– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)
सगळ्या वाईट शक्तींपासून रक्षा करण्याचे सामर्थ्य या धूपनात आहे, म्हणून तर आपण लहान मुलांना जन्मल्यानंतर लगेच धूपन सुरू करतो. लेखात सांगितलेल्या सगळ्या रेसिपी तुम्ही नक्की करा, त्याचे सेवन करा, पालन करा, प्राणायाम करा, घरीच रहा व स्वस्थ रहा.
कोरोना व्हायरसचा प्रतिबंध म्हणून ‘लॉकडाऊन’ झाले खरे, पण या काळात कुणी आपला छंद जोपासला, कितीतरी चित्रकार ङ्गेसबुकवर पाहायला मिळालेत. कुणी व्यायाम सुरू केला. कुणी पुस्तकं वाचायला घेतली. त्यावर भर म्हणून टीव्हीवर रामायण-महाभारत यांसारख्या मालिका पुनःप्रक्षेपित होऊ लागल्या. वृद्ध परत भूतकाळात जाऊन ताजेतवाने झालेत. या लॉकडाऊनच्या काळात सगळ्यात मोठे संकट होते ते मुलांच्या आयांवर. घरकामाची सवय मोडलेली, मुलांनाही पिझ्झा-बर्गर-केक-आईस्क्रीम इत्यादींची सवय लागलेली. मग काय… सगळ्या माता बनल्या मास्टर शेङ्ग..! घरच्या घरीच बनू लागले बरेच खाद्यपदार्थ- जसे केक, आईस्क्रीम, पिझ्झा, बर्गर… बरंच काही. काही अंशी तर चायनीज, इटालियन खाद्यपदार्थांची जागा भारतीय खाद्यपदार्थांनीही घेतली.
या क्रिएटिव्ह खाद्यपदार्थांबरोबर काही गोष्टी ज्या आरोग्यासाठी हितकर आहेत त्याही जाणून घ्या. या सगळ्या पाककृती ‘कोविद-१९’च्या लढ्यात नक्की मदत करतील.
१) सुवर्णसिद्ध जल –
साधारण चार ते पाच लीटर पाण्यात किंवा कुटुंबात जेवढी माणसं असतील त्यांना प्रत्येकी एक लीटर असे प्रमाण घेऊन, त्या पाण्यात एखादे शुद्ध सोन्याचे नाणे किंवा वळं घालून पाणी चांगले १५-२० मिनिटे उकळू द्यावे व हे उकळलेले पाणी घरातील सर्व मंडळींनी पिण्यासाठी वापरा. तेच नाणे किंवा तेच वळं परत परत पाण्यात टाकून पाणी उकळता येते. यालाच सुवर्णसिद्ध जल असे म्हणतात. हे जल उत्तम रसायन आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो.
२) षडंगोदक –
षडंगोदक करण्यासाठी मुस्ता, चंदन, शुंठी, पांढरा वाळा, काळा वाळा, पर्पट समभाग घेऊन त्याने पाणी सिद्ध करावे/उकळावे. यालाच षडंगोदक म्हणतात. या षडंगोदकाला जनोपध्वंस रोगाच्या, साथीच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व रिसर्च सेंटर आणि गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन (जीएएम्ए) यांच्या संयुक्त विचाराने षडंगोदक तयार करण्याची ‘रेडी टू यूज’ अशी पाकिटे तयार करण्यात आली आहेत. ही पाकिटे गोव्यातील बर्याच आयुर्वेदिक डॉक्टरांकडे उपलब्ध आहेत. ती पावडर सर्वसामान्य जनतेने डॉक्टरांकडून घेऊन घरातील सगळ्या मंडळींनी त्या पाण्याचे सेवन करावे.
पाणी तयार करण्याची पद्धत –
– पाव चमचा पावडर घ्यावी व दीड लीटर पाण्यासह १० मिनिटे उकळावी. हे पाणी पिण्यासाठी वापरावे. हे औषधी पाणी संपले की साधे कोमट पाणी प्यावे. दररोज नवीन औषधसिद्ध पाणी बनवावे.
