कोरोनाचा थयथयाट

0
209
  •  डॉ. राजेंद्र साखरदांडे
    (साखळी)

आमच्या गावांत, शहरांत, राज्यांत, भारतात कोरोना व्हायरस येता कामा नये… म्हणून आपण काय करावे… शक्यतो.. घरी राहावे. आपल्याला खोकला येत असेल तर, शिंक येत असेल तर सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका. स्वच्छता पाळा. आपल्या राज्याचे आरोग्य आपल्या हातात आहे… राज्य जागे रहा… रात्र वैर्‍याची आहे..!

जगावर आज कोरोनाचे राज्य चालू आहे. हजारो लोकांना त्याची लागण झालेली आहे. लोक मरताहेत… दररोज रुग्णांची व मरणार्‍यांची आकडेवारी जाहीर होते आहे. पण ही आकडेवारी तुम्हाला खरी माहिती देते का? वरकरणी सगळे चालूच आहे व तेही मोठ्या प्रमाणात..!

आज प्रत्येक नागरिक कोरोना व्हायरसविषयी जाणून आहे. गावातली लोकंसुद्धा तोंडावर मास्क बांधून घेतात. तरीदेखील ह्या व्हायरसविषयी पूर्ण व खरी माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
चीनच्या वुहान ह्या शहरातून या रोगाने किंवा व्हायरसने जगात प्रवेश केला. तो व्हायरस सामान्य नसून महाभयंकर आहे. या व्हायरसवर प्रयोगशाळेत प्रयोग करून त्याला आणखी भयानक बनवण्यात आलेला आहे. आज जगांत जागतिक महायुद्धांची आशंका… शंका फक्त राहिली नाही तर जगासमोर एक महाभयंकर सत्य नोवेल कोरोनाच्या येण्याने झालेले आहे.

या भयानक व्हायरसची उत्पत्ती चीनची आहे … जगावर राज्य करण्याची लालसा जगाला ज्ञात झालेली आहे. प्रयोगशाळेतला हा व्हायरस वुहान शहरात पसरला. लोक आजारी पडले… हजारो मरायला लागले… कितीतरी महिने हे चालूच होते. जगाला काहीच माहीत नव्हते.. हळुहळू हे प्रकरण हाताबाहेर जातेय अशी खात्री झाल्यावर जागतिक आरोग्य संघटनेला कळवले गेले. तोवर हा व्हायरस जगभरात पसरायला लागला होता.

केवळ तासाचा अवकाश, मानव जगाला प्रदक्षिणा घालू शकतो. इटली, इराण, दक्षिण कोरिया, जपान… व इतर कितीतरी देशात या रोगाने आपली वाटचाल केली आहे व हे मान्य करायला हवे की लवकरच हा रोग जगभरात पसरेल. गरम प्रदेश या रोगापासून दूर राहतील असा कयास आहे कारण उष्ण प्रदेशात या रोगाचा संसर्ग होत नाही कारण त्या वातावरणात कोरोना व्हायरसचा जंतु लवकरांत लवकर मरतो.

आज ज्या राष्ट्रात ‘कोरोना’चा अजून उद्रेक झाला नाही .. तिथे लोक एवढे घाबरलेत की नुसती पळापळ सुरू झालेली आहे. हँडवॉश, सॅनिटायझर्स, वायपर्स वगैरे गोष्टींचे काउंटर रिकामे झालेले आहेत. लोकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या घरात नेऊन ठेवलेत. कां कुणास ठाऊक.. नंतर मिळाले नाही तर…!
लोकांना स्वच्छतेचे नियम समजावले जातात. हात साफ करा.., तोंडास हात लावू नका, हात मिळवून अभिवादन करू नका.. वगैरे वगैरे.

केरी, सत्तरी.. काणकोण… पेडणे या गावांत तुम्ही चेहर्‍यावर मास्क बांधणार कां? परत परत हात डेटॉलने धुणार आहेत का? मागे एकटा पेशंट दवाखान्यात आला… त्याच्या दोन्ही हातांची सालपटे गेली होती… दिवसातून दहा-वीस वेळा तो इसम डेटॉलने, साबणाने… चक्क ब्रशने कपडे धुतल्यासारखे हात धूत होता… कुणालाही मरण नको आहे. पैसे भरलेत पण… मरणाचा विचार नको!

कालच आमचे पंतप्रधान टिव्हीवर बोलले- स्वच्छता पाळा, स्वतःची काळजी घ्या… वगैरे वगैरे.. तेव्हा स्वच्छतेवर न बोलणे बरे..! ते काम मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहेच, तरीदेखील.. सरकार हा विषय मोठ्या गंभीरतेने घेईल असा विश्वास ठेवूया.

