सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचे गोव्याशी धागेदोर

0
313

>> गोव्यातील हॉटेल व्यावसायिकाशी रियाचा संपर्क उघड

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचे धागेदोरे गोव्याशीही जोडले गेले असून सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉटस्‌ऍप चॅटमध्ये एका गोवास्थित परप्रांतीय हॉटेल व्यावसायिकाकडे ती अमलीपदार्थांची मागणी करीत असल्याचे आढळून आले असल्याने या प्रकरणी अमलीपदार्थविरोधी विभागाची नजर गोव्याकडे वळली आहे. या आरोपाची सत्यासत्यता तपासली जात आहे.

नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोचे पथक बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी चौकशीसाठी गोव्यात दाखल झाले आहे. अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी ईडी, सीबीआय आणि आता एनसीबीने चौकशी सुरू केली आहे.

अभिनेता सुशांत याची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि गोव्यातील एका मूळ परप्रांतीय हॉटेल व्यावसायिकादरम्यान अमलीपदार्थ विषयी संभाषणाची चौकशी केली जाणार आहे.

सदर हॉटेल व्यावसायिक मूळ दिल्ली येथील असून त्याचे हणजूण येथे हॉटेल आहे. गोव्यात नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोचे पथक दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाल्याने विविध माध्यमाच्या प्रतिनिधींनी सकाळपासून हणजूण येथे सदर हॉटेलजवळ तळ ठोकला आहे.
गोव्यातील किनारी भागात परराज्यातील अनेकांकडून चालविली जाणारी हॉटेले या प्रकरणामुळे आता संशयाच्या घेर्‍यात आली आहेत. रेव्ह पार्टी प्रकरणी एका बॉलिवूड अभिनेत्याला नुकतीच अटक झाली होती, त्याचा व ह्या हॉटेल व्यावसायिकाचा काही संबंध होता का याबाबत आता चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

सीबीआयकडून सर्व संबंधितांच्या जबान्या
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणास अमली पदार्थ विषयक अंग असल्याचे समोर आल्याने तपासाला आता वेग आला आहे. काल सीबीआयने रियाचा भाऊ शोविक यालाही चौकशीसाठी बोलावून घेतले.

सुशांतच्या वांद्य्रातील फ्लॅटमध्ये राहणारा त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला सतत सातव्या दिवशी चौकशीसाठी पाचारण करून त्याचीही काल जबानी घेण्यात आली. डीआरडीओच्या कालिना येथील गेस्ट हाऊसवर त्यांची स्वतंत्रपणे जबानी घेण्यात आली. बुधवारीही त्याची जवळजवळ बारा तास चौकशी करण्यात आली होती. सुशांत आणि त्याची मैत्रीण मुंबईतील ज्या रिसॉर्टमध्ये दोन महिने राहिले होते, त्याच्या व्यवस्थापकालाही काल चौकशीसाठी बोलावून घेण्यात आले होते. सीबीआयच्या एका पथकाने कूपर इस्पितळालाही काल भेट दिली, जेथे सुशांतची शवचिकित्सा करण्यात आली होती.
सुशांतचे वडील के. के. सिंग यांनी आपल्या मुलावर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने विषप्रयोग केल्याचा आरोप केला. त्यांनी काल १५ सेकंदांचा एक व्हिडिओ जारी केला, ज्यात सदर आरोप केला आहे. रिया व तिच्या साथीदारांना सीबीआयने अटक करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

रिया हिने काल इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी करून पत्रकारांपासून आपल्या कुटुंबाला धोका असून त्यांना पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी तिने केली आहे.

दरम्यान, पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्ती हिने आपण सुशांतसिंह राजपूतच्या पैशांवर चैन करीत असल्याचा आरोप फेटाळला आहे. युरोप सफरीदरम्यानच आपल्याला सुशांतची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समजल्याचा दावाही तिने केला आहे.