मुखदुर्गंधी ः दैनंदिन समस्या

0
1137

 

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

आयुर्वेदाप्रमाणे मुखदुर्गंधीचा जास्तच त्रास असल्यास शोधनोपचारामध्ये वमन द्यावे व तीक्ष्ण धूमपान द्यावे. त्याचप्रमाणे नस्याचाही उपयोग होतो. तत्पश्‍चात् लाजाळू, धायटीची फुले, लोध्र, पद्मकाष्ठ यांच्या काढ्याने तोंड धुवावे.

६० ते ७० टक्के लोक मुखदुर्गंधीने त्रस्त असतात. बर्‍याच वेळा बोलताना स्वतःलाच जाणवते व काही वेळा मुखदुर्गंधी दुसर्‍यांनाही जाणवते. समोरची व्यक्ती कधीच हे स्पष्टपणे सांगत नाही. पण स्वतःला मात्र जाणवलं की ओशाळल्याप्रमाणे होते. मग काहीजण तोंडात सुवासिक सुपारी टाकतात, काही बडीशेप, काही तोंडात पाणी घेऊन चूळ भरतात तर काही ब्रश करतात. ९० टक्के लोकांना मुखदुर्गंधी ही दातांशी निगडित असते असेच वाटते व ते कधीही यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधत नाही. मुखदुर्गंधीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे कधी कोणाला वाटत नाही. पण मित्रांनो, मुखदुर्गंधी ही फक्त दातांच्या अस्वच्छतेने येत नसते तर या आजाराची अजूनही काही कारणे असतात, जी आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जाणून दूर करू शकतो व सगळ्यांबरोबर हसत मुखाने दिलखुलास गप्पा मारू शकतो.
श्‍वासाची व तोंडाची दुर्गंधी येण्याची कारणे –
१. दात किडणे ः दात किडलेले असतील किंवा हिरड्यांतून ‘पू’ येत असेल तर मुखदुर्गंधीचा त्रास होतो.
२. हिरड्यांची समस्या ः हिरड्यांच्या समस्येमुळे मुखदुर्गंधीचा त्रास जाणवतो. अन्न बेचव लागते व श्‍वासाला दुर्गंधी येते. विषाणूंमधून स्रवणार्‍या प्लेक नावाच्या स्रावामुळे ही समस्या उद्भवते. तुमच्या दातांवर विषाणूंचा व या प्लेकचा थर जमतो. यामुळे हिरड्या कमकुवत हिरड्यांमुळे दातांचा आधार ढिला होतो व दात पडतात.
३. पोटातील बिघाड ः कधी कधी पोट बिघडल्यामुळेही मुखदुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. श्‍वासोच्छ्वास करताना येणारा वास हा तोंडाशी संबंधित असतो. पोटातील बिघाडामुळे मलप्रवृत्ती साफ होत नाही. त्यामुळे सतत येणार्‍या करपट ढेकरांमुळेही तोंडाला दुर्गंधी येते.
४. सायनस ः नाकाद्वारे श्‍वासोच्छ्वास करता न आल्याने सायनसग्रस्त व्यक्ती तोंडाद्वारे श्‍वासोच्छ्वास करतात. त्यामुळे तोंड सुकते आणि जंतूंची वाढ होते. तसेच सायनसमुळे नाकातून स्रवणारा द्रव गळ्यात उतरतो. त्यामुळेही श्‍वासाला दुर्गंधी येते.
५. तोंड सुकणे किंवा कोरडे पडणे ः तोंडातील लाळेमुळे तोंडातील आर्द्रता टिकून राहते व तोंड स्वच्छ राहते. पण कित्येक वेळा पाणी नीट न प्यायल्याने, उपवास करण्याने तोंडातील लाळेचे प्रमाण कमी होते व तोंड सुकते. या समस्येमुळे जीभ, हिरड्या आणि गालाच्या खालील भागामध्ये मृत पेशी जमा होतात. या पेशीमुळे मुखदुर्गंधी जाणवते.
६. तोंड येणे ः तोंडात व जिभेवर होणार्‍या जखमेतून पू बाहेर पडू लागल्याने मुखदुर्गंधीचा त्रास जाणवतो.
७. श्‍वासोच्छ्वासातील संक्रमण ः गळ्यातील ग्रंथीमध्ये सूज येणे, ताप, बंद नाक, नाकातून हिरवा किंवा पिवळ्या रंगाचा श्‍लेष्म वाहणे, खोकल्यातून बेडका पडणे यामुळेदेखील श्‍वासाला दुर्गंधी येऊ शकते.
८. फुफ्फुसातील संक्रमण ः फुफ्फुसामध्ये गंभीर स्वरूपाचे संक्रमण झाले असल्यास श्‍वासाला दुर्गंधी येऊ शकते. तंबाखू सेवन करणार्‍या रुग्णामध्ये जेव्हा कँसरसारखा आजार पसरतो तेव्हा मुखदुर्गंधी येऊ लागते.
९. पचनसंस्थेतील बिघाड ः आज फास्ट फूडच्या काळात छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पचनक्रियेत होणार्‍या बिघाडाचा सामना करावा लागत आहे. विरुद्ध आहाराबरोबर रात्री जागरण यांसारख्या कारणांनी खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही व परिणामी आतड्यांमध्ये अन्न तसेच पडून राहून अन्न खराब होते व तोंडाला दुर्गंधी यायला लागते.
१०. पोटात गॅस धरल्यानेही श्‍वासाला दुर्गंधी येऊ शकते.

