कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

0
140

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८

राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा बळी गेला तसेच नव्या २४५५ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या २ हजारांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून एकूण बळींची संख्या १९९८ एवढी झाली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३२ हजार ३८७ झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३६.२६ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत इस्पितळामधून १५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

चोवीस तासांत ६१ मृत्यू
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. काल शुक्रवारी आणखी ६१ रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यात मागील चार दिवसांत २६९ रुग्णांचा बळी गेला आहे. मंगळवारी ७५, बुधवारी ७० आणि गुरूवारी ६३ तर काल शुक्रवारी ६१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

प्राणवायूअभावी रुग्णांचे बळी
गोमेकॉ इस्पितळात वैद्यकीय प्राणवायूच्या समस्येमुळे बळींच्या संख्येत वाढ होत असल्याची तक्रार आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतरसुद्धा गोमेकॉतील परिस्थितीत सुधारणा झालेली दिसून येत नाही. गुरूवारी मध्यरात्री २ ते शुक्रवारी सकाळी ६ यावेळेत आणखी १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. इस्पितळातील वॉर्डातील प्राणवायूची पातळी कमी झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राणवायूच्या समस्येकडे संबंधितांचे लक्ष वेधले. संबंधित अधिकारी तातडीने वॉर्डात दाखल झाले. परंत, प्राणवायूच्या अभावी १३ रुग्णांचे प्राण वाचवू शकले नाहीत. अशाच प्रकारे ११ मे रोजी २६ रुग्ण आणि १२ मे रोजी १५ रुग्णांचा बळी गेला आहे.

नवे २४५५ रुग्ण
राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. पॉझिटिव्हिटी दर ३६.२६ टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी पॉझिटिव्हिटी दर ४० टक्क्यांपेक्षा जास्त होता. चोवीस तासांत नवे २४५५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या ६७६९ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आला. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३२ हजार ५८५ एवढी झाली आहे.

२४ तासांत २४६ इस्पितळात
गेल्या चोवीस तासांत नव्या २४६ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोना रूग्णवाढीमुळे इस्पितळात दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आता दरदिवशी इस्पितळात दोनशे ते तीनशेच्यावर रुग्णांना दाखल केले जात आहेत.

२९६० जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाबाधित आणखी २९६० रुग्ण काल बरे झाले आहेत. राज्यात कोरोना बाधेतून बर्‍या होणार्‍या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसून येत आहे. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ९८ हजार २०० एवढी झाली आहे.

लसीकरणाची नोंदणी फुल्ल
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला शनिवार १५ मेपासून प्रारंभ होत आहे. केंद्र सरकारकडून या वयोगटातील लसीकरणासाठी ३२,८७० डोस प्राप्त झाले आहेत. या लसीकरणासाठी शुक्रवारी दुपारी नोंदणीला कोवीन ऍपवर सुरुवात करण्यात आली. अवघ्या अर्ध्यातासात लसीकरणासाठी नोंदणी फुल्ल झाली. शनिवारी दुपारी पुन्हा नोंदणी स्वीकारली जाणार आहे.