनिर्माण मंडळाने लँड बँक निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी जागा निश्‍चित करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री साळगावकर यांनी दिली.

गोवा गृहनिर्माण मंडळाने यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प उभारून नागरिकांसाठी फ्लॅट्‌स उपलब्ध करून दिले आहेत. कोलवाळ येथील गृहनिर्माण प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लॅट्‌स उभारण्यात येणार आहेत. स्थानिकांना हे फ्लॅट्‌स उपलब्ध करून दिले जातील, असेही साळगावकर यांनी सांगितले. गृहनिर्माण मंडळाला या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी कर्ज घेण्यास सरकारने मान्यता दिली आहे. मध्यम वर्गीयांना खुल्या मार्केटमध्ये फ्लॅट्‌स खरेदी करणे भरमसाठ दरामुळे शक्य होत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होत नाही, अशी परिस्थिती आहे.