३) चहा/काढा –
चार-पाच लवंगा, चार-पाच मिरी, दालचिनीचा छोटासा तुकडा, तुळशीची चार- पाच पाने चार पेले पाण्यात चांगली चहासारखी उकळावी. चवीसाठी थोडासा गूळ घालावा व हा चहा दूध घालून किंवा दुधाशिवाय चहा/कॉङ्गीऐवजी घ्यावा. याने सर्दी-खोकल्यासारखे कङ्गाचे व्याधी होत नाही व वारंवार डॉक्टरांची भेट घ्यावी लागणार नाही.
४) हळदीचे दूध –
‘पी हळद अन् हो गोरी’ एवढ्यापुरतेच हळदीचे कार्य मर्यादित नाही. हळद अँटी-बायोटिक, अँटी-व्हायरल अशी विषाणूविरुद्ध लढा देण्यास मदत करणारी आहे. हळद घालून दूध चांगले उकळावे म्हणजे हळदीचे गुण दुधात उतरतात. चवीसाठी पाहिजे असल्यास दूध पिताना त्यात थोडासा गूळ घालावा. हे दूध घसा खवखवत असल्यास ङ्गारच ङ्गायदेशीर ठरते.
५) पंचामृत –
एक चमचा साखर, एक चमचा मध, एक चमचा दही, दोन चमचे साजूक तूप, सहा-सात चमचे कोमट दूध… हे प्रमाण एका व्यक्तीसाठी आहे. पंचामृत करताना घटकद्रव्ये वरील क्रमाने मिसळावीत. पंचामृत हे नावाप्रमाणेच अमृत असून ते रोगाचा नाश करते व आयुष्य व रोगप्रतिकारशक्ती वाढवते. हे एक चांगले रसायन आहे. रोज सकाळी नाश्त्याच्या अगोदर पंचामृताचे सेवन करण्याने आरोग्यास अत्यंत लाभ होतो.
६) मूग-डाळ सूप –
मूग हे सर्वांत पथ्यकर कडधान्य आहे. ते त्रिदोषांवर कार्य करणारे, पचण्यास हलके धान्य आहे. तसेच मुगात प्रथिनेही मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून मूगडाळीची खिचडी, मूगडाळीचे सूप हे लहान-मोठ्या-थोरांसाठी, गर्भवतींसाठी, बाळंतपणानंतर सर्वांसाठी उपयुक्त आहे. या उन्हाळ्यात तसेच या लॉकडाऊनच्या काळात खूपच हितकारक आहे.
मूगडाळ सूप करण्यासाठी एक वाटीभर मूगडाळ धुवून घ्यावी. जाड बुडाच्या पातेल्यात तुपावर जिरे, हिंग, हळद, मिरची घालून थोडा वेळ परतावे. नंतर त्यात मुगाची डाळ टाकून परतावे. आवडत असल्यास काही भाज्यांचा वापरही करता येतो. नंतर गरम पाणी टाकून मीठ, साखर व आले टाकून मुगाची डाळ शिजेपर्यंत उकळावे. शिजल्यावर रवीने चांगले एकजीव करून घ्यावे व वरून थोडेसे खोबरे व कोथिंबीर पेरावी.
७) कुळीथ सूप
कुळीथ हे कडधान्य पचायला हलके असून वात व कङ्गदोष शमवणारे आहे. याने जाठराग्नीची ताकद वाढते व मलमूत्रप्रवृत्तीही साङ्ग होते.
कुळीथ सूप बनवताना जाड बुडाच्या पातेल्यात तुपावर जिरे, हिंग, हळद, आल्याचा किस घालून थोडा वेळ परतावे. या ङ्गोडणीवर गरम पाणी, मीठ व आमसूल घालून उकळी आल्यावर आच मंद करावी.
यातच साधारण ५० ग्रॅम कुळथाचे पीठ गुठळ्या होणार नाहीत अशा बेताने हळूहळू भुरभुरावे व सुमारे ५-६ मिनिटे शिजू द्यावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाढायला घ्यावे.
