कोरोना लसीकरणाबाबत राजकारण नको

0
194

>> मुख्यमंत्र्यांचे आवाहन, नगरपालिकाक्षेत्रातील स्वयंपूर्ण गोवा योजनेवर चर्चा

राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या विषयाचे कुणीही राजकारण करू नये. कोरोना प्रतिबंधक लसीबाबत गैरसमज, दिशाभूल व चुकीची माहिती पसरविण्याचे काम कुणीही करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल केले.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरोने आयोजित केलेल्या कोरोना लसीकरण आणि स्वयंपूर्ण गोवा योजनेच्या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.
केंद्र सरकारने लसीकरणासाठी मंजूर केलेल्या कोरोना प्रतिबंधक दोन्ही लशी पूर्णपणे सुरक्षित आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन कर्मचार्‍यांनी लस घेण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले

९,२०० जणांनी घेतली लस
राज्यात आत्तापर्यंत ९,२०० आरोग्य कर्मचार्‍यांनी लस घेतली आहे. तसेच, सुमारे २ हजार फ्रंट लाइन कर्मचार्‍यांनी लस घेतली आहे. आरोग्य आणि फ्रंट लाइन कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

६०० ठिकाणी जागृती कार्यक्रम
राज्यात सहाशे ठिकाणी कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेत एकूण ८० योजना आहेत. त्यातील आत्तापर्यंत ३५ योजना लोकांपर्यंत पोचविण्यात आलेल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पालिकांना घसघशीत निधी
राज्यातील नगरपालिकांना स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध प्रकल्पासाठी ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील नगरपालिकांमध्ये स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम राबविण्याच्या कामाचा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका बैठकीत आढावा घेतला आहे. नगरपालिका क्षेत्रात या योजनेच्या अंमलबजावणीचे सादरीकरण करण्यात आले आहे. या बैठकीला मुख्य सचिव परिमल राय आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.