कॉलेज जीवनाचा मागोवा

0
218
  •  शरच्चंद्र देशप्रभू

गोवा बदलला, पणजी बदलली, अन् काळाच्या ओघात धेंपे कॉलेजपण बदलले. काळ निरंतरपणे वाहतो आहे. निर्लेपपणे सारे बदल पाहतो आहे. वाचनालयात पुस्तके देऊन परत येताना वाटले, या सार्‍याचा नव्या पिढीशी काहीच संबंध राहणार नाही. मागचे पुसले जाणार आहे. नवे अवतरणार आहे.

मागच्या आठवड्यात धेंपे कॉलेजमध्ये जाणे झाले. निमित्त होते या शिक्षणसंस्थेच्या वाचनालयाला मी लिहिलेली पुस्तके भेट देण्याचे. प्रिन्सिपॉलबाई काही कामासाठी बाहेर गेल्यामुळे त्यांच्या कॅबिनच्या बाहेर त्यांच्या सचिवाशी बातचित करण्याची संधी मिळाली. तिच्याकडून बरीच अद्ययावत माहिती मिळत होती. संस्थेने केलेली प्रगती खरोखरच डोळे विस्फारणारीच होती. परंतु का कोण जाणे, माझे मन भूतकाळात डोकावू लागले. स्वामी समर्थांनी मनाच्या केलेल्या ‘अचपळ’ अशा समर्पक वर्णनाची प्रचिती आली. कॉलेज जीवनातील व्यक्ती, घटना, प्रसंग, चित्रे स्मृतिपटलावर उमटू लागली.
१९६६च्या शैक्षणिक वर्षारंभी माझा कॉलेजप्रवेश झाला. संस्थेची नवी कोरी करकरीत दिमाखदार वास्तू आमचे स्वागत करण्यासाठी सज्ज. त्याच वर्षी संस्थेचे लायसियमवरून स्थलांतर झाले होते. कै. यशवंत लवंदे या संस्थेचे पहिले प्रिन्सिपॉल. यांचे व्यक्तिमत्त्वच रुबाबदार. छाप टाकणारे. विद्यार्थीच काय पण प्रोफेसर मंडळीपण यांना बिचकून असत. कारण यांचा दरारा व करडी शिस्त. प्रोफेसरमंडळींच्या बौद्धिक कुवतीप्रमाणेच त्यांच्या पेहरावावर हे विशेष लक्ष देत. परंतु या ज्ञानतपस्व्याचे अकालीच निधन झाले. यामुळे झालेल्या पोकळीची संस्थाचालकांना व विद्यार्थ्यांना सतत जाणीव होत असे. चार वर्षातील कॉलेज जीवनामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला, आकांक्षांचे बीज मनात पेरले अन् तत्त्वाशी तडजोड न करता कसा मार्ग काढावा याचे आपसुकच प्रशिक्षण मिळाले. या काळातील शिक्षकांच्या आठवणी अजून मनात ताज्या आहेत. कै. बखले, जे अलीकडे वारले, मिरामारच्या किनार्‍यावर त्यांचे दर्शन होत असे. त्यांच्या जाण्याने जीवनात एक पोकळी अनुभवली. परंतु आता त्यांना स्मरणारे कमीच. कारण कितीतरी त्यांचे विद्यार्थीपण काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या प्रोफेसरांची शिकविण्याची शैली संयत पण आकर्षक होती. वर्गाला खिळवून ठेवण्याची उपजत कला यांच्या शैलीत होती. ओठ मुडपून घनगंभीर आवाजात, टेबलाच्या कडेला चिकटून त्यांनी दिलेली भारतीय संविधानावरील व्याख्याने अप्रतिम. यांचा स्वभाव बाणेदार. याचमुळे कै. लवंदे यांच्यानंतर रुईया कॉलेजमधून आलेल्या प्रि. ओकशी यांचे पटले नाही. तत्त्वासाठी जगणार्‍या या प्रोफेसरनी तात्काळ राजिनामा दिला अन् म्हापशात नव्या कॉलेजमध्ये रुजू झाले. आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांची अपरिमित हानी झाली. परंतु पदव्युत्तर काळातील अभ्यासानिमित्त पुन्हा यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले. मिरामार किनार्‍यावरच्या भेटीत मी दिलेले पुस्तक वाचून कै. बखले गहिवरले. उच्चपदस्थ विद्यार्थ्याने उतारवयात लिहिलेल्या पुस्तकात आपली जाणीवपूर्वक नोंद केल्याचे अतीव समाधान त्यांच्या चेहर्‍यावर विलसले.

सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे यांनीपण आम्हाला अर्थशास्त्राचे धडे दिले. फिलिप नावाचे केरळातील व्याख्याते होते. परंतु यांचा आवाकाच कमी. शिवाय इंग्रजी बोलताना येणारे दक्षिण भारतीय उच्चार. परंतु यांनी कॉ. नारायण देसाईंचे भाषण आयोजित करून नीरस वातावरणात जान आणल्याचे स्मरते. प्रो. गोपाळराव मयेकर अन् कै. एस्. एस्. नाडकर्णी यांनी तर माझी साहित्यविषयक दृष्टी आरपार बदलून टाकली. इंग्रजी विषयासाठी जी. वाय. कामत, कै. साखरदांडे, खंवटे होते. प्रो. लुसियो रोड्रिगिज हे प्रख्यात शिक्षक अन् इंग्रजी भाषेचे गाढे व्यासंगी. पण कधीमधी लेक्चर्स घेत. परंतु त्यांची शैली मला तेवढी प्रभावी वाटली नाही. कदाचित आमचीपण मानसिक मर्यादा असेल. कै. जी. वाय. कामत हे आम्हाला आधुनिक इंग्रजी काव्य शिकवायचे. बुद्धीने तल्लख परंतु शिकविण्याची शैली कमालीची अनाकर्षक. प्रो. साखरदांडे शेक्सपियरची नाटके शिकवत. परंतु तेपण प्रभावी वाटले नाहीत. लक्षात राहिला त्यांच्या डोळ्यावरचा रिबन. परंतु त्यांचा इंग्रजी वाङ्‌मयाचा व्यासंग दांडगा असल्याचे बोलले जात असे. शिवाय प्रो. राव पण होते. मंगला केणी स्पष्ट होत्या. हिंदी विषय शिकवण्यासाठी तिवारी होते अन् मिश्रा. दोघे उत्तरभारतीय. हिन्दी भाषेवर प्रभुत्व. परंतु तिवारींनी उलगडलेली लक्ष्मणभार्या उर्मिलेची ठसठसणारी वेदना अजून स्मरते. तर्कशास्त्र म्हणजे लॉजिक हा विषय आमच्यासाठी मॅजिक. परंतु काही विद्यार्थ्यांच्या अंतिम परिक्षेत तो ट्रॅजिक ठरायचा. प्रो. मिश्रा अन् प्रो. इनामदार हे शिक्षक हा विषय समरसून शिकवत. क्लिष्ट असून सहजसोपा करत. यामुळेच या कठीण विषयात विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण होत. फ्रेंच विषयासाठी प्रो. होडारकर अन् सरदेसाई होत्या. होडारकर प्रभावी शिक्षणशैलीमुळे कॅथलिक विद्यार्थ्यांत लोकप्रिय होत्या. इतिहासासाठी प्रो. डिसूझा होते. परंतु यांची गैरहजेरीने मर्यादा ओलांडलेली. प्रिन्सिपॉलकडून यांना यास्तव तंबीपण मिळालेली. प्रो. मूर्तीचा इतिहास शिकवण्यात हातखंडा. दाक्षिणात्य ढंगात, खड्या आवाजात तपशिलासह दिलेली व्याख्याने स्मृतिपटलावरून पुसून जाणे अशक्य. कमालीची जरब असलेल्या यांच्या व्यक्तिमत्त्वाला भक्कम व्यासंगाची जोड होती. यास्तव प्रो. मूर्तींची व्याख्याने म्हणजे ज्ञानार्जनाचा अखंड वाहणारा धबधबाच. काही का असेना, त्या काळी शिक्षकांविषयी मनात आदर निर्माण व्हायचा. यामुळे जवळीक कमी अन् शंकानिरसनपण कमीच. आता शिक्षक अन् विद्यार्थी यांच्यात बर्लीनची भिंत नाही. सारेकाही खेळीमेळीच्या वातावरणात. एकूण शिक्षणशैलीत पण कमालीचा बदल झालेला आहे.

धेंपे कॉलेजात बसल्या बसल्या त्यावेळचे सवंगडी आठवले. अजित मोये जो नंतर प्रख्यात क्रीडा समीक्षक झाला. कविमनाचा जानू बोरकर जो अकालीच वारला. विनायक नाईक ज्याने नंतर माझ्यासमवेत रोजगार खात्यात काम केले. पूर्ण सहकार्य केले. अरुण तळावलीकर जो एक चांगला क्रिकेटपटू, नंतर सरकारी कामगार संघटनेचा नेता. कै. पुरुषोत्तम सिंगबाळ म्हणजे बहुश्रुत व्यक्तिमत्त्व. याचे अभ्यासात लक्ष नसले तरी हाडाचा कलावंत. खेळ, संगीत, नाटक, चित्रकला सार्‍या क्षेत्रात मुक्त संचार. आकाशवाणीवर कार्यरत असलेल्या या अफलातून माणसाला शेवटी शेवटी आध्यात्माची गोडी लागली. जीद्दू कृष्णमूर्तीच्या तत्त्वज्ञानाकडेपण हा आकर्षित झाला. आकाशवाणीवर ‘फोडणी फोव’ अजरामर करणारा हा अवलिया नंतर परागंदाच झाला. त्या काळी कॉलेजात शिकत असलेल्या विद्यार्थिनी म्हणजे माया आगशीकर, सुमित्रा घाणेकर, वासंती नायक, संध्या कल्याणपूर, लता भांडारी, उषा घाणेकर, शिरोडकर, रतन काकोडकर या सार्‍या नंतर आपापल्या व्यवसायात, नोकरीत रममाण झाल्या. त्याकाळी विद्यार्थी- विद्यार्थिनींमध्ये तसे मोकळे वातावरण नव्हते. वासंती स्टेट बँकेत नोकरीला होती. रतन काकोडकर मुरगाव पोर्ट ट्रस्टमध्ये मोठ्या पोस्टवर होती. माया आगशीकर (खांडेपारकर) तर आमच्या कॉलनीतच राहते. त्यातल्या त्यात लक्ष्मण पित्रे अजून साहित्यिक कार्यक्रमात भेटतात. शीला नायक, सुप्रसिद्ध कोकणी साहित्यिक दोन वर्षांनी सिनियर अन् पणजीत असताना शेजारी परंतु ओळख अशी झालीच नाही. संवेदनशील मन असले म्हणजे कुठलीही सामान्य व्यक्ती, वस्तू किंवा घटनांना फार मोठी उंची लाभते. शून्यातून ब्रह्म निर्माण होते. निराकाराला आकार मिळतो.

