कोरोना व्हायरस ः मेड इन चायना

0
332
  • डॉ. सुरज स. पाटलेकर
    (श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव)

फक्त एकच गोष्ट लक्षात असावी की अफवांना बळी पडू नका. ‘अमुक एखाद्या प्रयोगाने कोरोना व्हायरस निष्प्रभ होईल’ अशा संदेशांपासून दूर रहा. सदर लेखामधील माहितीदेखील केवळ प्रतिबंधात्मक उपाय स्वरूपातील आहे; उपचार स्वरूपातील नव्हे.

‘कोरोना व्हायरस’ची लागण झाल्यानंतर उद्भवणार्‍या आजारामध्ये (उजतखऊ-१९) सुरुवातीस सौम्य लक्षणे असतात जशी की नाक वाहणे किंवा सर्दी होणे, घसा खवखवणे वा दुखणे, खोकला, ताप येणे इत्यादी. पण जसा आजार वाढत जातो तशी लक्षणे अधिक तीव्र होतात व श्वासोश्वास प्रक्रियेला किंवा श्वास घ्यायलासुद्धा त्रास होऊ लागतो. न्युमोनिया, वृक्क निष्क्रिय होऊन मृत्यु होऊ शकतो. वृद्धावस्थेत असणार्‍या व्यक्तिनां, ज्यांना दम्याचा त्रास आहे, मधुमेह, हृदयरोगाने पीडित आहेत त्यांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो.

ह्या अगोदरसुद्धा २००२-२००३ या साली चीनमध्ये डठड (सिवेट नावाच्या मांजराच्या) व २०१२ साली सऊदी अरब व जॉर्डनमध्ये चएठड (ड्रॉमेडरी नावाच्या उंटांच्या प्रजातींपासुन मनुष्यांमध्ये आलेला) असे संसर्गजन्य रोग जे कोरोना व्हायरसचेच प्रकार होते ते होऊन गेलेत आणि आता हा उजतखऊ-१९ वटवाघूळ सूप किंवा साप यांच्या सेवनातून चीन देशातील वुहान प्रांतात या विषाणूचा फैलाव झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे व त्यावर प्रतिकार करणारी औषधे काढण्यासाठी कित्येक संशोधक दिवसरात्र एक करत आहेत. कोविद-१९ ने मृत्युचे प्रमाण २-५% एवढे आहे. उलट डठड ने मृत्युचे प्रमाण ९-१०% व चएठडने मृत्युचे प्रमाण ३४% एवढे होते. म्हणजेच काळजी तर घेतली गेलीच पाहिजे यात काहीच शंका नाही पण ह्यापेक्षाही जास्त प्रबळ रोगांना आपण यशश्वीरित्या सामोरे गेलो आहोत व त्यांना नष्टही केले आहे. म्हणूनच घाबरुन जाऊन उगाचच अन्धविश्वास वा गैरसमज पसरवणे थोड़े चुकीचेच आहे.

एव्हानातर सर्वानाच माहीत झाले असेल की कोरोना व्हायरस काय आहे ते व त्याचा संसर्ग कसा आणि का होतो ते. पण या सर्व गोष्टींपेक्षा जास्त गरजेची जी गोष्ट आहे ती म्हणजे असल्या रोगांची लागण न होण्यासाठी किंवा जर अशी लक्षणे दिसू लागताच त्वरित उपचारांसाठी योग्य त्या इस्पितळात जाऊन कळवावे व उपचार चालू करावेत. ह्याव्यतिरिक्त असल्या कुठल्याही संसर्गजन्य रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी काळजी आपण आपआपल्यापरिने घेणे गरजेचे. उल्लेखित सर्व उपाय हे कोरोना व्यतिरिक्त इतर संसर्ग होऊन पसरणार्‍या रोगांमध्येही तेवढ़ेच उपयुक्त ठरतात.

मास्क वापरताना एवढी काळजी घ्यावी की मास्क वापरण्यापूर्वी आपले हाथ स्वच्छ केले पहिजेत. हाथ स्वच्छ करण्यासाठी ते अल्कोहोल बेस्ड हँडरब किंवा सोल्यूशन अथवा साबण व पाणी हे वापरुन धुवावेत. मास्क हे चेहर्‍यावर बांधताना त्याने तोंड व नाक दोन्हीही झाकले जाणे जरुरी. चेहरा व मास्क यामध्ये अंतर नाही राहिले पहिजे. मास्कला पुन: पुनः हाथ लावणे टाळावे व लावल्यास हाथ पुनः धुवावेत. मास्क ओलसर झाल्यास ते योग्य जागी त्याची विल्हेवाट लाऊन दुसरे नवीन मास्क वापरावे. एकदा वापरलेले मास्क परत वापरु नये. चेहर्‍याला लावलेले मास्क काढत असताना, मास्कच्या समोर हाथ न लावता, ते मागील बाजुला पकडून फक्त हातांच्या बोटांच्या सहाय्याने अलगद काढावे व त्वरित बंद कचरापेटीमध्ये टाकून विल्हेवाट लावावी.

