राज्यात सध्या गणेशोत्सवाची धामधुम आहे. दोन वर्षांच्या महामारीनंतर पुन्हा उत्साह शिगेला पोहोचला आहे, परंतु आपल्या अवतीभवती सौम्य रूपात का होईना, परंतु कोरोनाही सतत वाढता राहिला आहे याकडे मात्र आपले दुर्लक्ष होताना दिसत आहे. गेला महिनाभर गोव्यातील कोरोनाचे अधिकृत आकडे शंभरच्या वर राहिले आहेत. चाचणी न करता थेट उपचार सुरू करणारे या बाधितांचे नातलग किंवा इतर लोक गृहित धरले तर खर्या बाधितांची संख्या याहून कितीतरी अधिक भरेल. दिलासा एकच आहे की या नव्या लाटेमध्ये सहसा कोणाला इस्पितळात दाखल करावे लागत नाही. कोरोनाबाधितांचे मृत्यूही अपवादात्मक आहेत. पण या विषाणूच्या सौम्यतेमुळेच कोरोनाबाबत दुसर्या लाटेत निर्माण झालेली भीती आज नावालाही उरलेली दिसत नाही.
बाजारपेठांमध्ये सध्या उत्साह ओसंडून वाहतो आहे. गेल्या दोन वर्षांच्या मंदीमुळे झालेले नुकसान भरून काढण्याच्या दिशेने ही आर्थिक उलाढाल असल्याने तिचे स्वागतच करायला हवे. देशातील १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थव्यवस्थांनी कोविडपूर्व काळाप्रमाणे उभारी घेतलेली आहे असे अधिकृत आकडेवारी सांगत आहे. त्यातील सात राज्यांच्या अर्थव्यवस्थेत तर सन २१-२२ मध्ये दोन आकडी विकासदर गाठला गेला आहे. कोरोनाकाळामध्ये हा विकासदर नगण्य म्हणावा असा राहिला होता. आता केरळ आणि उत्तर प्रदेश वगळता सर्व राज्यांच्या अर्थव्यवस्था पुन्हा मार्गी लागलेल्या दिसतात. दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान, बिहार, तेलंगण, उडिसा आणि मध्य प्रदेश यांचा विकास दर पुन्हा दोन आकडी बनला आहे, ही आश्वासक बाब आहे. आता तर सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे या आर्थिक वर्षामध्ये विकासाचा हा वेग आणखी वाढेल अशी आशा आहे. मात्र, कोरोनाचा प्रकोपही दुसरीकडे वाढतो आहे हे विसरता येणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिल्या जात असलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक प्रमाणात देशात कोरोना संसर्ग आहे असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे आणि ते पटण्याजोगे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसली तरी कोणी चाचणी करायला जाईलच असे नाही. त्यामुळे खर्या पॉझिटिव्हिटी दराचे नेमके अनुमान करणे अवघडच आहे. देशात सध्या जो कोरोना प्रकोप दिसून येतो त्याला बीए.२.७५ हा कोरोना विषाणूचा प्रकार सर्वाधिक कारणीभूत असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. ऑगस्टमध्ये ओमिक्रॉनच्या या प्रकारच्या संसर्गाचे प्रमाण साठ टक्क्यांवर होते. उत्तर भारतात तर ते ८८ टक्क्यांहूनही अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पुरवलेली माहिती अभ्यासली तर असे दिसते की ह्या विषाणूप्रकाराची आणखी नऊ म्युटेशन जगभरात समोर आलेली आहेत. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर त्यापैकी चार ही रिसेप्टर बाइंडिंग डोमेन किंवा आरबीडीअंतर्गत होत असतात. जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेली बहुतेक म्युटेशन ही भारतातील आहेत हेही येथे उल्लेखनीय आहे.
सध्या कोरोनाचे जे व्हेरियंट देशात दिसून येतात, त्यात कोरोनाबाधितांना सुरवातीला मोठ्या प्रमाणात ताप यायला सुरूवात होते, पण बहुतेक बाधितांत तीन दिवसांच्या आत तो जातो. त्यामुळे हा कोरोना आहे हेही लोकांना कळत नाही. बाधित व्यक्ती तंदुरुस्त असेल आणि तिला अन्य कोणतेही आजार नसतील तर इस्पितळात दाखल होण्याची वेळही येत नाही. त्यामुळेच आज सर्वांनीच कोरोनाला शिंगावर घेतलेले पाहायला मिळते. गेली दोन वर्षे कोरोनाच्या भीतीने दबून राहिल्याचा सूडही नकळत उगवला जात असावा. त्यामुळे सार्वत्रिक बेफिकिरी वाढली आहे. केंद्र सरकारने जनतेमधील ही आम बेफिकिरी विचारात घेऊन आता राज्य सरकारांना सामान्य ताप आणि श्वसनसंसर्गाच्या रुग्णांची आकडेवारीही पाठवायला सांगितले आहे. त्याच्या आधारे कोरोना संसर्गाचे प्रमाण कुठवर आहे याचे अनुमान बांधले जाणार आहे.
गोव्यासारख्या राज्यात गणेशोत्सव आणि नंतर दिवाळी, नाताळ यामुळे पुन्हा बाधितांचे प्रमाण आटोक्याबाहेर जाणार नाही ना ही टांगती तलवार राहतेच. त्यामुळे पोलीस आणि आरोग्य खात्याने अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता तर आहेच, परंतु आम नागरिकांनीही स्वतः स्वतःच्या जिवाची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. सरकार काही घरोघरी पोहोचू शकणार नाही. पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेवर, नोकरी – व्यवसायांवर, व्यापार – उदिमावर, धंदे – उद्योगांवर कोरोनाचे सावट येऊ द्यायचे नसेल तर सध्याची बेफिकिरी सोडून पुन्हा एकदा किमान कोरोना त्रिसुत्रीचे पालन गरजेचे असेल. कोणी सांगावे, सध्याचा सौम्य व्हेरियंट उद्या म्युटेशन होऊन पुन्हा गंभीर रूपही धारण करू शकतो. त्यामुळे हे भान ठेवून खबरदारी घेणेच हितावह ठरेल.