कोरोना बळींची संख्या अडीच हजारांवर

0
126

>> सलग तिसर्‍या दिवशी ३९ मृत्यू

>> १५०४ नवे बाधित, १५५७ कोरोनामुक्त

राज्यात कोरोना विषाणूमुळे अजूनही मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. काल गुरूवारी सलग तिसर्‍या दिवशी कोरोनामुळे ३९ जणांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाबाधित १५०४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे सध्याची कोरोनाची रुग्णसंख्या १५,६९९ एवढी आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५३८ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,५२,४०१ एवढी झाली आहे.

काल राज्यात १५५७ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,३४,१६४ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.०३ टक्के झाले आहे. अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
काल दिवसभरातील चोवीस तासांत राज्यात एकूण ५९५१ एवढ्या स्वॅबच्या चाचण्या करण्यात आल्या. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १३५६ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर १४८ नवे रुग्ण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत. दरम्यान, काल रविवारी कोरोनामुक्त झाल्यामुळे इस्पितळातून १४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

३९ जणांचा मृत्यू
काल राज्यात कोरोनामुळे ३९ जणांचा मृत्यू झाला. काल सलग तिसर्‍या दिवशी ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.मंगळवार, बुधवार व काल गुरूवारीही राज्यात कोरोनामुळे ३९जणांचे बळी गेले. मात्र राज्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे. त्यात बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात २३, मडगावच्या जिल्हा इस्पितळात ८ जणांचा, हॉस्पिसियू इस्पितळात १, केपे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाचा, खासगी इस्पितळात एकाचा, दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतलेल्या चौघांचा समावेश आहे.

मडगावात सर्वाधिक रुग्ण
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या अजूनही मडगावात असून ती १४५५ एवढी झाली आहे. चिंबल ८३२, पणजीत ८९३, फोंडा ८७०, पर्वरीत ७३८, कांदोळी ६१८, कासावली ५७७, कुठ्ठाळी ५९८, पेडणे ५१६, वास्को ४७२, कुडचडे ५३६, साखळी ४७७, लोटली ४७९ अशी सध्याची रुग्णसंख्या आहे. कोरोना संसर्ग झालेल्या २६,१०३ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर १,०२,८२७ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ८,०७,५५० एवढ्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे.

‘म्युकरमायकोसिस’ची
लक्षणीय रोग म्हणून नोंद

राज्य सरकारने राज्यात म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या रोगाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा रोग लक्षणीय व दखल घेण्याजोगा रोग म्हणून वर्गीकृत केला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे आता याराविषयी सगळी माहिती वेळी-अवेळी सरकारी अधिकारणीला द्यावी लागणार आहे. या संबंधी एकत्रित करून दिलेल्या माहितीमुळे अधिकार्‍यांना या रोगावर बारीक लक्ष ठेवण्यास तसेच त्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यास त्याविषयी इशारा देणे शक्य होणार आहे.