कॉंग्रेस – गोवा फॉरवर्ड यांच्यातील वाटाघाटी तेजीत

0
107

>> दिग्विजय, ऑस्कर फर्नांडिस तातडीने गोव्यात दाखल

 

फातोर्डा मतदारसंघ हा जागा वांटप तडजोडीचा विषय असतानाही जोसेफ सिल्वा या उमेदवाराला कॉंग्रेसने बी फॉर्म दिल्यानंतर निर्माण झालेला गुंता सोडविण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेस सरचिटणीस तथा गोवा प्रभारी दिग्विजय सिंह व सरचिटणीस ऑस्कर फर्नांडिस काल रात्री तातडीने गोव्यात आले. सिल्वा यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून त्यांचे प्रयत्न संध्याकाळपर्यंत सुरू होते.

सिल्वा यांना फातोर्डा मतदारसंघासाठी पक्षाने उमेदवारी दिल्याने गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई व आमदार दिगंबर कामतही संतप्त बनले आहेत. वरील प्रकाराचा भाजप उमेदवारालाच अधिक लाभ होऊ शकेल, असे कॉंग्रेसच्या एका गटाचे म्हणणे आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपणार असल्याने सिल्वा अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी कॉंग्रेसवर टीका करणे बंद करावे, असे आवाहन कॉंग्रेस सरचिटणीस गिरीश चोडणकर यांनी केले आहे. फातोर्डा मतदारसंघाचा गुंता पक्ष नेते सोडवतील, असे ते म्हणाले. आपल्या पक्षाने सुरुवातीपासूनच कोणत्याही पक्षाबरोबर युती न करता चाळीसही मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते. पक्षाने जनतेच्या मतांनुसारच उमेदवार निश्‍चित केले आहेत. वेळ्‌ळी व साळगाव या मतदारसंघातील उमेदवार कामाला लागले असून कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवारांचे अर्ज मागे घेणार नाही, असे चोडणकर यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या या भूमिकेमुळे सरदेसाई यांच्यासमोर संकट उभे ठाकले आहे. पणजी मतदारसंघातून भाजप उमेदवाराचा पराभव करण्यासाठीच युनायटेड गोवनच्या बाबुश मोन्सेर्रात यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.