कोकणपुत्राला सन्मान

0
18

जिथे भाऊबंदकी आणि जमिनीच्या कज्जे-खटल्यांमध्येच बहुतेकांचे आयुष्य जाते त्या कोकणचे एक सुपुत्र लवकरच या देशाच्या ४९ व्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्याशी नाळ असलेल्या आणि पुढे रायगड जिल्ह्यात स्थायिक झालेल्या लळीत कुटुंबातील न्या. उदय लळीत यांच्या नावाची शिफारस निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून सरन्यायाधीशपदासाठी कायदा मंत्रालयाला केली आहे. पंतप्रधानांची त्यावर मोहोर उठल्यानंतर हे नाव राष्ट्रपतींकडे नियुक्तीसाठी पाठविले जाईल. २६ ऑगस्टला न्या. रमणा निवृत्त होत आहेत.
देशाच्या सरन्यायाधीशपदावर अवघीच मराठी माणसे आजवर विराजमान झालेली आहेत. साठच्या दशकात न्या. प्रल्हाद गजेंद्रगडकर सरन्यायाधीश होेते. त्यानंतर सोळावे सरन्यायाधीश म्हणून न्या. यशवंत वि. चंद्रचूड यांनी सर्वाधिक काळ काम पाहिले होते. अलीकडेच रमणा यांच्या आधी न्या. शरद बोबडे यांना सरन्यायाधीशपदी विराजमान होण्याचा सन्मान मिळाला होता. आता लळीत यांच्यासारख्या कोकणच्या सुपुत्राची या पदावर झालेली निवड निश्‍चितच आपल्यासाठीही अभिमानाची बाब आहे.
लळीत घराणी व्यवसायपरत्वे आज मुंबई, बडोदे, इंदूर अशी दूरदूर स्थायिक जरी झालेली असली, तरी त्या सर्वांचे मूळ सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील विजयदुर्गजवळच्या गिर्ये येथील आहे. नंतर उदरनिर्वाहासाठी लळीत घराण्यातील मंडळी दूरदूरवर गेली, तरी त्यांचा कुळाचार एकच आहे. गोत्र कौशिक व कुलदैवत श्रीलक्ष्मीनृसिंह हेच आहे. न्या. उदय लळीत यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील, सर्वोच्च न्यायालयाचे वकील, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून आजवर न्यायप्रक्रियेमध्ये मोठे योगदान दिले आहे. टू जी स्पेक्ट्रमसारख्या महत्त्वाच्या खटल्यांमध्ये कधी सरकारी वकील म्हणून, कधी एमिकस क्युरी किंवा मध्यस्थ निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले होते असे दिसते.
न्यायाधीशपदावर असताना तिहेरी तलाकाच्या खटल्यात जेव्हा न्यायमूर्तींमध्ये निवाड्याबाबत सहमती झाली नाही व तीन – दोन असा निकाल आला तेव्हा त्यात तिहेरी तलाक घटनाबाह्य आहे हे न्या. लळीत यांनी ठामपणे सांगितले होते. बालकांच्या गुप्तांगांना स्पर्श करणे म्हणजे देखील त्यांचा लैंगिक छळ ठरतो असा महत्त्वपूर्ण निकाल त्यांनी ‘पोस्को’ कायद्याच्या संदर्भात दिला होता. अत्यंत मृदुभाषी असलेले न्या. उदय लळीत प्रसंगी कसे वज्रादपि कठोर बनतात हेच यातून दिसून आले आहे. अशी व्यक्ती देशाच्या सरन्यायाधीशपदावर विराजमान होणार आहे.
त्यांच्या घराण्यात पिढीजात विधिक्षेत्राची परंपरा आहे. त्यांचे आजोबा वकील होते, वडील वकील होते जे पुढे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आणि तिसर्‍या पिढीचे प्रतिनिधित्व करीत न्या. उदय लळीत न्यायदेवतेच्या सेवेचा वारसा चालवीत आहेत. पिढीजात विधिज्ञांची अशी मोठी परंपरा आपल्या देशात आहे. काका – पुतणे, पिता – पुत्र देशाचे सरन्यायाधीश बनल्याचीही उदाहरणे आहेत. न्या. लळीत यांच्यानंतर ज्यांचे नाव सरन्यायाधीशपदासाठी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून क्रमवारीत आहे ते न्या. डी. वाय. चंद्रचूड हे तर, सर्वाधिक काळ ते पद भूषविण्याचा बहुमान मिळालेले सोळावे सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांचे सुपुत्र आहेत. हिंदू, मुसलमान, शीख, पारशी अशा वेगवेगळ्या धर्मांच्या, जातींच्या व्यक्तींनी आजवर हे सर्वोच्च पद भूषवून आपल्या न्यायिक प्रक्रियेची ध्वजा फडकती ठेवली आहे. न्या. लळीत हे आपल्याला मिळणार असलेल्या सरन्यायाधीशपदाच्या कार्यकाळात ह्या परंपरेमध्ये कोणतीही कसूर ठेवणार नाहीत याची खात्री वाटते.
खरे तर लळीत यांना तसे या पदावर अल्पकाळच राहता येणार आहे, कारण त्यांचीही निवृत्ती या वर्षीच नोव्हेंबरमध्ये होणार आहे. मग प्रथेनुसार आपला उत्तराधिकारी घोषित करून त्यांना निवृत्त व्हावे लागेल. पण असे म्हणतात ना की ‘तुम्ही किती जगलात हे महत्त्वाचे नसते, तर कसे जगलात हे अधिक महत्त्वाचे ठरते’, याच उक्तीनुसार देशाच्या सरन्यायाधीशपदावर तुम्ही किती काळ राहिलात यापेक्षा त्या पदाचा सन्मान किती वाढवलात यावर तुमची आठवण देश ठेवणार आहे. लष्करप्रमुखांना जसा अल्प काळ मिळतो, तशाच प्रकारे निवृत्तीच्या उंबरठ्यावरील सरन्यायाधीशपदावरील व्यक्तींनाही जरी कमी काळ मिळत असला तरीही या खंडमय विशाल, वैविध्यपूर्ण देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदावर विराजमान होण्याचा सन्मान मिळणे ही सुद्धा काही साधीसुधी गोष्ट नव्हे. कोकणच्या या सुपुत्राचे या सन्मानाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!