‘कॉमेडी मसाला’रसिकांची दाद

0
115
हास्य अभिनेत्री मीरा मोडक व हास्य अभिनेता अरुण कदम यांनी बहारदार अभिनय सादर केला. (छाया : किशोर नाईक)

पणजी शिगमोत्सवात गीत, लावणी, नकलांची रेलचेल
पणजी शिगमोत्सव समितीतर्फे येथील आझाद मैदानावर उभारलेल्या कलात्मक रंगमंचावर ईटीव्ही कॉमेडीस्टार अरुण कदम, आशिष पवार, कमलाकर सातपुते व नाट्यदर्पण पुरस्कार विजेत्या हास्य अभिनेत्री मीरा मोडक यांनी बुधवारी सादर केलेल्या ‘कॉमेडी मसाला’ या कार्यक्रमात रसिकांनी हास्याचा मनमुराद आनंद लुटला.मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. सोबत गीत, संगीत, लावणीनृत्य अशी रंगत होती. अरुण कदम व मीरा मोडक यांनी ‘लव्ह गुरू’ हे हास्य नाट्य सादर करून रसिकांना मनमुराद हसविले. मीरा मोडक यांनी अल्लड मुलीची भूमिका अफलातून वठविली. प्रेमाचे धडे देणार्‍या गुरुची भूमिका अरुण कदम यांनी सहज सुंदर सादर केली. दरम्यान, नवतारका दीपाली गुरव यांनी, ‘या रावजी बसा रावजी… नटरंगमधील वाजले की बारा… या फर्मास लावणींवर नजाकतदार नृत्यविष्कार घडवून दाद घेतली. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता मिमिक्री कलाकार योगेश सुपेकर यांनी निवेदन करताना मिमिक्रीचाही निर्भेळ आनंद दिला. राजकीय नेते नरेंद्र मोदी, शरद पवार, नारायण राणे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, रामदास आठवले यांच्याबरोबरच लोकप्रिय अभिनेते निळू फुले, दिलीप प्रभावळकर यांच्यापासून मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांच्यापर्यंतच्या अभिनेत्यांचे हुबेहूब आवाज काढून कार्यक्रमाची रंगत वाढविली. फिरोज शेख यांनी अमिताभ बच्चनच्या वेषात व भूमिकेत व विनोद सिंग यांनी गोविंदाच्या भूमिकेत बडे मीया छोटे मीया अफलातून सादर करून तर कार्यक्रमाला उंचीवर नेले. त्यांचे हुबेहुब आवाज, अभिनयाची शैली, बडे मीया छोटे मीया गीतावरील नृत्याचा आविष्कार हे सगळेच उत्कृष्ट होते. आशिष पवार व कमलाकर सातपुते यांनीही ङ्गकॉमेडी मसालाफ मध्ये छान रंग भरला. चित्रपटात भूमिकांसाठी ऑडीशन घेतली जाण्याच्या प्रसंगावर त्यांनी मस्त करमणूक केली. वाद्यवृंदातील कलाकार नीलेश जोशी, संदीप वाडेकर, वीणा चौगुले या गायकांनी व वादक विजय नरगुंदे (की बोर्ड), विकी (ड्रम्स), सचिन देसाई (ऑक्टोपॅड) व राम चौगुले (ढोलक व ढोलकी) यांनीही गीत, संगीताची मेजवानी दिली. रिअल ग्रुपचे राजेश शिरोडकर यांनी हा कार्यक्रम पुरस्कृत केल्याबद्दल व पणजी शिगमोत्सव समितीने या निखळ आनंद देणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल रसिकांनी त्यांना दुवा दिला.