कोरोनाने राज्यात ७ बळी, २१५ बाधित

0
112

राज्यात नवीन कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी असलेले दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन २१५ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आणखी ७ रुग्णांचा बळी गेला आहे.

राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या २ हजार ५११ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३०३९ झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात चोवीस तासांत ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोमेकॉमध्ये ६ रुग्ण आणि उत्तर गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

चोवीस तासांत २१५ रुग्ण
राज्यात गेल्या काही दिवसांत स्वॅबच्या नमुन्यांच्या तपासणीच्या संख्येत घट झाली आहे. चोवीस तासांत केवळ ३१२० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २१५ नमुने बाधित आढळून आले आहेत. चोवीस तासांत इस्पितळांमधून ३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६६ हजार ०९८ एवढी झाली आहे.
फोंडा येथे सर्वाधिक १६६ सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या आहे.
मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १४१ एवढी झाली आहे. राजधानी पणजी परिसरात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १२३ रुग्ण, चिंबल १०१ रुग्ण, शिवोली १०० रुग्ण, कांदोळी येथे ११२ रुग्ण, साखळी १२६ रुग्ण, काणकोण येथे १३५ रुग्ण, कुठ्ठाळी १०४ रुग्ण आहेत. इतर भागांतील सध्याच्या रुग्णांची संख्या शंभरपेक्षा कमी आहे.

२४ तासांत २८ जण इस्पितळांत
राज्यातील इस्पितळांत दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. चोवीस तासांत नव्या २८ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहेत.

३०१ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाबाधेतून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाबाधित आणखी ३०१ रुग्ण काल बरे झाले. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ५४८ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन १८७ रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.