त्याकाळी धेंपे कॉलेजचे वाचनालय तिसर्‍या मजल्यावर. फडनवीस नावाचे ग्रंथपाल. त्यांच्या हाताखाली बुर्यो अन भट. वाचनालय ऐसपैस. पुस्तकाची कपाटे कमी अन् बसायची जागा मोठी. यामुळे स्वस्थ चित्ताने अभ्यास करता येत असे. आता संस्थेच्या इमारतीचे विस्तारीकरण झाले. परंतु तरीही जागा पुरत नाही. प्रवेशद्वारावरच्या प्रशस्त हॉलमध्ये जेथे आम्ही टेबल टेनिस खेळत होतो तिथे पार्टीशन्स आली. आर्थर सिक्वेरा, राजू वालावलीकर, डॉ. मिस्किता जिथे टेबल टेनिस खेळले ती जागा क्लासरूम्स अन् प्रयोगशाळानी व्यापल्याचे दिसत आहे. बाहेरचा परिसरपण बांधकामामुळे आक्रसलेला वाटतो. कॉलेजच्या समोरचा रस्ता रुंद होता. कारण संस्थेची गॅस्परडियस क्लबची कुंपणे नव्हती, ओळीने दुतर्फा झालेल्या इमारती नव्हत्या. दोन्ही होस्टेल्स मोकळ्या वातावरणात श्‍वास घेत होती. याच रस्त्यावर राजभवनावर जाताना भूतपूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी उत्स्फूर्तपणे थांबल्या होत्या अन् विद्यार्थी-विद्यार्थिनींत मिसळल्या होत्या. याच रस्त्यावर आम्हाला सोडण्यासाठी – नेण्यासाठी पणजी मडगाव ट्रान्सपोर्ट सोसायटीच्या बसेस थांबत. कोणत्याच पार्किंगच्या समस्या नव्हत्या. कॉलेजच्या मागचा परिसर पण ऐसपैस. इथे वार्षिक स्नेहसंमेलने भरत. राजेंद्र पै, सतीश बोडके म्हणजे हुबेहूब किशोर कुमारचा आवाज. प्रो. दिवाकर शिंदे यांनी प्रशिक्षित केलेले विद्यार्थी-विद्यार्थीनी एकांकिका सादर करत. अविनाश माशेलकरांची अन् माया गवंडळकरांची, रत्नाकर मतकरींच्या ‘रणमर्द’मधील जुगलबंदी आठवते. फिश पॉड पडल्यावर प्रोफेसर मंडळींचे अन् सहकार्‍यांचे पडलेले चेहरे आठवतात. कै. वैकुंठराव धेंपे यांनी मुख्य पाहुणे या नात्याने केलेले भाषण आठवते. त्यात वापरलेला ‘अश्रार चरींशी’(अल्मा मातेर) हा शब्द आठवतो. त्यावेळी या शब्दाचा अर्थ कळला नव्हता. गोवा बदलला, पणजी बदलली, अन् काळाच्या ओघात धेंपे कॉलेजपण बदलले. काळ निरंतरपणे वाहतो आहे. निर्लेपपणे सारे बदल पाहतो आहे.

वाचनालयात पुस्तके देऊन परत येताना वाटले, या सार्‍याचा नव्या पिढीशी काहीच संबंध राहणार नाही. मागचे पुसले जाणार आहे. नवे अवतरणार आहे. या कालचक्रात मनुष्याचे जीवनमान सुधारण्यात शाश्‍वत मूल्यांचा सहभाग असेल का अविक्षेप. कारण आजच्या अस्तित्वाच्या लढाईत मूल्यांची संकल्पना सापेक्षच राहील अशीच चिन्हे दिसतात.