कोकणी रंगभूमीचा प्रवास

0
467

– पुंडलिक नायक

नाटक हा ललित साहित्याचाच एक प्रकार आहे. नाटकाच्या रंगमंचावरील आविष्कारात दृक आणि श्राव्य या दोन घटकांची भर पडते. त्यामुळे त्यातील साहित्यिक मूल्य अधिक स्पष्टपणे आणि प्रभावीपणे उठून दिसते. नाटक म्हणजे चालणारा, बोलणारा साहित्य प्रकार. खरे नाटक पुस्तकांत नाही तर प्रयोगात असते. कोकणी नाटक आज आपली स्वत:ची ओळख घडविण्यात यशस्वी ठरलेले आहे. गोमंतकीय जीवनाची वास्तवपूर्ण प्रतिमा दाखवण्याची ताकद आणि सामर्थ्य कोकणी नाटकाने संपादन केलेले आहे. मराठीतील नामवंत नाटककार मामा वरेरकर एकदा विष्णू नाईक यांना म्हणाले होते, ‘‘तुम्ही कोकणी नाटके घेऊन जनसामान्यांपर्यंत गेल्याशिवाय कोकणी भाषेचा कोणी स्वीकार करणार नाहीत.’’ मामा वरेरकरांचा आशीर्वाद आज फळाला आला आहे.

मराठी नाट्यपरंपरा समृद्ध करण्यात गोमंतकीयांचे योगदान फार मोठे आहे. मूळ मराठी नाटकाचे जन्मस्थान म्हणण्यापर्यंत या योगदानाची मजल जाते. कोकणी नाटकाला मराठी परंपरेचा आधार लाभणे स्वाभाविक आहे. पण या आधारात मोठा धोकाही होता. तो म्हणजे आधाराचे अनुकरण होण्याची शक्यता; पण तसे घडले नाही. १९७५ नंतर कोकणी नाटकाच्या क्षेत्रांत वावरणारे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, संगीतकार तसेच कलाकार खूप सावधपणे वागलेले आढळतात. कोकणी नाटक, म्हणजे मराठी संवादाऐवजी कोकणी संवाद आणि बाकीचा सगळा ढांचा मराठीच राहाणार अशी दाट शक्यता होती. पण तसे झाले नाही. कोकणी नाटकाने भाषा तर कोकणी आणलीच पण त्याचबरोबर विषय, व्यक्तीरेखा, नेपथ्यशैली इतकेच नव्हे तर संगीतसुद्धा कोकणीच असेल याची काळजी घेतली. म्हणूनच अवघ्या पाव शतकात म्हणजे २००० पर्यंत कोकणी नाटकाने प्रगत अशा भारतीय रंगमंचावर मांडीला मांडी लावून बसण्याचा मान संपादन केलेला आहे. कोकणी नाट्यचळवळ कला अकादमीच्या कोकणी नाट्यस्पर्धेपासून सुरू झाली. ही स्पर्धा आता पस्तीस वर्षांची झाली आहे. ह्या काळात शंभर-सव्वाशे इतक्या स्वतंत्र नाट्यसंहिता निर्माण झाल्या आहेत. अनेक संहितांची पुस्तके छापून आली आहेत. नाट्यलेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांचा एक ताफाच तयार झाला आहे.
ज्याकाळी कोकणी माणूस गोव्यात मराठी नाटकांतून आपली भूक भागवित होता, कर्नाटकातला कोकणी माणूस कन्नड नाटकांतून तर केरळातला कोकणी माणूस मल्याळम नाटकातून आपली भूक भागवत होता, त्याकाळी एकट्या बोळंतूर कृष्ण प्रभू यांना कोकणी नाटकाचे स्वप्न पडले. ते कोकणी साहित्याच्या बाबतीत शणै गोंयबाब ऊर्फ वामन वर्दे वालावलकर यांना पडले होते. जे स्वप्न कोकणी तियात्राच्या बाबतीत पाय तियात्रीस्त जुवांव आगोस्तीन फर्नांडिस यांना पडले होते. बोळंतूर कृष्ण प्रभू यांनी कर्नाटकातल्या बंटवाळ गावी १९१२ साली संगीत राजा चंद्रहास नाटक लिहून तिथेच रंगमंचावर सादर केले. कोकणीतले हे पहिले नाटक. मुंबई महानगरात लोकनाट्यशैलीच्या तियात्राचा जन्म झाला. शणै गोंयबाब यांचे ‘मोगाचे लग्न’, ‘झिलबा राणो’, ‘पोवनाचे तपले’ यासारखी अनुवादित नाटके इथेच रचली आणि सादर झाली. महाविद्यालयीन स्तरावरील आधुनिक स्वरूपाच्या कोकणी एकांकिका स्पर्धा मुंबई शहरात होत होत्या आणि त्यात मुंबईत स्थायिक झालेले गोवेकर तसेच कर्नाटकातील कोकणी विद्यार्थी सहभागी होत होते. गोवा स्वतंत्र होण्याअगोदरच्या शेवटच्या दशकातील म्हणजे १९५०-६० वर्षांतील ही गोष्ट आहे. कोकणी नाटकासाठी महत्त्वाचे योगदान घडले ते कर्नाटकातून मुंबईला येऊन स्थायिक झालेल्या कोकणी भाषिक लोकांकडून. हे मूळ गोव्याचेच लोक. पोर्तुगीज काळात कर्नाटकामध्ये स्थलांतरित झालेले. एक सुबुद्ध समाज. त्यांना कन्नड भाषा आणि कन्नड नाटकाची चांगली पार्श्‍वभूमी होती. मुंबईत येऊन त्यांनी प्रगत अशा मराठी भाषेचा आणि नाटकाचा अभ्यास केला. मुुंबईतील हिंदी, गुजराती, इंग्लिश अशा प्रायोगिक रंगभूमीचा आधार घेतला आणि तोडीस तोड अशी कोकणी नाटकांची निर्मिती केली. सद्या मुंबईत डॉ. चंद्रशेखर शेणॉय कोकणी नाटकाचे अनुवादक, दिग्दर्शक आणि संघटक-निर्माते म्हणून काम करत आहेत.