जर खोकला, शिंका येत असतील, सर्दी झाली असेल किंवा समोरच्याला ह्या तक्रारी झाल्या असतील तर मास्क, रुमाल वापरणे अत्यंत गरजेचे. सर्दी खोकला झालेल्या व्यक्तिंशी बोलताना जास्त जवळ न जाणे. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे व अपरीहार्य असल्यास मास्क लाऊनच जावे. नाक, कान, डोळे यांना न धुतलेल्या किंवा अस्वच्छ हातांनी स्पर्श करु नये कारण सर्वात जास्त रोग पसरण्याचे मार्ग हे तोंड, नाक, कान, डोळे यातूनच होते कारण हे अवयव हवेशी सर्वात जास्त प्रमाणात संपर्कात असतात आणि कोरोनावायरस हे विषाणु हवेतून (एखादा त्याची लागण झालेला रुग्ण शिंकल्याने, खोकल्याने त्यातुन पसरते)पसरतात. दुसर्‍यांच्या उष्टे खाणे टाळावे, बाहेर गाड्यांवर मिळणारे भजी, वड़ापाव, सामोसा, सँडविच इत्यादींसारखे पदार्थ खाऊ नयेत, भाजी, फळे ही २-३ वेळा व्यवस्थित धुतल्यानंतरच त्यांचे सेवन करावे. स्वतःला स्वच्छ ठेवावे. बाहेरुन आत आल्यावर हात, पाय कोमट पाण्याने धुवावेत व शक्य असल्यास कोमट पाण्याने आंघोळ केली तरीही चालेल (गरम पाणी आंघोळीसाठी वापरल्याने वायरस मरतात हा निव्वळ गैरसमज आहे).
घरात भीमसेनी कापुर, धूप, कडुनिंबासारख्या वस्तु धूप घालण्यासाठी वापराव्यात. त्यातील निर्जन्तुकीकरण प्रतिजैवीक गुणांमुळे थोडाफार फायदा होईल. कोरोनाव्हायरसवर यांचा काही फरक पडत नसेलही पण अश्याने हवा शुद्ध होते (अर्थातच घरात एखाद्याला खोकला असल्यास असे न केलेले बरे वा थोडी काळजी घ्यावी). सर्दी खोकला झालेल्या व्यक्तिंशी बोलताना जास्त जवळ न जाणे.

या सर्वांसाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती जर व्यवस्थित व मजबुत असेल तर रोगांना पळवून लावण्यासाठी त्याची फार मदत होते किंवा रोगांशी लढा देत असताना त्यांच्या शरीरावर परिणाम कमी प्रमाणात होतो. जे अगोदरच आजारी आहेत, ज्यांची रोगप्रतीकार शक्ति कमी आहे, सतत आजारी पडणारे ह्यांना कोरोनाव्हायरसची लागण व्हायला जास्त वेळ नाही लागणार.
तरीही काही अंधविश्वास कोरोनाव्हायरसबद्दल पसरले गेलेत जे दूर होणे महत्वाचे. जसे की….
१) कोरोनावायरस हे ना थंड हवामानाने मरतात न अत्यंत उष्ण पाण्याने मरतात. आणि असे अजुनपर्यंततरी काहीही सिद्ध झालेले नाही.
२) मान्य आहे की आपण आपल्या स्वदेशात बनलेल्या गोष्टीच वापरल्या पाहिजेत व चीनी वस्तुंचा नाद सोडून दिला पाहिजे. पण हे विषाणु या वस्तुतून चीनमधुन भारतात येऊ शकत नाहीत. काहीही शंका तरीही असल्यास त्या एखाद्या जन्तुनाशक द्रव्याने पुसावेत व त्यानंतर हाथ अल्कोहोल बेस्ड हँडरबने स्वच्छ करून वापराव्यात. किंवा सर्वात मस्त म्हणजे चीनीवस्तु वापरायच्याच बंद कराव्यात (किमान त्या निमित्ताने तरी त्यांचा वापर कमी होईल).

३) हे विषाणु डासांच्या चाव्याने पसरत नाहीत.
४) अल्ट्राव्हॉयोलेट निर्जन्तुकीकरण लँपने हाथ स्टेरीलाइज केल्याने हाताच्या त्वचेला इजा पोहोचेल.
५) अल्कोहोल किंवा क्लोरीन शरिराला लावल्याने शरिरामध्ये अगोदरच प्रवेश केलेल्या विषाणुंचा नाश होत नसतो. उलट असे केल्याने त्वचा, डोळे यांना हानी पोहचेल.
६) अँटीबायोटिक्स हे बॅक्टेरियावर उपयोगी पडतात, व्हायरसवर नव्हे.
७) दररोज लसुण खाल्ल्याने कोरोना व्हायरस मरतो हा गैरसमज आहे. लसुणमध्ये काही प्रमाणात प्रतीजैविक(अँटी-मायक्रोबियल)गुण असतीलही पण त्याचा ह्या विषाणुंचा प्रतिकार करण्यासाठी उपयोग होतो असे अजुनपर्यंततरी कुठेच सिद्ध झालेले नाही.
८) सलाईन द्रव्य वापरुन नाक रोज साफ केल्याने ह्या विषाणुंचे इन्फेक्शन कमी होईल असा समज पण चुकीचा आहे.
९) घरातील पाळीव प्राण्यांमधून कोरोनाव्हायरस ह्या विषाणुंचा संसर्ग झाल्याची घटना कुठेच आढळली नाही. पण तरीही त्यांच्याशी सम्बंध आल्यावर अगोदर उल्लेखित द्रव्याने हाथ स्वच्छ करणे जरुरी.
१०) हँड ड्रायरने हे विषाणु मारले जात नाहीत.
फक्त एकच गोष्ट लक्षात असावी की अफवांना बळी पडू नका. ‘अमुक एखाद्या प्रयोगांने कोरोना व्हायरस निष्प्रभ होईल’ अशा संदेशांपासून दूर रहा. सदर लेखामधील माहितीदेखील केवळ प्रतिबंधात्मक उपाय स्वरूपातील आहे; उपचार स्वरूपातील नव्हे. जोवर शासनाकडून जाहीर केले जात नाही तोवर भारतातील प्रादुर्भावाबाबत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. व स्वतःची काळजी घ्या.