- डॉ. मनाली महेश पवार
सगळ्यांचे आरोग्य औषधाविना उत्तम राहावे, जन्मा घातलेल्या व जन्म घेऊ पावणाऱ्या नवनवीन रोगांचा नायनाट व्हावा, हे आयुर्वेदशास्त्राचे ध्येय आहे. ही आरोग्यसंपन्नता मिळवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची आहे शुचिता म्हणजे स्वच्छता. शारीरिक व मानसिक शुद्धता, बाहेरील व आतील शुद्धता.
सगळ्यांचे आरोग्य औषधाविना उत्तम राहावे, जन्मा घातलेल्या व जन्म घेऊ पावणाऱ्या नवनवीन रोगांचा नायनाट व्हावा, हे आयुर्वेदशास्त्राचे ध्येय आहे. ही आरोग्यसंपन्नता मिळवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची आहे शुचिता म्हणजे स्वच्छता. शारीरिक व मानसिक शुद्धता, बाहेरील व आतील शुद्धता.
शरीराची बाहेरील शुद्धता म्हणजे स्वतःचं घर, आपला परिसर, आपला गाव, आपलं शहर, आपलं राष्ट्र स्वच्छ ठेवणे म्हणजे जनोपध्वंस, संक्रमणक आजार होण्याची शक्यता टाळता येते. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे स्वतःची शारीरिक स्वच्छता राखण्यासाठी दिनचर्येचे आचरण करावे. नेहमी उठल्यावर दंतधावन करावे. तिळाचे तेल किंवा खोबऱ्याचे तेल संपूर्ण अंगाला लावून स्नान करावे म्हणजे त्वचेचे आजार टाळले जातात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा डोके म्हणजे केस धुवावे, जेणेकरून ऊवा होत नाहीत, कोंडा होत नाही. नाकाच्या शुद्धतेसाठी रोज दोन थेंब तेलाचे दोन्ही नाकपुडीत टाकावे. कानाच्या आरोग्यासाठी कर्णपूरण करावे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी नेत्रतर्पण करावे. मुखाच्या आरोग्यासाठी गण्डूष करावे. स्नानानंतर सुगंधित अत्तरे शरीराला लावावी म्हणजे पूर्ण दिवस प्रसन्न वाटते. अशा प्रकारे बाह्यतः शरीर स्वच्छ व शुद्ध ठेवावे.
आपल्या शरीराची आतील शुद्धी आपल्या आहार-विहारावर अवलंबून असते. ‘आहारः रोगः संभवः।’ ज्याप्रमाणे आपला आहार असतो, त्याप्रमाणे आपले आरोग्य. आहारातून आरोग्यही मिळते व रोगही उत्पन्न होतात. आपण काय खातो? कसे खातो? केव्हा खातो? कुठले खातो? यावर आपले आरोग्य, शारीरिक शुद्धता अवलंबून असते.
शरीरशुद्धी आहार सेवन नियम
आजच्या काळात आपण काय खातो यापेक्षाही आपण कधी खातो यावर जरा प्रत्येकाने कटाक्ष टाकावा. खरेतर खरोखरीची भूक लागल्यावर जेवले पाहिजे. पण आज आपण भूक ही संवेदना उत्पन्न व्हायलाच मुळी वेळ देत नाही. सारखं चरत असतो. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण असे नियम पाळताना केवळ सवय म्हणून जेवू नये. घड्याळाला पाहून आपण जेवावे का नाही हे न ठरवता, आपला अग्नी काय म्हणतो याकडे लक्ष द्यावे. नैसर्गिकरीत्या विचार करता पित्तकाळामध्ये साधारण दहा ते दुपारी दोन या काळात सूर्य डोक्यावर आला असता जेवावे. साधारण दहा-साडेदहा वाजता जेवल्यास बारा वाजता सूर्य डोक्यावर येतो तेव्हा पित्ताचा सर्वोत्तम काळ असतो. अशावेळी आपण खाल्लेले उत्तमरीत्या पचते. म्हणून आपण काय खातो, त्यापेक्षा आपली पचनशक्ती कशी आहे हे महत्त्वाचे आहे.
- पहिल्या जेवणानंतर पुढे तीन तास काहीही खाऊ नये व सहा तासांपेक्षा जास्त उपाशी राहू नये.
- दुसरे जेवण हे साधारण पाच ते सहा या काळात सेवन करावे. पण व्यावहारिकरीत्या हे शक्य नाही म्हणून शक्यतो रात्री उशिरात उशिरा आठ वाजेपर्यंत जेवावे.
- रात्रीचे जेवण हे पचायला हलके असावे म्हणून रात्रीच्या पार्ट्या टाळाव्यात. बाहेरचे हॉटेलमधील अन्न टाळावे.
- आपल्या प्रदेशात जे सवयीचे आहे ते खावे. आपल्या कोकण प्रांतात भात-मासे, नारळ पिकतात. आपण याचे सेवन करू शकतो. उगाचच पिझ्झा, पास्ताच्या मागे लागू नये.
- आहार हा नेहमी लघु म्हणजे पचायला हलका असावा. मांस, मैदा, बेकरी प्रॉडक्ट, वनस्पती तूप, चीज, पनीर, मशरुम यांसारखे पदार्थ सारखे आपल्या आहारात असू नयेत. ते पचायला जड असतात आणि आपण नेमके तेच खातो. अन् हेच आम्हाला आवडतात.
