कॉंग्रेस पक्षाला भवितव्य आहे का?

0
136
  • देवेश कु. कडकडे

अनेक पक्षांना धक्के बसतात, ते संपण्याच्या वाटेवर असतात. कॉंग्रेस पक्षाला आज स्वतःचा जनाधार असलेला नवीन नेता पुढे आणून नवा कार्यक्रम घेऊन मार्गक्रमण करावे लागेल, तरच गेलेली पत परत मिळू शकते.

१३३ वर्षांचा जुना असलेल्या कॉंग्रेस पक्षाने स्वातंत्र्य आंदोलनात प्रमुख भूमिका बजावली. त्याग आणि बलिदानप्राप्त गांधी नेहरू घराण्याच्या करिष्म्यावर पाच दशकांहून अधिक काळ देशात कॉंग्रेस पक्षाची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रावर घट्ट पकड होती. स्वातंत्र्यपूर्व काळात कॉंग्रेसची संघटना ही घराण्यापुरती कधीच मर्यादित नव्हती. मात्र पुढच्या काळात गांधी घराण्याने या पक्षाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचार, जाहिरनामा या दोन्ही आघाड्यांवर पुढाकार घेतला होता. जर त्यांना यावेळी अपेक्षित यश मिळाले असते तर सारे श्रेय त्यांच्या पदरात पडले असते. मात्र आता यशाने परत हुलकावणी दिल्याने राहुलनी पराभवाचे उत्तरदायित्त्व मान्य करून दिलेला राजीनामा पक्षाच्या कार्यकारिणीने स्वीकारण्यास नकार दर्शविला आहे. भविष्यात गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी असेल असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला सतत दुसर्‍यांदा मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. सर्वांत जास्त धक्कादायक बाब म्हणजे या अमेठी मतदारसंघाने अनेक दशके गांधी घराण्यावर सतत प्रेम केले, भरभरून साथ दिली. तिथेच यावेळी राहुल गांधी पराभूत झाले. राहुलना पंतप्रधानपदाचे दावेदार घोषित करून कॉंग्रेस पक्षाने एका तर्‍हेने आपल्या पराभवाला हातभार लावला. पक्षाचा अध्यक्ष कोण असावा हा एखाद्या पक्षाच्या अंतर्गत विषय असला तरी पंतप्रधानपद हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कॉंग्रेस नेत्यांचे एक ठरलेले पारंपरिक धोरण म्हणजे गांधी घराण्याच्या व्यक्तींनी काहीही चूक करावी, काहीही मूर्खपणा करावा, नाकर्तेपणा करावा, तरीही तो योग्यच असल्याचा निर्वाळा देणे पक्षाच्या कार्यकारिणीचे कर्तव्य असते. उदा. राहुल गांधी पराभवाचे उत्तरदायित्त्व स्वीकारून अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार होते, तरी कार्यकारिणी नकारघंटा वाजवते. कॉंग्रेस पक्षाने गांधी घराण्याशिवाय इतर नेत्यांना पक्षाचे नेतृत्व करण्याची फारशी संधीच मिळू नये हीच नीती कटाक्षाने पाळली आणि या घराण्याला थेट आव्हान देण्याचे धाडस कुणी दाखवले नाही. किंबहुना कोणी धाडस करण्यास पुढे सरसावले, त्यांना विविध हातखंडे वापरून रोखण्यात आले. जर गांधी घराण्यातील व्यक्ती अध्यक्षपदावरून पायउतार झाली तर पक्ष एकसंध राहील का? नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष वाढीस लागून पक्षाची शकले होतील का, ही पक्षाला सध्या मोठी भेडसावणारी चिंता आहे. कॉंग्रेसच्या अनेक अनुभवी आणि विचारवंत नेत्यांची अजूनही ठाम समजूत आहे की, गांधी-नेहरू घराणेच कॉंग्रेस पक्षाला एकसंध ठेवू शकते. सामान्य माणूस गांधी घराण्याकडे एखाद्या चुंबकासारखा ओढला जातो, हा समज दोन लोकसभा निवडणुकांत पुरता ढासळला आहे.

कॉंग्रेस पक्षाला हा पराभव फार जिव्हारी लागल्याने पक्षाच्या प्रवक्त्यांना एक महिनाभर वाहिन्यांपासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकूण या मोठ्या पराभवाने हेच सिद्ध झाले आहे की, पक्षावर जे संकट उभे राहिले आहे ते डोळ्याआड करता येणे शक्य नाही. राहुलच्या नेतृत्त्वावर प्रश्‍नचिन्ह उभे राहते ते कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून कधीच नव्हे, तर जनता आणि राजकीय विश्‍लेषकांकडून प्रश्‍नचिन्ह उभे होते. पक्ष कार्यकर्त्यांना अजूनही राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर ठाम विश्‍वास आहे.