केंद्र सरकारने फतवा काढलाय… लोकांनी गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, शक्यतो घरी बसावे, स्वतःची पुरेपूर काळजी घेऊनच कामावर जावे, ज्यांना कामानिमित्त प्रवास करायचाच आहे, त्यांनी पूर्ण आपली खातिरदारी करूनच घराबाहेर जावे. मग गोव्याच्या प्रत्येक शहरात शिगम्याची सरकारी मिरवणूक कां? त्यावर बंदी कशी काय नाही? यावर गोवा सरकार चुप्पी साधून आहे… बाहेर रस्त्यावर थुंकणारे, खोकणारे, शिंकणारे कमी झालेत का? सत्तर – ऐंशी टक्के लोकांकडे रुमाल नाहीत, मग ते वायपरचे सोडा… पेपर नॅपकीन सोडाच… सरकारचे सोडा… स्वतःची काळजी स्वतः घ्या.. दुसर्‍याचीही काळजी करा… कारण रोग पसरतोय.
आमच्या घरात आम्हाला डांस चावतात की नाही? पण प्रत्येक डासाच्या चावण्याबरोबर आम्हाला मलेरिया, डेंग्यू झालाय का? मग… याचा विचार करा… आमच्या गावांत, शहरांत, राज्यांत, भारतात कोरोना व्हायरस येता कामा नये… म्हणून आपण काय करावे… शक्यतो.. घरी राहावे. आपल्याला खोकला येत असेल तर, शिंक येत असेल तर सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका. स्वच्छता पाळा. म्हणजे स्वतःवर पैसे खर्च करा…! सामान्यांना पैसे कोण देणार … व पैसे नसल्यावर मग त्यांनी किड्यामुंग्यांसारखे मरावे! या रोगाने मरतात कोण?… तर साठ-सत्तरी गाठलेले लोक, नाना प्रकारच्या रोगांनी बाधित… वेगवेगळ्या आजारांवर औषध घेणारे… ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे ते लोक..! म्हणजे मरणारे असतील गरीब लोक..! या विषयावर जगभरात वार्तालाप चालू राहतील… आम्ही पहिल्याप्रथम भारताचा विचार करू?
भारतासारख्या १२८ कोटींच्या देशात अजून हा रोग पसरलेला नाही. चीन तर आम्हाला टेकून उभा आहे. नेपाळ, तिबेट, भुतान, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश वगैरे तर चीन व आमच्यात वाटणी करून आहेत.
पहिल्यांदा आमची बॉर्डर आम्हाला राखावी लागेल.. जगभरांत विमानतळांवर निरीक्षण केंद्रे सुरू झाली आहेत. ज्या देशात हा रोग प्रामुख्याने पसरला आहे, तिथल्या देशातील नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आलेला आहे. दुसर्‍या देशात प्रवेश हवा असेल तर व्हिसाकरता अर्ज करावा लागेल. विमानतळावर प्रत्येक विदेशी व स्वदेशी नागरिकांना आपली पूर्ण माहिती द्यावी लागेल. संशयास्पद व्यक्तींना क्वारन्टाईन करावे लागेल… प्रत्येक एन्ट्री पॉईंटला चेकिंग व्हायला हवे… कुणीही या रोगाचे जंतू घेऊन भारतात येऊ शकणार नाही, याची पूर्ण जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्याकरता प्रशिक्षित लोकांची नेमणूक व्हायला हवी. प्रत्येक विदेशी यात्रेकरुची काटेकोरपणे चिकित्सा व्हायला हवी. समाधानाची गोष्ट आहे ती म्हणजे पर्यटकांची संख्या आता रोडावली आहे. ज्यादातर सहली रद्द झालेल्या आहेत. भारतातील मोठमोठ्या विमानतळांवर. जिथे विदेशी पर्यटकांची रेलचेल होते तिथे त्यांची तपासणी, चौकशी व्हायला हवी… तशी साधनसुविधा आमच्याकडे आहे का? दर आठवड्यात किंवा शक्य असल्यास दर दिवशी त्याचा आढावा घेणे गरजेचे आहे.
गोव्यात ही सुविधा झाली आहे का? झाली आहे.. असे वाचनांत येते… पण ती परिपूर्ण आहे का? वेगवेगळ्या हॉस्पिटलात ‘‘आयसोलेशन वॉर्डस्’’ तयार आहेत म्हणजे ज्या व्यक्तींना क्वारंन्टाईन लागू करायला हवे.. त्यांना खाटा आहेत का? टेक्निकली त्या तयार आहेत का? याची जबाबदारी सरकारवर आहे. त्यात सामान्य माणूस काही करू शकत नाही. कुणी पॉझिटिव्ह झाले तर काय??
फक्त विमानतळच का? इतर एन्ट्री पॉइंन्ट्‌सवर निरीक्षण केंद्रे स्थापित व्हायला हवेत. विदेशी पर्यटक कुठूनही भारतात… आपल्या राज्यात प्रवेश करू शकतात. आमच्या राज्यात किती पर्यटक राहतात हे रोज जाणतो का? त्याविषयीची काही लिखित माहिती सरकारला आहे का? व्हिसा नसताना पोलिसांशी लागेबांधे जुळवून काही धंदे करणारे रशियन, नायजेरियन आपली गावे गोव्यात वसवत आहेत… मग??
सरकारमधल्या जबाबदार व्यक्तींनी, मंत्र्यांनी गोव्यातच राहावे, त्यांनी रजा काढू नये… त्यांना रजा देऊ नये. आरोग्यमंत्र्यांनी दररोज या जबाबदार अधिकारी व्यक्तीकडून आढावा घ्यावा. आपल्या राज्याचे आरोग्य आपल्या हातात आहे… राज्य जागे रहा… रात्र वैर्‍याची आहे..!