अशा याकाही खाण्याच्या रेसिपीज बरोबर औषधी द्रव्ये वापरून रक्षोघ्न पदार्थ बनवण्याच्या कृतीही खाली देत आहे…
१) धूमवर्ती –
धूम म्हणजे धूर व वर्ती म्हणजे वात, धुराची वात. धुराची वात बनवण्यासाठी त्रिकटू पावडर, वेखंड पावडर, सुंठ पावडर, त्रिङ्गळा पावडर, हळद पावडर हे सगळे जिन्नस समभाग घ्यावे म्हणजे साधारण १-१ चमचा प्रत्येकी जर एखादी पावडर नसेल तर आहे तीच पावडर किंवा त्यात ओव्याची पूड, दालचिनी पूड, मिरी पूड, लवंगीची पूड किंवा कापराची पूडही घालू शकता. ही सगळी समभाग घेतलेलीू पावडर थोड्याशा पाण्याने, आपण अळू वडीला मिश्रण कालवतो त्याप्रमाणे कालवून घ्यावे. नंतर साधारण अडीच ते पाच इंच असे कॉटन बँडेजचे तुकडे कापावे. या तुकड्यांवर वरील कालवून ठेवलेल्या मिश्रणाचा पातळ थर पसरावा व नंतर त्याची बारीक बिडीप्रमाणे गुंडाळी करावी. अशा वाती तयार करून चांगल्या कडक उन्हात दोन-तीन उन्हं दाखवून वाळवून घ्याव्यात. मग झाल्या धूमवर्ती तयार!
धूमवर्ती कशी वापरावी?…
धूमवर्तीचे टोक प्रथम खोबरेल तेल अथवा तिळ तेलाच बुडवून अग्नीने पेटवावे. तेल असेपर्यंत हे टोक ज्योतिप्रमाणे जळेल. मग विझल्यावर त्यातून धूर निघेल. हा धूर प्रथम उजव्या नाकपुडीतून आत घ्यावा व तोंडावाटे बाहेर सोडावा. परत ही धूमवर्ती डाव्या नाकपुडीजवळ नेऊन त्यातून निघणारा धूर डाव्या नाकपुडीतून आत घ्यावा व तोंडावाटे बाहेर सोडावा. असा एक एक झुरका घरातील प्रत्येकाने सकाळी- संध्याकाळी करावे. नंतर धूमवर्ती विझवून ठेवून द्यावी.
धूमवर्ती का वापरावी?…
हे धूमपान सर्दीवर रामबाण उपाय आहे. याने घशात अडकलेला कङ्ग बाहेर पडण्यास मदत होते. नाका-डोळ्यातून पाणी येत असेल किंवा सायनससाठी खूपच हितकारक आहे.
२) रक्षोघ्न धूपन –
जनोपध्वंस आजारामध्ये आयुर्वेद शास्त्राने धूपनालाही खूप महत्त्व दिलेले आहे. वातावरणातील शुद्धता, विषाणूची बाधा होऊ नये म्हणून सर्वांनी आपल्या घरात, दारात, बाजारात, चौकात, गावात, शहरात धूपन करावे.
धूपन करण्यासाठी उपलब्ध असल्यास शेणाच्या गोवर्या पेटवून त्याचे निखारे झाल्यावर त्यामध्ये कडुनिंबाची सुकी पाने, करंजाची सुकी पाने, लसणीची साले, कांद्याची साले, वेखंडाचा तुकडा, गायीचे शुद्ध तूप व थोडेसे तांदूळ घालून चांगला धूर येईपर्यंत धूपन करावे.
हे धूपन सकाळ व संध्याकाळ (सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी) नक्की करावे. सगळ्या वाईट शक्तींपासून रक्षा करण्याचे सामर्थ्य या धूपनात आहे, म्हणून तर आपण लहान मुलांना जन्मल्यानंतर लगेच धूपन सुरू करतो.
वरील सगळ्या रेसिपी तुम्ही नक्की करा, त्याचे सेवन करा, पालन करा, प्राणायाम करा, घरीच रहा व स्वस्थ रहा.
सूचना ः आयुर्वेद कॉलेज आणि गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन (जीएएमए) यांनी संयुक्तरीत्या अधणठॠजअउजतखऊ१९ नावाची ऍप तयार केली आहे. त्या ऍपमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, उत्तम पौष्टीक आहार आणि आयुर्वेदावर आधारित जीवनशैली यावर मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. तसेच यामध्ये गोवा सरकारद्वारा क्वारंटाईन कालावधीत पाळावयाचे पथ्यापथ्य, व्हिडिओ आणि कोविद-१९बद्दल माहिती देण्यात आलेली आहे.