‘कॉलेजविश्व’

0
60

प्रियंवदा सिद्धार्थ मिरींगकर (१२वी, जी.व्ही.एम्स हायर सेकंडरी स्कूल, फर्मागुडी)

शाळा-कॉलेज म्हणजे शिकण्यासोबत मस्तीचे दिवस. कॉलेजला जाऊन करता येणारी मजा-मस्ती ही बाकी कुठेही गेलात तरीही नाही करता येणार आणि अशी आनंदाने पुरेपूर भरलेली वर्षं घरी बसून काढावी लागतील अशी कल्पनाही करवली नसती, जर कोरोनाची महामारी फैलावली नसती तर…
आधी आम्ही दिनदर्शिकेत सुट्या शोधायचो आणि आता त्यातच शाळा शोधतोय. आता कळते आहे शाळेची किंमत! ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींपेक्षा गुगल जास्त जवळचं झालंय. ज्या आई-वडिलांकडे मुलं मोबाईल मागून थकली, त्याच आईवडिलांना स्वतः मुलांना मोबाईल आणून द्यावे लागले. परिक्षांना अर्थच राहिला नाही. लिहायची सवय कमी झाली. चष्म्यांचे नंबर मात्र वाढले. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे निदान शिक्षकांचा आवाज तरी ऐकू आला, नाहीतर शिक्षणाला केव्हाच तिलांजली मिळाली असती. पण म्हणतात ना, ‘‘नाण्याच्या दोन बाजू असतात.’’ अनेकांना आपले जीवलग गमवावे लागले, ह्याचं दुःख तर आहेच. पण, ह्याच काळात प्रत्येक माणसातल्या माणुसकीचं दर्शन झालं. अगदीच आमच्या अभ्यासाच्या बाबतीतसुद्धा. सुरवातीला कोणीही कोणाला ओळखत नव्हतं. ना बोलून, ना पाहून. पण तरीही, ऑनलाईन का असेना प्रत्येकाने एकमेकांना मदत केली. ऑनलाईनच पण नवीन मित्र-मैत्रिणी जोडले गेले. शाळा-कॉलेजमधे जाण्याची वेळ वाचली. परीक्षा ऑनलाईन होत्या, त्यामुळे तिथेच खरं तर मुलांच्या प्रामाणिकपणाची कसोटी होती. ह्या कोरोनामुळे आपण खूप काही गमावलंय तसंच कमावलंय सुद्धा. इंग्रजीत एक म्हण आहे ना- ‘चुज टू लुक ऑन द ब्रायटर साइड’. आपण हेच तंत्र वापरलं तर ही लढाई लढणं सोपं होईल.
………………………………..

वर्धा विलास हरमलकर (बी.ए.बी.एड. ३रे वर्ष, विद्या प्रबोधिनी कॉलेज, पर्वरी)

कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपण आधी स्वतःची काळजी घेतली पाहिजे.
खोकताना किंवा शिंकताना रूमालाचा किंवा टिश्यू पेपरचा वापर केला पाहिजे. शिंकेतून किंवा खोकल्यातून विषाणू पसरून त्याची इतर कुणाला लागण होऊ नये यासाठी दोन व्यक्तींमध्ये किमान २ मीटर अंतर आम्ही ठेवले पाहिजे. तसेच डोळ्याला, नाकाला आणि तोंडाला स्पर्श करणं टाळलं पाहिजे. दररोज आपण मास्क लावून नाक आणि पूर्ण तोंड झाकलं पाहिजे. आपले हात बर्‍याच पृष्ठभागांना स्पर्श करत असतात. त्यातून हाताला विषाणू चिकटू शकतात. अशा हातांनी डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श केल्यास हाताला चिकटलेले विषाणू आमच्या शरीरात जातात. त्यासाठी आपण दररोज सॅनिटायझरने किंवा साबणाने तरी हात धुवायला पाहिजे आणि कुठेही जाताना न चुकता आपले हात सॅनिटायझरने स्वच्छ केले पाहिजे. त्यासाठी सॅनिटायझर नियमित आपल्या सोबत ठेवणं गरजेचं आहे.
तसेच बाहेर जाऊन आल्यावर आधी आपण आंघोळ केली पाहिजे. जर तुम्हाला खोकला, बंद नाक, डोकेदुखी यांसारखी लक्षणें दिसू लागली तर सर्वांत आधी आपण डॉक्टरकडे जायला हवं. नाहीतर घरगुती औषधे घ्यायला हवी. जसे- काढा, हळदीचं दूध वगैरे. त्याचप्रमाणे विनाकारण आपण घराबाहेर जाऊ नये व प्रत्यक्ष भेटलो तरी एकमेकांना हात देऊ नये किंवा मिठी मारू नये. तसेच दररोज व्यायाम करून, भरपूर पाणी पिऊन व जेवण करून आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
वरील गोष्टी प्रामाणिकपणे केल्या तर कोरोनापासून स्वतःचा बचाव करू शकतो.
………………………….

