कोंडीचा कोंडमारा

0
91

सोमवारी दिवसभर पर्वरी व पणजीदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर झालेली वाहतुकीची प्रचंड कोंडी हा गोव्यासाठी धोक्याचा इशारा आहे. राज्यातील वाहनांची वाढती संख्या आणि स्वतःच्या वाहनाने राज्यात येणार्‍या पर्यटकांची वाढती संख्या यामुळे गोव्याचे रस्ते दिवसेंदिवस अपुरे पडत चालले आहेत हे तर दिसते आहेच, परंतु त्याचबरोबर वाहतूक नियोजनाचा अभाव, वाहतूक नियंत्रणातील बेपर्वाई आणि वाहतुकीतील बेशिस्त या तीन गोष्टींमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. ज्या तर्‍हेने सकाळ – संध्याकाळ पर्वरी ते पणजी दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प होत आहे, त्याला केवळ मांडवीवरील नव्या तिसर्‍या पुलाचे बांधकाम एवढेच कारण नाही. एकूणच आपल्या वाहतूक व्यवस्थेतील बेशिस्त त्याला अधिक जबाबदार आहे. मुळात आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुचकामी ठरलेली आहे, त्यामुळे रोज स्वतःच्या वाहनांनी प्रवास करणे नागरिकांना भाग पडत आहे. ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुलभ व गतिमान असती, तर प्रवाशांनी नक्कीच स्वतःच्या वाहनाच्या पेट्रोलवर अधिक पैसे खर्च करण्याऐवजी या सेवेचा आधार घेतला असता, परंतु असे घडताना दिसत नाही, कारण मुळात आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बेभरवशाची आहे. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी नागरिक स्वतःच्या वाहनाने जाणे पसंत करतात, त्यासाठी प्रवासाची दगदग सोसतात, कोंडी सोसतात, परंतु बसप्रवासापेक्षा त्यांना स्वतःच्या वाहनाने जाणे सोईस्कर वाटते. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची दाटी होते. शिवाय उत्तर गोव्यातून दक्षिण गोव्यात जायचे असेल तर पणजीमार्गे जावे लागत असल्याने सर्व दिशांनी वाहने पणजीच्या दिशेने झेपावत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड ताण जाणवतो आहे. मांडवीवरील तिसरा पूल किंवा जुवारीवरील नवा पूल हा विरोधकांनी टीकेचा विषय बनवला असला तरी ती गोव्याची आत्यंतिक गरज आहे. मांडवीवर दोन पूल असताना तिसरा पूल का असा प्रश्न विचारणे मूर्खपणाचे निदर्शक आहे. हा तिसरा पूल जेव्हा होईल तेव्हा त्याचे महत्त्व कळेल. मध्यंतरी गोव्यातील रस्ता वाहतुकीवरील ताण दूर करण्यासाठी स्वप्नवत वाटाव्यात अशा काही कल्पनांचे सूतोवाच वाहतूकमंत्र्यांनी विधानसभेत केले होते. सरकार रस्ता वाहतुकीला पर्याय शोधत असून मडगाव – फोंडा, थिवी – वाळपई, सावर्डे – फोंडा असे रेलमार्ग उभारण्याचा आणि पणजीहून वास्को, कुडचडे, शिरोडा, हळदोणे अशी जलवाहतूक सुरू करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला होता. हे सगळे त्यांचे दिवास्वप्न आहे हे तेव्हाच कळून चुकले होते. अशाच प्रकारची म्हापसा – पणजी दरम्यान मोनोरेलची कल्पना एका माजी मुख्यमंत्र्याने मांडली होती. परंतु ही मोनोरेल कागदावरही पुढे सरकली नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या हवेतल्या बाता करण्यापेक्षा आपल्या वस्तुस्थितीचा विचार करून उपलब्ध साधनांच्या द्वारे काय करता येईल यावर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. ज्या प्रकारची वाहतूक कोंडी गोव्याच्या रस्त्यांवर आज दिसते आहे, तिचे स्वरूप येत्या वर्षअखेर भयावह झालेले दिसेल. शहरी गोव्याचे जनजीवन कोंडीमुळे कोलमडणे आता नित्याचे बनले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने गांभीर्याने आणि तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. पणजीतील वाहतूक कोंडीवर एकेरी मार्गांचा तोडगा काढून काही मार्गांवरील कोंडी वाहतूक अधिकार्‍यांनी दूर केली. केवळ वरवरचे उपाय करण्यात आपण समाधान मानत आलो आहोत हे बदलायला हवे. पर्यायांचा विचार सरकारने तातडीने करायला हवा. ते करणे दूरच, उलट या कोंडीत भर घालणारे मॉल जेव्हा भररस्त्यात उभे राहतात, तेव्हा आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत असा प्रश्न जनतेला पडल्याविना राहात नाही!