कचरा न स्वीकारल्यास मैलावाहू टँकर रोखू

0
128

>> मनपाचा सरकारला इशारा

>> साळगावला कचरा अडविल्याने महापौर आक्रमक

साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात पणजी महानगर पालिकेचा एक ट्रक ओला कचरा स्वीकारण्यास सोमवारपासून नकार दिल्याने कचरा विल्हेवाटीची समस्या निर्माण झाली आहे. सदर कचरा प्रकल्पात मंगळवारी कचरा न स्वीकारल्यास बुधवारपासून कळंगुट, कांदोळी आदी किनारी भागातील हॉटेलची सिव्हरेज घेऊन सांतइनेज, पणजी येथील सिव्हरेज प्रकल्पात येणारे टँकर अडविण्यात येणार आहेत, असा इशारा महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिला.

पणजी महानगरपालिका क्षेत्रात दररोज २८ टन ओला कचरा तयार होतो. त्यातील साधारण ८ टन कचरा साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात पाठविला जातो. २० टन ओल्या कचर्‍याची महानगरपालिकेच्या पाटो – पणजी, हिरा पेट्रोल पंप, मार्केट या तीन ठिकाणच्या कचरा प्रकल्पात विल्हेवाट लावली जाते. सोमवारी महानगरपालिकेचा कचरा घेऊन साळगाव येथील प्रकल्पात पाठविण्यात आलेला कचरा परत पाठविण्यात आला आहे. स्थानिक लोकांच्या विरोधामुळे कचरा स्वीकारला जात नाही, अशी माहिती महापौर मडकईकर यांनी दिली.

ओल्या कचर्‍याची समस्या
पणजीतील ८ टन ओल्या कचर्‍याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पणजी महानगरपालिकेचा कचरा साळगाव प्रकल्पात न स्वीकारल्यास महानगरपालिका प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. उत्तर गोव्यातील किनारी भागातून दर दिवसा सुमारे ६० टँकर विविध हॉटेलची सिव्हरेज घेऊन सांतइनेज, पणजी येथील मलनिस्सारण प्रकल्पात येतात. या टँकरमुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच टँकरच्या वाहतुकीमुळे रस्ते, पदपथ खराब होत आहेत. महानगरपालिकेचा कचरा न स्वीकारल्यास याठिकाणी टँकरना बंदी करावी लागणार आहे, असे महापौर मडकईकर यांनी सांगितले.

महानगरपालिकेची बायंगिणी, ओल्ड गोवा येथील जमीन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सरकारकडे सुपूर्द करण्यात आली आहे. परंतु, मागील दोन ते अडीच वर्षांत त्या ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सरकारी पातळीवरील प्रयत्नांना गती मिळालेली नाही, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.

नवीन प्रकल्पाचा प्रस्ताव
महानगरपालिका क्षेत्रातील निवासी इमारतींमधील ओला कचरा विल्हेवाटीवर तोडगा काढण्यात आला आहे. हॉटेलमधील ओल्या कचर्‍याच्या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिका १० टन क्षमतेचा नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यावर विचारविनिमय करीत आहे. हा प्रकल्प उभारणीसाठी आणखीन पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीची आवश्यकता आहे, असेही मडकईकर यांनी सांगितले.

मडगावात अखेर घरोन्‌घर
वर्गीकृत कचराउचल सुरू

मडगाव पालिकेने कालपासून वर्गीकृत केलेला कचरा घरोनघर गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सोनसोडो येथील फोमेंतो ग्रीन कंपनीने त्यांच्या प्लांटमध्ये पडून असलेले कचर्‍याचे ढीग हटविल्याशिवाय वर्गीकृत केलेला कचरा घेण्यास विरोध केला होता.

गेल्या पाच दिवसांपासून पालिकेचे कामगार फोमेंतो ग्रीन कंपनीच्या प्लांटमधील कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर करीत होते. प्लांटमधील कचरा खाली करण्याचे काम संपल्यानंतर कालपासून कचरा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या प्लांटात हजारभर टन कचरा होता. काल दुपारपर्यंत तो कचरा उचलण्यास पालिकेच्या कामगारांना यश आले. पालिकेच्या कामगारांनी रात्रीच्या वेळीही काम चालू ठेवले होते. मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी या कामी पूर्णपणे लक्ष घातले होते. उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी कडक शब्दांत आदेश दिल्याने प्लांटमध्ये साठलेला कचरा उचलण्यात आला.

दरम्यान, फोमेंतो कंपनीने गेल्या सात वर्षांतील कामाचे १२ कोटी रुपये पालिकेने भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. या प्रश्‍नावर विचार चालू असल्याचे पालिकेच्या गोटातून सांगण्यात आले.