पूर्णिमा पाटील (वर्ष ३रे, विद्या प्रबोधिनी वाणिज्य, शिक्षण संगणक व व्यवस्थापन महा. पर्वरी)

‘‘अग आई सात वाजले. माझे दप्तर कोठे आहे? मला काहीच सापडत नाही. बस निघून जाईल, लवकर आवर ना गं आई…’’ असे संवाद मार्च२०२०पासून ऐकू येणे बंद झाले आहे. कोरोनामुळे शाळेला सुट्‌ट्या लागल्या, तेव्हा काही जणांना आनंद झाला तर काही जणांना शिक्षणाची काळजी वाटायला लागली. ऑनलाइन शिक्षण हे माध्यम सुरू झाले. ऑनलाइन शिक्षण सुरुवातीला चांगलं वाटायचं, नंतर मात्र कंटाळा यायला लागला. पूर्वी शाळेत, कॉलेजात जायची घाई असायची पण आता ती चिंताच नाही, त्यामुळे आळस वाढला आहे. शिवाय कधी कधी मोबाईलची रेंज नसते त्यामुळे अभ्यासाची आवड निर्माण होत नाही. जे गरीब आहे, ज्यांना मोबाईल विकत घेणे शक्य नाही, त्यांना शिक्षण घेणे खूप कठीण आहे. काही भागात नेटवर्क नसते, त्या मुलांना शिक्षण घेणे अशक्य होत आहे. तसेच तासन्‌तास मोबाईल वापरल्याने डोळ्यांचे विकार, मन एकाग्र न होणे तसेच पाठदुखी हे आजार आढळून आले.
एक मात्र खरे की संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये होते पण ऑनलाइन का होईना आपल्याला शिक्षण घेता आले, तेही निवान्त घरी बसून. ऑनलाइन शिक्षणामुळे आपल्या संगणकाबद्दलच्या ज्ञानात भर पडली. आपले शिक्षणकौशल्य विकसीत होऊ लागले. जास्त इंटरनेट वापरामुळे आपल्याला जगभरातील सर्व गोष्टी समजू लागल्या. ऑनलाइन शिक्षण सुरळीत चालवणे मात्र शिक्षकांमुळे शक्य झाले. आम्हाला योग्य पद्धतीने शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. एकंदर काय तर ऑनलाइन शिक्षणामुळे आपण एकमेकांना भेटणे, गप्पा गोष्टी करणे, कॉलेज, मित्र मैत्रिणी, मजा हे सर्व गमावले आहे. मुख्य म्हणजे आपल्या घरातील तसेच इतर लोकांचे कामधंदे बंद झाले. हा आमूलाग्र असा बदल कोरोना महामारीने आपल्या जीवनात घडवून आणला आहे.
………………………………

अक्षता अशोक माईणकर (बी.ए.बी.एड.- वर्ष ३रे
विद्या प्रबोधिनी महाविद्यालय, पर्वरी)

जीवन खुशाल पद्धतीने चाललेले होते. अचानक २०२०मध्ये आपण एका नवीन चीन मधून आलेल्या रोगाशी आपली भेट झाली. ज्याला आपण कोरोना म्हणून संबोधतो. या कोरोनामुळे अनेक लोकांना नुकसान झाले तर काहींना याचा तेवढाच फायदा झाला. विद्यार्थ्यांची शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन मोड मध्ये शिक्षण घ्यावे लागले. परंतु नेटवर्क मुळे काही विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले नाही. शेतकरी शेती करू शकले नाही. दुकाने बंद, बाजार बंद अक्षरशः गरिबांच्या घरांनी अन्नाचा तोटा झाला.

………………………..

विशाखा विलास पालकर (खांडोळा महाविद्यालय)

