कोरोनाचे रुग्ण वाढल्याने मुंबईत कडक निर्बंध

0
154

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत होत असल्यामुळे काल झालेल्या महापालिकेच्या बैठकीत पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विवाह कार्यालये, सभागृह आदी ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमात वा सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येण्यावर मर्यादा आणली गेली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात एकावेळी ५० पेक्षा जास्त जणांना एकत्र येता येणार नाही, असे आयुक्तांनी नमूद केले आहे. मास्क वापरण्यासह इतर नियमांचे पालन होत नसल्यास कठोर कारवाई करण्यात यावी, असेही आयुक्तांनी बजावले आहे. या नियमांची कालपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील बर्‍याच शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास लॉकडाऊनचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत बुधवारी ७२१ नवीन कोरोनाबाधित आढळले असून ४२ दिवसांतील ही सर्वाधिक रुग्णवाढ ठरली होती.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती, यवतमाळ, अकोला या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो असे म्हटले आहे. राज्यात गेले काही दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई, पुणे या शहरांच्या तुलनेत इतर जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

राज्यात नवे ५२ कोरोना रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत नवीन ५२ कोरोना रुग्ण आढळून आले असून आणखी मृत्यूची नोंद नाही. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५४,४२१ एवढी झाली आहे. सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५१० एवढी झाली आहे.

राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७८६ एवढी आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आणखी ५१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण ५३ हजार १२५ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्के एवढे आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ३८ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

चोवीस तासांत नवीन १४६६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. पणजीत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ४० झाली आहे. मडगावात रुग्णांची संख्या ३८, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ३७ रूग्ण, कुडतरी ३६ रूग्ण, पर्वरी ३५ रूग्ण, चिंबल ३० रूग्ण तर कुडचडे येथे ३० रूग्ण आहेत.