कोरोना रुग्णवाढीमुळे केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

0
16

>> सरकारी कार्यालयात ५०% उपस्थितीची सूचना

>> कर्मचार्‍यांसाठी बायोमेट्रिक हजेरी स्थगित

कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्यामुळे केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संसर्ग अधिक पसरू नये आणि खबरदारीचा उपाय म्हणून सर्व केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी बायोमेट्रिक हजेरी ३१ जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना आपली हजेरी रजिस्टरमध्ये भरावी, असे म्हटले आहे.

सरकारी कार्यालयात कर्मचार्‍यांची उपस्थिती ही ५० टक्केच ठेवावी. इतर कर्मचार्‍यांनी वर्क फ्रॉम होम करावे. तसेच कर्मचार्‍यांची कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी विभागांनी वेळापत्रक बनवावे. कर्मचार्‍यांसाठी कार्यालयाच्या वेळा या सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० आणि सकाळी १० ते संध्याकाळी ६.३० अशा ठेवाव्यात. तसेच कन्टेंमेंट झोनमध्ये राहणार्‍या कर्मचार्‍यांना कार्यालयात बोलावू नये. यासोबत दिव्यांग आणि गर्भवती महिला कर्मचार्‍यांनाही कार्यालयात न बोलावण्याची सूचना दिली गेली. सर्व सचिव आणि वरिष्ठ पदावरील अधिकार्‍यांनी मात्र कार्यालयात नियमित हजेरी लावावी, अशी सूचना दिली गेली आहे.
कर्मचार्‍यांना मास्क व सामाजिक अंतरासोबतच सॅनिटायझेशन सक्तीचे करावे अशी सूचना केली आहे.

कोविड कृतीदलाचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी तिसर्‍या लाटेनंतर लॉकडाऊनबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. डॉ. अरोरा यांनी, लॉकडाऊन लावण्यापेक्षा अत्यंत सुनियोजित पद्धतीने नियोजन करून स्थिती नियंत्रणात आणण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच ‘स्मार्ट कंटेनमेंट’मुळे स्थिती नियंत्रणात ठेवणे सहज शक्य होईल. मात्र त्याचवेळी जिल्हा स्तरावर काही प्रमाणात निर्बंध लावता येतील, असे त्यांनी सांगितले.

रुग्णसंख्या वाढणार
कोरोनाची तिसरी लाट भारतात सुरू झाली आहे. गेल्या एका आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या तीन पटीने वाढली आहे. त्यात ओमिक्रॉन हे प्रमुख कारण आहे. येत्या काही दिवसांत आणखी वेगाने रुग्णांची संख्या वाढेल, असे डॉ. अरोरा यांनी नमूद केले. रुग्ण वाढत असले तरी घाबरण्याचे कारण नाही. लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आढळत आहेत. सध्या जे रुग्ण इस्पितळात दाखल होत आहेत त्यातील बहुतेक सहव्याधीग्रस्त आहेत, अशी माहिती अरोरा यांनी दिली.

कोरोनावरील गोळी भारतात पुढील आठवड्यात उपलब्ध
कोविडवर आता गोळी मोलनुपिरावीर भारतात लॉंच करण्यात आली असून पुढील आठवड्यात ती बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. कोरोनाची सौम्य ते मध्यम संसर्ग असलेल्या रुग्णांना या गोळीचा पाच दिवसांचा कोर्स घ्यावा लागेल. या ५ दिवसांच्या कोर्ससाठी रुग्णांना १,३९९ रुपये मोजावे लागतील. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने अलिकडेच आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी या गोळीला मंजुरी दिली आहे.

ओमिक्रॉनचे रुग्ण आठवडाभरात बरे
ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले बहुतांश रुग्ण आठवडाभरात बरे होत आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या १०५ रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर हे समोर आले आहे. या १०५ रुग्णांमध्ये ७ मुलेही होती. या सर्वांवर दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. या रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी याबाबत सांगितले की, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले सुमारे ९९ टक्के रुग्ण एका आठवड्यात बरे झाले. ओमिक्रॉन हा अत्यंत वेगाने पसरतो. पण तो डेल्टा व्हेरियंटपेक्षा खूप वेगाने तो शरीरातून बाहेर पडतो, असे त्यांनी सांगितले. ओमिक्रॉनबाधित ९२ टक्के रुग्णांची चाचणी एका आठवड्यात निगेटिव्ह येते. केवळ १ रूग्ण ज्याला क्षयरोगाचाही आजार आहे, तो बराच काळ पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती यावेळी डॉ. सुरेश कुमार यांनी दिली.

फ्रान्समध्ये आढळला कोरोनाचा नवा प्रकार
जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून अनेक नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. आता फ्रान्समध्ये कोरोनाचा एक नवीन व्हेरियंट आढळला असून तो तब्बल ४६ वेळा उत्परीवर्तीत झाला आहे. या नवीन व्हेरिएंटला संशोधकांना ‘आयएचयू’ असे नाव दिले आहे. फ्रान्सच्या मारसैलमध्ये कोरोनाचा ‘आयएचयू’ हा नवा प्रकार सापडला असून त्याचे १२ रुग्ण आढळले आहेत. लागण झालेले सर्वजण हे आफ्रिकी देश कॅमेरूनहून परतले होत. फ्रान्समध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या आयएचयू या प्रकाराचा पहिला रुग्ण १० डिसेंबरला आढळला होता. आयएचयू व्हेरियंट अन्य देशांमध्ये पसरला आहे की नाही, याचा शोध घेतला जाणार आहे.