आज मला प्रश्‍नच असा पडला आहे की ऑफलाइन पद्धतीने सगळी विद्यालये कधी सुरू होतील? महाविद्यालयात बी.ए.ची पदवी प्राप्त करत असताना मध्येच कोरोना महामारीच्या आगमनाने सरळ चालणार्‍या पावलांना स्तब्ध करून ठेवले. महाविद्यालयातील मजा- मस्ती सोडूनच द्या, पण नेमके त्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी आसुसलेल्या मनाला ऑनलाइन वर्ग आणि नवीन शिक्षणपद्धती स्वीकारताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आणि आजही तीच परिस्थिती आहे. आज बाजार, धार्मिक स्थळे, चित्रपटगृहे, हॉटेल इ. खुली असतात तर मग ग्रंथालये आणि विद्यामंदिरे पूर्णपणे का खुली केली जात नाही? मुळात ज्ञान ग्रहण करणे हे सर्वांत महत्त्वाचे. पुढे येणार्‍या संकटांना सामोरे जाण्यासाठी आपली पावलं डगमगून जाऊ नये म्हणून आज कोणत्याही क्षेत्राचा विचार करता शिक्षणाचा पाया भक्कम करणे फार गरजेचे आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक तांत्रिक गोष्टी जरी कळल्या तरी आम्हा विद्यार्थ्यांमधली सृजनशीलता आणि ज्ञान मिळवण्यातली जिज्ञासा कमी होताना दिसते. त्यामुळे ज्ञानमंदिरे सुरू झाली पाहिजेत, असे मनापासून वाटते.
कोरोनापासून आपले संरक्षण कसे केले पाहिजे, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्‍न असावा असे मला वाटते, कारण सामाजिक अंतर आणि नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे आज प्रत्येकाला माहीत आहे. त्याचबरोबर शिक्षणही किती महत्त्वाचे आहे आणि ते अशा काळातसुद्धा सुरक्षितपणे आणि योग्य प्रकारे कसे प्राप्त करता येईल याच्यावरही आज प्रत्येकाने विचार करावा.
……………………………..

गौरांग गोकुळदास नाईक (खांडोळा महाविद्यालय)

काय दिवस होते ते! भरपूर अभ्यास आणि मग मज्जाच मज्जा. महाविद्यालयातील ते दिवस फक्त आठवणींचे गाठोडे बनून राहिले आहे आता. जवळजवळ दोन वर्षे सरली पण वर्गात प्रत्यक्ष गाठीभेटी होण्याचा मुहूर्त काही निघत नाही आणि तसा अभ्यासही घरी होत नाही. शिकायच्या धडपडीने का असेना पण स्वतःला एक वळण लागले होते, सकाळी लवकर उठून मग आईने दिलेली भाकरी… अर्धीच खाऊन का असेना पण वेळेत वर्गात पोहोचायची एक शिस्त लागली होती. कारण उशीर झाला तर शिक्षकांकडून शब्दछडीचा भडिमार व्हायचा. पण खरं सांगू? या सगळ्यांमुळेच विद्यार्थिदशेत आवश्यक असलेली शिस्त अंगी लागली होती. पण आत्ता काय? लेक्चर घरच्या घरीच असल्यामुळे नाही म्हटले तरीही ह्या शिस्तीकडे कुठेतरी नक्कीच कमीजास्त होत आहे. शिक्षकांशी होणारा प्रत्यक्ष संवाद आणि त्यांच्याशी असलेले प्रामाणिक नाते कुठेतरी हरवत चाललेय. कोरोनामुळे सगळ्याच गोष्टींचा नाइलाज आहे. पण आत्ता मात्र स्थिती हळूहळू पूर्ववत होते आहेे. त्यामुळे निश्चितच प्रत्यक्ष वर्ग सगळ्या सुरक्षानियमांचे पालन करत पुन्हा भरवूया. मिळून मिसळून मज्जेत शिकूया. आपापल्या वर्गात पुनश्च लवकरच भेटुया. तथास्तु!
………………………….

गायत्री शिरसुरला (द्वितीय वर्ष, कला, खांडोळा महाविद्यालय)

आपल्या देशामध्ये विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात जातात. पण या दोन वर्षात सर्वत्र पसरलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे जगभरातील सर्व व्यवहार व शिक्षण थोडेफार स्थगित झाले आहे. एक-दीड वर्ष झाले महाविद्यालयेच बंद आहेत. संपूर्ण देशाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा या परिस्थितीत विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर पडणे अशक्य झाले आहे. खरे तर कॉलेज लाइफ म्हणजे आमच्यासाठी एक आनंदोत्सवच! पण आम्हाला तो आनंद अनुभवायला मिळालाच नाही. ऐकलं होतं कॉलेज लाइफ तरुण-तरुणींच्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो, सर्वांसाठी ती एक छानशी आठवण बनते जी आपण कधीच विसरू शकत नाही. पण जेव्हा आमची वेळ कॉलेज लाइफ अनुभवायची आली तेव्हा दुर्दैवाने या महामारीमुळे देशातील विविध महाविद्यालयात ऑनलाइन शिक्षण सुरू केले. आज व्हॉट्सऍप, गुगल मीट, झूम व्हिडिओ इत्यादी ऍपद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. या ऑनलाइन शिक्षणामुळे आम्ही आमच्या शिक्षकांना, मित्रांना भेटू शकत नाही. त्यांना समोरून नाही पाहू शकत. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण हाच एक पर्याय आहे, हे मला समजतं. फ्रेशर्स म्हणून एक प्रकारे मनात खंत उत्पन्न झाली आणि ती अजूनही आहे. सुदैवाने ह्या कठीण परिस्थितीतून हळूहळू बाहेर पडतो खरे परंतु शिक्षणक्षेत्राला चांगले दिवस कधी येतील याची आम्हा मुलांना आतुरता आहे.
………………………..