मुखदुर्गंधी टाळण्याचे उपाय –
* भरपूर पाणी प्या ः भरपूर पाणी प्यायल्याने तोंड स्वच्छ राहते. पाण्यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कणही निघून जातात. सकाळी उठल्याबरोबर विशेष करून जास्त पाणी प्यावे. तसेच उपवास असल्यास किंवा प्रवासामध्येही जास्त पाणी प्यावे. शक्यतो तोंड सुकायला देऊ नये.
* दातांची स्वच्छता ः किमान दिवसातून दोन वेळा आपले दात स्वच्छ करा. जिभेच्या स्वच्छतेसाठी टंग क्लीनरचा वापर करा.
* चूळ भरण्याची सवय लावा ः आजकाल हॉटेल्समध्ये बाऊल सिस्टीम चालते. यात हात वाटीमध्ये धुवून, ओठांना जरासं पाणी लावलं जातं. हॉटेल कितीही तारांकित असू द्या. शक्यतो चूळ भरूनच तोंड धुवा नाहीतर खाल्लेले अन्नकण दातांमध्ये अडकून मुखदुर्गंधी उत्पन्न करतात. तसेच कच्चा कांदा, लसूण यांच्या सेवनाने मुखदुर्गंधी अधिकच वाढते. म्हणून जेवल्यानंतर भरपूर पाण्याने चूळ भरून तोंड साफ करावे.
* वेळोवेळी दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ः मुखदुर्गंधीचा त्रास असल्यास दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुखदुर्गंधी ही केवळ दातांमुळेच आहे काय? की त्याला अजून वेगळेच कारण आहे काय ते तपासणे गरजेचे आहे. दात किडलेले असल्यास योग्य ते उपचार करून कीड साफ करून दात भरून घ्यावेत. कारण किडलेल्या दातांमध्ये अन्नकण साठण्याचे प्रमाण जास्त असते.
* दातांच्या समस्येमुळे जर मुखदुर्गंधी येत असेल फक्त गुळण्या करून तोंडातील वास वरवरपणे कमी होऊ शकेल पण दातांच्या मूळ समस्येची चिकित्सा होणार नाही.
* सकस आहाराचे सेवन ः कच्चा कांदा, लसूण यांसारखे ऍसिडिक पदार्थ तसेच जास्त गोड पदार्थांच्या सेवनाने मुखदुर्गंधी, श्‍वासदुर्गंधी येते. ऍसिडिक व गोड पदार्थ तोंडात जास्त बॅक्टेरिया उत्पन्न होण्यास मदत करतात. म्हणून ऍसिडिक व गोंड पदार्थ खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुवावे. ज्या पदार्थांमुळे लाळेचे प्रमाण वाढते, अशा प्रकारचा आहार घ्यावा. साठीसाळी, जुने गहू, नाचणी, बाजरीसारखी किंवा तिळाचे घाण्यातून काढलेले तेल, शुद्ध साजूक तूप किंवा लोणी, मध, गूळ यांचा वापर करावा. वनस्पतीतुपाचा फाजील उपयोग, रिफाईन्ड तेलाचा वाढता वापर बंद करावा.
आहारीय पदार्थ चांगले दिसावे म्हणून अतिशुद्ध, स्वच्छ करणे किंवा त्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर करणे, ते टिकवून ठेवण्यासाठी शीतगृहे, फ्रीज व रसायनांचा वापर करणे यांचे सध्या मोठे फॅड आहे. घरात दळून तयार केलेली धान्यांची अथवा सालीच्या डिळींची पीठं आजकाल कोठेच दिसत नाही.
आहारातील या बदलामुळे आज अनेक प्रकारचे रोग वाढत्या प्रमाणात दृष्टीस पडत असून मुखदुर्गंधीही त्यांपैकीच एक होय.
