कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम

0
141
  •  डॉ. मनाली म. पवार
    (सेंट इनेज, पणजी)

दिवसाअखेरीस सतत मोबाइल/लॅपटॉपच्या अतिवापरानंतर मुले/मोठेसुद्धा चिडचिडे बनतात. कारण नसताना रागावतात. म्हणजेच या मोबाइलच्या अतिवापरामुळे नुसत्या डोळ्यांचेच आजार होतात असे नाही तर इतरही ताण-तणाव वाढून काही आजार बळावत आहेत.

मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट इ. प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले आहे. कागद ते कॉम्प्युटरचा प्रवास हा इतका वेगवान घडला की कॉम्प्युटर आपल्या शरीर-मन-बुद्धीवर कधी आरूढ झाला हे कित्येकांच्या लक्षातही आले नसेल. आता तर काय… मुलांचे ऑनलाइन क्लासेस; वर्क फ्रॉम होम असल्याने सतत मोठे-छोटे सगळेच मोबाइल किंवा लॅपटॉपसोबत. तसेही फावल्या वेळेत मुलं मोबाइलवर चोरून किंवा आईवडिलांचा ओरडा खात खेळत होतीच. आता तर या ऑनलाइन क्लासेसमुळे मोबाइल वापरण्यास पूर्ण मुभाच. सर्वसाधारणपणे दिवसातील आठ-दहा तास या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला जात आहे.

मोबाइलच्या अतिवापरामुळे दृष्टीशी निगडित लक्षणांमध्ये वाढ होताना दिसत आहेच. दिवसाअखेरीस सतत मोबाइल/लॅपटॉपच्या अतिवापरानंतर मुले/मोठेसुद्धा चिडचिडे बनतात. कारण नसताना रागावतात. म्हणजेच या मोबाइलच्या अतिवापरामुळे नुसत्या डोळ्यांचेच आजार होतात असे नाही तर इतरही ताण-तणाव वाढून काही आजार बळावत आहेत. कॉम्प्युटरच्या या अतिवापरामुळे ज्या लक्षणांचा समुच्चय शरीरावर दिसतो त्याला ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सीव्हीएस)’ असे आधुनिक भाषेत म्हणतात.
सीव्हीएस होण्याचे मुख्य कारण म्हणजे दृष्टीशी निगडित पुन्हा पुन्हा येणारा ताण.

या ताणाला पुढील काही गोष्टी कारणीभूत असतात.
* छोट्या स्क्रीनवर सारखं बघत राहणं.
* कॉम्प्युटरसाठी उपयुक्त असा चष्मा न वापरणे किंवा सध्या त्यातल्या त्यात सुरक्षित म्हणून एच.डी. स्क्रीन वापरतात, त्याचा अभाव असणे.
* कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येणे.
* डोळ्यांची उघडझाप अथवा डोळ्यातील पाण्याचा अंश कमी असणे.
* भोवतालच्या वस्तूंची कॉम्प्युटर स्क्रीनवर चकाकी येणे.
* जवळच्या कामात दोन्ही डोळ्यांचा सहभाग नसणे.
* कामाच्या जागेची अयोग्य व्यवस्था.
* कामाचे स्वरूप व संबंधित ताण.
तीन ते चार तासापेक्षा जास्त काळ काम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला सतत नजर कॉंप्युटरवर असल्याने ताण येतो व सीव्हीएस होण्याची शक्यता असते. मोबाइल, कॉम्प्युटर लॅपटॉपसारखी उपकरणे वापरणार्‍या व्यावसायिकांचा, विद्यार्थ्यांचा व लहान मुलांचा समावेश यात होतो.