- घरचे साजूक तूप, लोणी अवश्य खावे, पण अतिशयोक्ती टाळावी. तेलकट, तूपकट खूप फॅट असलेले पदार्थ टाळावेत. त्याचबरोबर कोरडे पदार्थही जास्त खाऊ नयेत. सारखे नवीन फॅडप्रमाणे रुक्ष सॅलॅड खाऊ नये.
- शक्यतो ताजे, तव्यावरून ताटात जसे आपल्याला पूर्वी आजी वाढायची, साधारणतः त्याच पद्धतीने खावे. पुन्हा पुन्हा गरम करून, फ्रीजमध्ये ठेवून गरम करून खाऊ नये. ओव्हन, मायक्रोवेव्हमध्ये तर कधीच गरम करू नये किंवा आहार बनवूही नये.
- जेवताना रेंगाळत, गप्पा मारत जेवू नये. तसेच कुत्रं मागे लागल्यासारखंही जेवू नये असे पूर्वी सांगत. दोन घासांमध्ये पुरसा वेळ व पोटामध्ये पुरेशी जागा शिल्लक राहील असे जेवावे.
- जेवताना पुरेसे पाणी प्यावे. साधारण दर चार घासानंतर एक घोट पाणी प्यावे म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे आमाशयामध्ये योग्य पद्धतीने पाचक रसांच्या सोबत, अग्नितत्त्वांबरोबर चांगले मिश्रण व्हायला मदत होते. जेवण जेवताना अजिबात पाणी न पिणे ही चुकीची सवय आहे.
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भूक लागली असेल तरच जेवावे. भूक लागली असताना चहा पीणे, कॉफी पिणे, स्नॅक म्हणजे वडा-पावसारखे जंक फूड खाणे टाळावे.
- पुरेशा प्रमाणात जेवण जेवावे. तडस लागेल इतके जेवू नये.
अशा प्रकारे योग्य तज्ज्ञ वैद्याच्या सहाय्याने आपल्या प्रकृतीनुरूप, आपल्या प्रदेशातील उत्पन्न होणाऱ्या अन्नधान्यावरून आपला आहार ठरवावा व त्यानुसार आहार सेवन करावा. म्हणजे खाल्लेले अन्न योग्य रीतीने पचते व आतडी स्वच्छ राहते. ही शारीरिक अंतशुद्धी झाली.
शरीर शुद्ध ठेवायचे असल्यास कुठलेही व्यसन असू नये. हॉटेलमध्ये खाणे किंवा बाजारच्या खाद्यवस्तू खाणेसुद्धा धोक्याचे असते. त्या अशुद्ध खाण्यामुळे रोग होतात. रस्त्यावर खाणेसुद्धा निषिद्ध आहे. प्रत्येकाने स्वतःपुरती स्वच्छता पाळली तरी सर्वांचे कल्याण होईल.
- मन व बुद्धी शुद्ध होण्यासाठी सतत चांगले सात्त्विक वाचन, चिंतन, मनन करावे. नामजपानेही शुद्धी होते. सतत आपल्या मनात डोकावून पाहावे व मनात वाईट विचार येणार नाहीत याची काळजी घ्यावी. घाणेरडे वाचणे, पाहणे टाळावे. आपली मित्रमंडळीसुद्धा सात्त्विक विचारांचीच असावी. साधुसंतांची चरित्रे वाचावी, अनुभव ऐकावेत, सत्संग करावा. अशाप्रकारे मन-बुद्धी शुद्ध होते.
आजच्या काळात शुचित्वाचा (शुद्धतेचा) विचार करताना घरचं खाणं आणि हॉटेलचं खाणं यावर विचार होणे खूप महत्त्वाचे आहे. बाह्यतः स्वच्छ आणि मूलतः त्या अन्नाचे घटकद्रव्य आणि कृती करतानाचे साहित्य, तसेच करणाऱ्याचे हात व शरीर यांच्या स्वच्छतेचा विचार करणे आवश्यक आहे.
वैचारिक, बौद्धिक, भावनिक शुचित्व घरातील गृहिणी जी स्वयंपाक करून आपल्याला खायला घालते तिच्यावर बऱ्याच अंशी अवलंबून असते. परंतु अशा प्रकारचे बाह्य अभ्यंतर, शारीरिक, वैचारिक, बौद्धिक, भावनिक शुचित्व हे घराबाहेर ऑनलाइन फूड, हॉटेलमध्ये असणे कदापिही शक्य नाही. अशुद्ध खाण्यामुळे रोग होतात. हॉटेलातील लोक प्राथःविधी उरकून आल्यावर हात स्वच्छ धूत असतील का? त्याच घाणेरड्या हातांनी खाद्यपदार्थ आणतात. साहजिक अन्न अशुद्ध होते व रोग होतात. रस्त्यावरचे खाताना तोंडात धूळ व अन्नाबरोबर घाणीचे कण वाऱ्याबरोबर पोटात जाऊ शकतात. त्यामुळे अशुद्धता येते. म्हणून घरचे अन्न, घराच्या गृहिणीने व इतराच्या सहाय्याने पूर्ण शूचित्व बाळगून प्रसादाप्रमाणे बनवावे व सगळ्यांनी प्रसादाप्रमाणेच ते ग्रहण करावे. म्हणजे तो मिताहार होईल. तो सात्त्विक असेल, नैसर्गिक असेल. अशा या सात्त्विक आहार ग्रहणाने आपले विचार शुद्ध होतील, पर्यायाने शरीर, मन, बुद्धी, आत्मा शुद्ध व आरोग्यसंपन्न होईल.