महाराष्ट्र राज्यात म्हणजे मुंबईत जी कोकणी माणसे आहेत तेवढ्यापुरतीच कोकणी रंगभूमी मर्यादित राहिलेली नाही. महाराष्ट्रातील कोकण प्रदेश हा कोकणीभाषक प्रदेश आहे. रंगभूमीविषयी बोलायचे झाल्यास, कोकणात सावंतवाडी आणि आजूबाजूच्या जवळच्या भागात गोव्यातील व्यावसायिक तियात्र सादर होतात. तेथील कोकणी भाषिक माणसे त्या कोकणी नाट्यकृतींना चांगला प्रतिसाद देतात. मालवणात वस्रहरण फेम मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी नाटकांची एक परंपरा सुरू केली. कर्नाटक राज्य हे सगळ्यात जास्त कोकणीभाषीक माणसे असलेले मोठे राज्य. पहिले कोकणी नाटक कर्नाटकातील बंटवाळ गावी झाले. नंतर ही परंपरा खंडित झाली. पण हिंदूच्या मठ-मंदिर प्राकारांत कोकणी नाटके अजूनही सादर होतात. ख्रिश्‍चन समाजामध्ये चर्चच्या सहकार्याने कोकणी नाटक खूप ताकदवान झालेले दिसले. मंगळूर कोकणी नाटक सभा या संस्थेने कोकणी रंगभूमीची जी सेवा केलेली आहे तिला तोड नाही. १९६० पासून या संस्थेतर्फे ही नाट्यस्पर्धा होत होती. मंगळुरातील डॉन बॉस्को सभागृहात ही नाटके सादर होत होती. कोकणी नाटक सभेची ही स्पर्धा १९९० पर्यंत चालली आणि नंतर बंद पडली. पण मंगळुरात एक आशेची किरण दिसत आहे. नव्या नाट्यक्षेत्रातील अरुण राज कलांगण संस्थेमार्फत नाट्यलेखन आणि निर्मितीत नवनवीन प्रयोग होत आहेत. केरळात मात्र कोकणी नाटक अजून रुजलेले नाही. तेथील कोकणी माणसाला नाटकाची उपजत ओढ आहे. आपली नाटकाची तहान ते मल्याळम भाषेतील नाटके पाहून भागवतात. तिथे एकेकाळी नारायण नरसिंह पै यांनी कोकणी नाटके मोठ्या प्रमाणात सादर केल्याचा उल्लेख आढळतो. आज अधूनमधून एखाद दुसरे नाटक सादर होत असते.
गोव्यात कोकणी जशी व्यासपीठाची भाषा आहे तशी ती नाटकाची पण भाषा आहे. राज्य स्तरावरील नाट्यस्पर्धा येथे गेल्या ३५ वर्षे अखंडितपणे चालू आहे. गावागावांत कोकणी नाट्यमहोत्सव भरवले जातात. देशातील मुंबई हे पहिल्या क्रमांकाचे शतकमहोत्सवी केंद्र आहे. तिथे मराठी नाटकांचे शतकमहोत्सव होत असतात. देशात शतक महोत्सवांचे दुसरे केंद्र गोवा आहे. येथे कोकणी तियात्राचे शतक महोत्सव होतात. आता कोकणी नाटकाचे शतक महोत्सव व्हायला लागले आहेत. राजदीप नाईक यांनी शतकवीर होऊन कोकणी नाटकाची शतके पूर्ण करण्याचा नाट्यविक्रम केला आहे.