तसेच मुखदुर्गंधीचा त्रास असलेल्या रुग्णांनी हिरव्या व पिवळ्या, केशरी अशा भाज्या व फळे खावीत. रासायनिक फवार्‍यांचा विचार लक्षात घेऊन स्वच्छ भरपूर पाण्याने धुवून वापरावी. फळांमध्ये आवळा, पेरू, लिंबू, संत्री, अननस, केळी व आंबा यांचा वापर करावा. भाज्यांमध्ये पालक, मेथी, मुळा, भेंडी, पडवळ, दोडका, दुधी यांसारख्या भाज्यांचा वापर करावा.
* चहा, कॉफी यांचे सर्रास सेवन जे आपल्या समाजात होत आहे त्याचा कुठेतरी अतिरेक आता टाळावा.
* तंबाखू सेवन, मद्यपान या व्यसनांपासून मुक्त व्हावे.
* ग्रीन-टी चा वापर करा. यामध्ये असणार्‍या प्रतिजैविक घटकांमुळे दुर्गंधीवर नियंत्रण ठेवता येते.
* धने ः धने हे एक उत्तम माऊथ फ्रेशनर आहे. दाताखाली धरून ठेवल्यास मुखदुर्गंधी कमी होते.
* तुळशीची पाने ः तुळशीची पाने चघळल्यानेही मुखदुर्गंधी दूर होते. त्याचबरोबर दातदुखी असल्यास त्यावरही तुळस गुणकारी आहे.
* लवंग ः लवंग दाताखाली घालून चघळल्याने मुखदुर्गंधी दूर होते. त्याचबरोबर दातदुखी असल्यास त्यावरही उपयोगी पडते.
* पेरूची कोवळी पाने ः पेरूची कोवळी पाने चावून खाल्ल्याने मुखदुर्गंधी तोंडातीव व्रणांमुळे असल्यास दूर होते व त्याचबरोबर व्रणही भरून येतात. जाईचे तेल आतून तोंडाला लावण्यानेही फायदा होतो.
* मोहरीचे तेल व मीठ ः दररोज दिवसातून एकदा मोहरीचं तेल व मीठ हिरड्यांवर चोळल्याने हिरड्या निरोगी राहतात व दुर्गंधी कमी होते.
* डाळींबाची साल ः डाळिंबाच्या साली पाण्यात टाकून पाणी उकळा. या पाण्याने गुळण्या केल्यास दुर्गंधी कमी होते.
* दररोज लिंबू पिळून गुळण्या केल्यानेही मुखदुर्गंधी दूर होते.
* जिरे गरम करून खाल्ल्यास मुखदुर्गंधी कमी होते.
* त्रिफला क्वाथ दिवसांतून दोन वेळा घेतल्यासही दुर्गंधी कमी होते.
* पोट साफ होत नसल्यास मृदू विरेचन घ्यावे. किंवा बस्ती गेऊन पोट साफ करावे. नंतर गरम पाण्यात मीठ व हळद मिसळून गुळण्या कराव्या.
* पचनक्रिया बिघडल्यामुळे मुखदुर्गंधीचा त्रास असल्यास जेवणानंतर बडीशेप, ओवा, ज्येष्ठमध, तीळ व सैंधव मीठ घालून तयार केलेले पाचक खावे.
तसेच आयुर्वेदाप्रमाणे मुखदुर्गंधीचा जास्तच त्रास असल्यास शोधनोपचारामध्ये वमन द्यावे व तीक्ष्ण धूमपान द्यावे. त्याचप्रमाणे नस्याचाही उपयोग होतो. तत्पश्‍चात् लाजाळू धायटीची फुले, लोध्र, पद्मकाष्ठ यांच्या काढ्याने तोंड धुवावे.
त्रिफळा, चित्रक, काडेचिराईत, जेष्ठमध, त्रिकटू, नागरमोथा, हळद, दारुहळद, यवक्षार, पिंपळ, जांभूळ, ओवा, अर्जुन यांची साल, खैराची साल या सर्व दाट काढा करून त्यात त्याच औषधांचे चूर्ण घालून गोळ्या कराव्या. त्या गोळ्या नेहमी तोंडात धरल्या असता मुखदुर्गंधी बरोबर अन्य कोणताही मुखरोग असल्यास बरा होतो.
मुखदुर्गंधी या विकाराकडे दुर्लक्ष करू नका. योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करा.