डोळ्यावर ताण येतो आहे, हे कसे ओळखावे??-
– डोळे ओढल्यासारखे वाटणे
– डोकेदुखी
– नजर धूसर होणे
– डोळ्यांना कोरडेपणा जाणवणे
– मानदुखी व खांदेदुखी
कॉम्प्युटरचा वापर जास्त करावा लागणार असेल अशा करिअरच्या सुरुवातीलाच ‘सीव्हीएस’साठी तपासणी करावी. या तपासणीमध्ये कॉम्प्युटर वापराच्या चुकीच्या पद्धतीला आळा बसू शकतो व त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर होणार्‍या दुष्परिणामांना आपण लांब ठेवू शकतो.
तुमच्या आजूबाजूच्या त्रासदायक गोष्टींचा विचार करणे, त्या कोणत्या आहेत ते ठरविणे… हे जितक्या लवकर केले जाईल तितक्या लवकर तुमचे दृष्टीविषयक त्रास कमी होतील.
सीव्हीएसचा त्रास कमी करण्यासाठी –
– कॉम्प्युटर वापरताना घालायच्या चष्म्याच्या नंबरची तपासणी
– कामाच्या ठिकाणी बसण्याच्या स्थितीचे मूल्यमापन करणे.
– जवळच्या दृष्टीसाठी लागणार्‍या दृष्टीच्या इतर कार्यांचे मूल्यमापन
– डोळ्यांचे आरोग्य कसे आहे याचे मूल्यमापन.
– काम करताना आजूबाजूच्या प्रकाशाचे व चकाकीचे मूल्यमापन करणे.
अशाप्रकारे सखोल मूल्यमापन करताना कामाशी निगडित बैठक, प्रकाश योजना, प्रखरता इ. गोष्टींचा विचार करणे व त्याविषयी नोंदी ठेवणे अत्यंत गरजेचे असते.
सीव्हीएस टाळण्यासाठी काही उपाय…..

* सीव्हीएस होताना प्रथमतः साध्या, छोट्या तक्रारींकडे कॉम्प्युटरमुळे त्रास होतोय असे वाटून दुर्लक्ष केले जाते व त्याचे मोठ्या तक्रारींमध्ये परिवर्तन होते.

* संगणकाची स्क्रीन डोळ्यापासून २० ते २८ इंच दूर व डोळ्यांच्या पातळीपेक्षा ४-५ इंच खाली असावी.

* संदर्भ सामग्री वर व मॉनिटरच्या खाली स्थित असावी. जर हे शक्य नसेल तर मॉनिटरच्या शेजारी पेपरस्टँड वापरणे योग्य ठरेल. याचा उद्देश डोक्याची हालचाल कमी व्हावी हा आहे, ज्यामुळे मान व डोकेदुखी उद्भवणार नाही.

* संगणक स्क्रीनचे ठिकाण असे असावे, ज्यामुळे ओव्हरहेड लाइट किंवा खिडकीतून येणारा प्रकाश स्क्रीनवर पडू नये, त्यासाठी खिडकीला ब्लाइंड ग्लास लावावे अथवा कमी वॉटचे बल्ब लावावेत.

* खुर्ची शरीराशी सुसंगत व आरामदायी असावी. पाय जमिनीवर सपाट राहतील अशा पद्धतीने खुर्चीची उंची समायोजित करावी. हातांना आधार देण्यासाठी खुर्चीच्या बाजूंचा वापर करावा. की-बोर्डवर टाइप करताना मनगट खाली टेकलेले असावे.

* संगणकावर काम करताना दर वीस मिनिटांनी २० सेकंदासाठी २० फूट लांब पहावे. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना पूर्ण विश्रांती मिळते.

* डोळ्यांचा व्यायाम रोज नित्यनेमाने केला तर डोळ्यांचे स्नायू बळकट होतात.

* एक हात नाकासमोर लांब करावी. त्याच्या मधल्या बोटाच्या टोकाकडे बघावे. बोट हळूहळू जवळ आणून नाकाच्या शेंड्याला लावावे. नंतर परत बोट लांब न्यावे. हे करताना नजर बोटाच्या टोकावर हवी. असे रोज वीस वेळा करावे. याच पद्धतीने नजर वर-खाली करावी. असेच तिरप्याने चार कोपर्‍यात बघावे. असे प्रत्येकी वीस वेळा करावे.
सद्य स्थितीत अगोदरच शाळेत दर दहाव्या मुलाला नीट दिसत नाही. पस्तिशीनंतर जवळचे दिसेनासे होते. त्यात आता ऑनलाइन स्टडी, वर्क फ्रॉम होम… त्यामुळे डोळ्याची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. त्यामुळे वरील व्यायाम आजपासूनच सुरू करा.