गोव्यातील उत्सवी रंगमंचावरील कोकणी नाटक सादर झाले तो काळ आताचा. त्यासाठी नाट्यलेखक म्हणून मी आणि नाट्य दिग्दर्शक आणि नाट्यसंघटक म्हणून श्रीधर कामत बांबोळकर यांनी बरेच काम केलेले आहे. १९८८ साली सुरू झालेला हा नाट्यप्रवास २०१४ पर्यंत म्हणजे अवघ्या दीड दशकाच्या काळात फुलला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एकेकाळी जिथे कोकणी नाटक नावाची वस्तूच नव्हती तिथे कोकणी नाटक रसरसून वर येते आहे, ते आम्ही डोळ्यांनी पाहतो. नाटक ही एक सांघिक कला. लेखन, दिग्दर्शन, कलाकार, तंत्रज्ञ आणि शेवटी प्रेक्षक यांच्या एकत्रित सहकार्याने नाटक पूर्ण होते. शंभर वर्षांच्या काळात कोकणी रंगभूमीने बर्‍याच गोष्टी जोडलेल्या आहेत. उत्सवी, स्पर्धात्मक आणि निम्नव्यावसायिक अशी रंगमंंचांची विविध रूपे तयार झालेली आहेत. कोकणी नाटकांचे राज्य स्तरावरील नाट्यमहोत्सवांचे आयोजन होत आहे. बहुभाषिक राष्ट्रीय नाट्यमहोत्सवात कोकणी नाटकाला एक जागा मिळालेली आहे. महाविद्यालयीन तसेच पदव्युत्तर स्तरावर नाटक या साहित्य प्रकाराचा अभ्यास होतो. कोकणी नाटके मराठी, हिंदी, कन्नड, तेलगु, पंजाबी, इंग्लिश या भाषांत अनुवादित झालेली आहेत. देशात कोकणी नाटक तियात्राप्रमाणे शतकमहोत्सवी ठरलेले आहे. तरीसुद्धा अजूनही बर्‍याच गोष्टी व्हायच्या आहेत.
नाटक हा बहुजनांचा कलाप्रकार आहे. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. गोव्याची सीमा पार करून कोकणी नाटक बेळगाव, आजरा, गडहिंग्लज या घाटमाथ्यावर पोहोचण्याची गरज आहे. मालवण, सिंधुदुर्ग या भागातील कोकणी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. जास्तीत जास्त कोकणीभाषीक लोक कर्नाटकात आहेत. दक्षिण कर्नाटक तसेच उत्तर कर्नाटकातील कारवार हा कोकणी प्रेक्षकांचा प्रदेश आहे. त्याचबरोबर दिल्ली, मुंबई, पुणे, हैद्राबाद इथेही कोकणी माणसे आहेत. या भागात कमी-जास्त प्रमाणात कोकणी नाटक पोचण्याची गरज आहे. कोकणी नाटक आज कला अकादमीची राज्यस्तरावर होणारी नाट्यस्पर्धा, कोकणी नाट्यमहोत्सव, गावातील उत्सवापुरती मर्यादित आहे. बंदिस्त थिएटरमध्ये नाटकाचा आस्वाद घेणारा एक प्रेक्षकवर्ग गोव्यात आहे. त्यासाठी दर्जात्मक कोकणी नाटकांचे प्रयोग होण्याची गरज आहे. पणजी, मडगाव, वास्को, कुडचडे, फोंडा, साखळी येथे नाट्यगृहे आहेत. पण तिथे कोकणी नाटकांचे प्रयोग सादर झाल्यास ते फायद्याचे ठरतील, याचे गणित कोकणी नाटकांच्या निर्मात्यांना ठरवावे लागेल. एकेकाळी गावातील उत्सव आणि फेस्ताच्या वेळी स्थानिक कलाकारांकडून नाटके व तियात्रे सादर होत होती. त्या जागी आता निम्नव्यावसायिक अथवा व्यावसायिक नाटक-तियात्रांचे गट पोचले आहेत. पण हा उत्सवी रंगमंच परत फुलून येण्याची गरज आहे. गावातील लोक नाटक सादर करत होते तोच प्रकार आता परत सुरू व्हायला हवा. कोकणी संस्कृतीचा तो एक भाग आहे. तियात्र अकादमीने गावातील तियात्राचे जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. कोकणी नाटकासंदर्भात असेच व्हायला हवे. कोकणी नाटक आशयाने श्रीमंत आहे; पण विषयाची मर्यादा आहे. गोव्यातील नाटक सामाजिक विषयापुरतेच मर्यादित राहिलेले आहे. कोकणीत ऐतिहासिक नाटक अद्याप होऊ शकलेले नाही. आमच्याकडे पुराणे आहेत. रामायण, महाभारत आहे. या सगळ्या आमच्या देवदेवतांच्या-पूर्वजांच्या कथा आहेत. नवीन आधुनिक तंत्राचा वापर करून त्या रंगमंचावर आणाव्या लागतील. त्यासाठी एक भाषाशैली तयार करावी लागेल. कोकणी पौराणिक नाटकांचा कालखंड गोव्यात नसला तरीही तो मुंबईत येऊन गेलेला आहे. नवीन काळाने आणि तंत्रज्ञानाने काही आव्हाने उभी केलेली आहेत. त्यांना व्यवस्थितपणे सामोरे गेलो नाही तर नाट्यकला नाहीशी होण्याची भीती आहे. ज्या गोष्टी टी. व्ही. आणि चित्रपटात पहायला मिळत नाही आणि फक्त नाटकातच पहायला मिळतात, असे आशय, विषय व तंत्र विकसित करावे लागेल.
………….