पराभवानंतरच्या पक्षाच्या बैठकीत राहुलनी आरोप केला की पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या परिवारातील व्यक्तीला उमेदवारी देण्यासाठी हट्ट धरला. तो नकारात्मक संदेश जनतेत पोचला. कॉंग्रेस पक्ष मोदी आणि शहा यांच्या झंझावतापुढे टिकाव धरू शकला नाही. नकारात्मक आणि मोदीवर व्यक्तिगत टीका – उदा. ‘चौकीदार चोर है’ तसेच राफेल मुद्याचा अतिप्रमाणात वाजवलेला डंका कॉंग्रेसला मारक ठरला. आजच्या काळात निवडणुका लढविण्यास कुशल प्रबंधन आणि व्यावसायिकतेची जोड हवी. अध्यक्षाने ना सदस्यता मोहीम चालविली, ना जमिनी स्तरावर आपला संघटनात्मक ढॉंचा उभा करण्यास स्वारस्थ दाखवले. कॉंग्रेसला अजूनही राज्यांमध्ये तेच तेच अशोक गेहलोत, कमलनाथ, शीला दीक्षीत, तरुण गोगाई सारखे जुने चेहरे नेतृत्त्व करायला लागतात. त्यामुळे नवीन चेहर्‍यांना फारसा वाव नाही. गेल्या २५ वर्षांपासून ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेसची सत्ता नाही, तिथे संघटनात्मक पातळीवर बांधणी झाली नाही. कॉंग्रेस पक्षाची सारी भिस्त जी नेहरू-गांधी घराण्याच्या करिष्म्यावर आणि पारंपरिक मतपेटीवर अवलंबून होती, ती आता हळूहळू ढासळू लागली आहे. त्यामुळे हा पक्ष आता अनेक राज्यांतून निकालात निघाला आहे. याला उत्तरदायी आहे गांधी घराण्यावर सदैव आशा बाळगारे भाबडे कार्यकर्ते.

कॉंग्रेसचे नेते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची आता पक्षाच्या विचारांवर श्रद्धा राहिलेली नाही, परंतु परिश्रम न करता कॉंग्रेस पक्षाच्या लोकप्रियतेवर विजयश्री खेचून आणण्याचे दिवस आता संपले आहेत. २०१४ साली कॉंग्रेस पक्ष पूर्णपणे खिळखिळा झाला होता. त्याचवेळी पक्षनेतृत्वाने आपले कौशल्य पणाला लावून पक्षाला नवीन दिशा देणे शक्य होते, परंतु त्यासाठी जिद्द, आशा, सहनशीलता आणि पुरेसा वेळ द्यावा लागतो. मात्र त्यावेळी पक्षाचे नेते हातावर हात ठेवून बसले होते. २००४ साली केंद्रात सत्ता येताच कॉंग्रेस पक्षाने स्वतःचे एका सामाजिक संस्थेत रुपांतर केले; त्यामुळे या पक्षाचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले आणि पक्षाची संघटनात्मक शक्ती क्षीण होऊ लागली. दुसरीकडे मोदी आणि शहांनी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक ठराविक लक्ष्य दिले. कॉर्पोरेट क्षेत्रात निष्ठूर स्पर्धा असल्याने सदैव प्रतिस्पर्ध्याला संपविणे हे प्रथम ध्येय असते. त्याच धर्तीवर ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ हा संकल्प करण्यात आला. देशात होणार्‍या बदलाचा कॉंग्रेस पक्ष सामनाच करू शकला नाही.

लोकांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यास हा पक्ष कमी पडला. पक्षाचे अध्यक्ष सदैव भावी दिशा ओळखणारा असावा. उपनेते तरुण, जिद्दी आणि उमेदिने कार्य करणारे असावेत. सध्याच्या जुन्या युगातील नेत्यांनी आता केवळ मार्गदर्शकांची भूमिका घेऊन नव्या दमाच्या नेत्यांना संधी द्यावी लागेल. कॉंग्रेसच्या आता या भ्रष्टाचारी नेत्यांचा जनतेशी संपर्क राहिलेला नाही. स्वतःची तुंबडी भरण्यात मग्न असलेल्या या नेत्यांना देशातील बदलत्या सामाजिक परिस्थितीचा अंदाज आला नाही. आजच्या सोशल मीडियाच्या युगात जनतेपर्यंत आपली बाब पोचवण्यास भाजप यशस्वी ठरला तर कॉंग्रेस पक्षाची छाप सोशल मीडियावर दिसलीच नाही. कॉंग्रेसने मोदीला थापेबाज म्हटले, परंतु सिद्ध करू शकली नाही. राहुल, प्रियांकाचे मंदिर, मंदिर फिरणे हा नकली हिंदुत्ववाद जनतेने स्वीकारला नाही. राजकारणात टिकून राहायचे असेल तर कॉंग्रेसला आमूलाग्र बदल करावा लागेल. सध्या कॉंग्रेसने खूप काही गमावलेले असले तरी अजून संपलेला नाही. लोकशाहीच्या वाटचालीत चढउतार होत असतात. ते केवळ आपल्याच देशात नव्हे तर जागतिक राजकारणाचे वैशिष्ट्य आहे. अनेक पक्षांना धक्के बसतात, ते संपण्याच्या वाटेवर असतात. कॉंग्रेस पक्षाला आज स्वतःचा जनाधार असलेला नवीन नेता पुढे आणून नवा कार्यक्रम घेऊन मार्गक्रमण करावे लागेल, तरच गेलेली पत परत मिळू शकते.