कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्‍यांनी सीटी स्कॅनऐवजी एक्स-रे काढावा

0
152

>> एम्सचे प्रमुख डॉ. गुलेरिया यांचे आवाहन

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी गरज नसताना सीटी स्कॅनसाठी जाऊ नये. त्यांनी छातीचा एक्स-रे काढावा असा सल्ला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी काल दिला. लक्षणे नसलेल्या परंतु कोवीडबाधीत आढळलेल्या रुग्णांपैकी तीस ते चाळीस टक्के रुग्णांनी सीटी स्कॅन केल्याने त्यांच्या अंगावर डाग दिसून आल्याचे ते म्हणाले.

एक सीटी स्कॅनचा परिणाम तीनशे ते चारशे एक्स रेंएवढा असतो. त्यामुळे घातक किरणोत्सर्गामुळे पुढील आयुष्यात कर्करोग होण्याचा संभव असतो असे डॉ. गुलेरिया म्हणाले. ‘‘तुम्हाला शंका असेल तर छातीचा एक्स रे काढा’’ असे डॉ. गुलेरिया म्हणाले.

कोरोनाची सौम्य लक्षणे असतील तर रक्ताची चाचणी, सीपीसी, एलडीएच चाचणी करायची गरज नसते असेही त्यांनी सांगितले. कोरोना रुग्णांनी सौम्य लक्षणे असताना स्टेरॉईडस् घेतली तर त्यामुळे तीव्र न्युमोनिया होऊ शकतो व फुफ्फुसांत पसरू शकतो असे डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले. केवळ गंभीर रुग्णांनाच स्टेरॉईडस् दिली जावीत असे त्यांनी सांगितले.