कोरोनाचे पुन्हा ४५६ नवे रुग्ण; ६ बळी

0
332

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. काल पुन्हा नवे ४५६ रुग्ण आढळून आले असून आणखी ६ कोरोना बळीची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या १७१ झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांची विद्यमान संख्या ३४४५ झाली आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या १५ हजार ४८३ आहे.
कोरोनाचे ३५६ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ८६७ एवढी आहे. कोरोना पॉझिटिव्ह होऊन सौम्य लक्षणे असलेल्या आणखी २१७ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला असून होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या ४१४६ झाली आहे.

आणखी ६ मृत्यू
राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. कोरोना रुग्णांचे मृत्यू रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश प्राप्त झालेले नाही. ताळगाव येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये २५ ऑगस्टला निधन झाले. मडगाव येथील ९५ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात २५ ऑगस्टला निधन झाले. मडगाव येथील ६९ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे कोविड इस्पितळात बुधवारी निधन झाले. बांबोळी येथील ८४ वर्षाच्या महिला रुग्ण, पारोडा येथील ६५ वर्षाच्या महिला रुग्ण, मडगाव येथील ५४ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात काल निधन झाले आहे.
गोमेकॉच्या आयसोलेशन वॉर्डात कोरोना संशयित ११२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. आरोग्य खात्याने २५२७ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी कोविड प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

व्हीआयपींची खासगी इस्पितळालाच पसंती

>> आरोग्य संचालक देखील खासगी इस्पितळात
राज्यातील व्हीआयपी कोरोना उपचारांसाठी सरकारी इस्पितळाच्या ऐवजी खासगी इस्पितळाला पसंती देत असल्याने राज्यात सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे. सरकारी इस्पितळातून कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने व्हीआयपी मंडळी खासगी इस्पितळात धाव घेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काल राज्याचे आरोग्य संचालक जुझे डिसा हेही कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तेही खासगी इस्पितळात दाखल झाले असल्याने नागरिकांनी तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे.

राज्यातील कोरोना उपचारांबाबत समाजमाध्यमावर जोरदार चर्चा सुरू असून सामान्य नागरिकांना कोरोनाबाबत योग्य उपचार देण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप केला जात आहे.
राज्य सरकारने कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मडगाव येथे खास कोविड इस्पितळ सुरू केले, तसेच बांबोळी येथील गोमेकॉमध्ये कोविड रुग्णावर उपचार करण्याची सोय उपलब्ध केली आहे. तरीही, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी कोरोना उपचारांसाठी खासगी इस्पितळात जाणे पसंत केले. आमदार सुदिन ढवळीकर, आमदार चर्चिल आलेमाव यांनी खासगी इस्पितळात उपचार घेण्यास पसंती दिली. आता खुद्द आरोग्य खात्याचे संचालक जुझे डिसा यांनीही कोरोनावर उपचार घेण्यासाठी खासगी इस्पितळालाच पसंती दिली आहे.